जगज्जेता विश्वनाथन आनंदला शनिवारी पांढ-या मोह-या घेऊन खेळतानाही जगज्जेतेपदाच्या लढतीत सलग दुस-या पराभवाला सामोरे जावे लागले.
चेन्नई– जगज्जेता विश्वनाथन आनंदला शनिवारी पांढ-या मोह-या घेऊन खेळतानाही जगज्जेतेपदाच्या लढतीत सलग दुस-या पराभवाला सामोरे जावे लागले. एकावेळी बरोबरीत संपेल असे वाटणारा हा सहावा डाव आव्हानवीर आणि अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने हुशारीने जिंकला. ६७व्या चालीला आनंदसमोर पराभव मान्य करण्यावाचून पर्याय उरला नाही. सलग दोन विजयांसह कार्लसनने ४-२ अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
या डावात ५९व्या चालीपर्यंत लवकरच बरोबरी होईल अशी चिन्हे होती. मात्र आनंदने आरए ४ ही हत्तीला हलवणारी केलेली चाल त्याच्या पराभवास थोडीफार कारणीभूत ठरली. त्यावेळी त्याला बी चार चाल खेळ जास्त सोयीस्कर होते. मात्र आनंदच्या या चुकीचा फायदा घेत कार्लसनने पुढील चालींना हत्ती, राजा आणि तीन प्याद्यांच्या जोरावर आनंदवर दडपण ठेवले. अखेर त्याची परिणती पराभवात झाली.
तत्पूर्वी, कार्लसनने काळ्या मोह-यांनी खेळताना रॉय लोपेझ हे बुद्धिबळ जगतात अनेकांचे आवडते ओपनिंग वापरले होते. सुरुवातीला फॉर्मात वाटणारा आनंदने १०व्या चालीत उंटाला कार्लसनच्या भागात नेत आगळीवेगळी चाल खेळली. त्याच्या या बीजी पाच चालीने कार्लसनला बराचवेळ विचार करायला लावला. कारण सुरुवातीलाच याप्रकारच्या चालीला उत्तर देण्याची वेळ अजून कार्लसनवर आली नव्हती. याउलट आनंदने यावर्षाच्या सुरुवातीला आर्मेनियाच्या लेवॉन आरोनियनविरुद्ध ही चाल वापरली होती. मात्र कार्लसननेही उंट पुढे करत चोख उत्तर दिले. मिडलगेममध्ये काहीवेळ आनंदला संधी दिसत होती. मात्र बरोबरीत सुटणा-या डावांचे विजयात रुपांतर करण्याची कार्लसनची असलेली ताकद येथे अनुभवायला मिळाली. त्यासाठी त्याने जवळपास पाच तास झुंज दिली.