दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी आता महामार्गावरील ४५०० बारवर बंदी घालणार आहे.
मुंबई- मद्य पिऊन होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्गालगतचे ४५०० बार दुसरीकडे हलवण्यात येत आहेत, अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
मद्य पिऊन होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील बार दुसरीकडे हलवण्याबाबतचा तारांकित प्रश्न आ. किसन कथोरे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. गणपत गायकवाड, आ. प्रकाश भोईर, आ. मंगेश सांगळे, आ. प्रवीण दरेकर, आ. शिशिर शिंदे, आ. बाळा नांदगावकर, आ. नितीन भोसले, आ. वल्लभ बेनके , आ. पंकज भुजबळ, आ. मिलिंद कांबळे, आ. संजय वाघचौरे आणि आ. सुरेश लाड आदींनी विचारला होता. राष्ट्रीय महामार्गालगतचे चार हजार ५०० बार अन्यत्र हलवण्याचे आदेश केंद्रीय महामार्ग खात्याने राज्य सरकारला दिले आहेत, अशी माहिती नाईक यांनी लेखी उत्तरात दिली.
राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत मोठय़ा प्रमाणात बार असून, त्यांची संख्या व अंतराची मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत. तसेच महामार्गाजवळच्या प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व बारविरुद्ध कारवाईचे आदेश २८ जून २०१३च्या पत्रान्वये देण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.
महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, म्हणून आता महामार्गावर मद्यविक्रीचा परवाना देणार नसल्याचे उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. तसेच महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने आणि बारवर बंदी घालणार असून येथील दुकान आणि बारचे परवाने रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
महामार्ग आणि बसस्थानकापासून ७५ मीटर अंतराच्या आत बीअर बार असू नयेत, असा शासनाचा नियम आहे. मात्र, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर नियमबाह्य बीअर बारची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर बारसाठी जे नियम आहेत, ते निव्वळ कागदावरच राहिले आहेत. त्यामुळे आता महामार्गावर दारु पिऊन गाडी चालवणा-या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून कडक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. महामार्गावरही ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ मोहिम राबवण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे बरोबरच जुना मुंबई पुणे महामार्ग, मुंबई- गोवा महामार्ग, पुणे-नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर व राज्यातील अन्य महामार्गावरही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.