पाचव्या फायनल बुद्धिबळ मास्टर्समध्ये जगज्जेता विश्वनाथन आनंदला सलग सातव्या डावात बरोबरीवर समाधान मानावे लागले.
बिल्बाओ (स्पेन) – पाचव्या फायनल बुद्धिबळ मास्टर्समध्ये जगज्जेता विश्वनाथन आनंदला सलग सातव्या डावात बरोबरीवर समाधान मानावे लागले. अर्मेनियाच्या लेवॉन अॅरोनियनविरुद्धचा त्याचा डाव ३३ चालींमध्ये बरोबरीत सुटला. बरोबरीचा ‘फेरा’ कायम राहिल्याने आनंदला सातच गुण मिळवता आलेत. सात फे-यांनंतर तो चौथ्या स्थानीआहे. स्पर्धेतील तीनच फे-या शिल्लक असल्याने आनंद अन्य प्रतिस्पध्र्यापेक्षा खूपच मागे पडला आहे. पुढील तीनपैकी दोन डावांत पांढ-या मोह-यांनिशी खेळायचे असल्याने बरोबरीची कोंडी फोडण्याची त्याला संधी आहे.
सातव्या फेरीतील अन्य लढतींमध्ये नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने स्पेनच्या फ्रान्सिस्को वॅलेयो पॉन्सला नमवत सलग दुसरा विजय नोंदवला. ४२ चालींमध्ये कार्लसनने बाजी मारली. इटलीचा फॅबियानो कॅरुआनाला मात्र रशियाच्या सर्जी कार्याकिनविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवावा लागला. ४० चालींनंतरही कोंडी फुटली नाही. कार्लसन आणि कॅरुआनाच्या खात्यात प्रत्येकी १२ गुण असून दोघांमध्ये जेतेपदासाठी चुरस आहे.