विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आठवी सीडेड रशियाची इकटेरिया मॅराकोवाला दुस-या फेरीत पराभवाचा धक्का बसला.
लंडन- विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आठवी सीडेड रशियाची इकटेरिया मॅराकोवाला दुस-या फेरीत पराभवाचा धक्का बसला. मात्र तिसरा सीडेड ब्रिटनचा अँडी मरे, पाचवी सीडेड डेन्मार्कची कॅरोलिन वोझ्नियाकी तसेच १०वी सीडेड अँजेलिक कर्बरने सातत्य राखताना तिसरी फेरी गाठली.
दुस-या फेरीत माजी विजेता मरेला हॉलंडच्या रॉबिन हासेला ६-१, ६-१, ६-४ असे हरवण्यास फार प्रयास पडले नाहीत. तिस-या फेरीत त्याची गाठ इटलीचा अँड्रियास सेप्पी किंवा क्रोएशियाचा बोर्ना कोरिकशी पडेल. महिला एकेरीत मॅकारोवाच्या पराभवाने खळबळ माजली. तिला बिनसीडेड स्लोव्हाकियाच्या मॅगडॅलिना रायबॅरिकोवाकडून २-६ ५-७ अशी हार पत्करावी लागली.
माजी ‘नंबर वन’ वोझ्नियाकीने चेक रिपब्लिकच्या डेनिसा अॅलेटरेवावर ६-१, ७-६(८/६) अशी मात केली. १८वी सीडेड जर्मनीची सॅबिने लिसिकीने अमेरिकेच्या ख्रिस्तिना मॅकहॅलेचे आव्हान चुरशीच्या लढतीत २-६, ७-५, ६-१ असे मोडीत काढले.
तिस-या फेरीत लिसिकीसमोर १५व्या सीडेड स्वित्झर्लंडलडच्या टिमिया बॅसिस्झ्कीचे आव्हान आहे. बॅसिस्झ्कीने दुस-या फेरीत स्पेनच्या सोलर-इस्पिनोसावर ६-२, ६-१ असा विजय मिळवला. अँजेलिक कर्बरने बिनसीडेड रशियाच्या पॅवलीयुन्चेकोवाला ७-५, ६-२ असे हरवले.