राज्य सरकारचा 2012-13 चा ‘गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार आनंदजी शहा यांना, तर ज्येष्ठ नाटय़कर्मी आत्माराम भेंडे यांना ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे
मुंबई – राज्य सरकारचा 2012-13 चा ‘गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार आनंदजी शहा यांना, तर ज्येष्ठ नाटय़कर्मी आत्माराम भेंडे यांना ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय समितीने हे पुरस्कार घोषित केले. पाच लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र, श्रीफळ आणि शाल असे लता मंगेशकर पुरस्काराचे स्वरूप आहे.
आनंदजी शहा यांचा जन्म कुंदरोली, कच्छ (गुजरात) येथे 2 मार्च 1933 रोजी झाला. त्यांचे वडील व्यापारी होते. त्यांनी मुंबईत किराणा मालाचे दुकान सुरू केले. गिरगावात अनेक वर्षे ते संगीत श्रवणात रमले. गुणवत्तेमुळे ते अल्पावधीत प्रसिद्धीस पावले. हिंदी चित्रपटसृष्टीत विविध गीतांना संगीताचा साज देणारी कल्याणजी-आनंदजी ही जोडी खूप गाजली. 1970मध्ये दोन गुजरातींची ही जोडी एकाच रंगमंचावर काम करू लागली. नंतर त्यांनी डॉन, बेरंग, सरस्वतीचंद्र, कुर्बानी आणि सफर अशा अजरामर चित्रपटांना संगीत दिले. कोरा कागज या चित्रपटासाठी त्यांना 1975 चा फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला.
पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
ज्येष्ठ नाटयकर्मी आत्माराम भेंडे यांना ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे मराठी नाटय़क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणा-या या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत असणा-या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून कारर्कीद सुरू केली. विनोदी अभिनेते आणि लेखक बबन प्रभू यांच्याबरोबर त्यांनी अनेक दर्जेदार विनोदी, फार्सिकल नाटके रंगभूमीवर आणली.
या जोडीने दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला, पिलूचं लग्न आदी अनेक नाटके गाजवली. अभिनेता म्हणून भेंडे यांनी मन पाखरू पाखरू, प्रीती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, पळा पळा कोण पुढे पळे अशा नाटकांतून कौशल्य दाखवले. मराठी रंगभूमीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी कर्तृत्व गाजवले. अनेक दूरदर्शन मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. लवकरच या दोन्ही पुरस्कारचे वितरण होईल.