गुरुवारी पहाटे आग्रा कॅटॉमेन्ट भागातील एका चर्चची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली.
आग्रा – केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागच्या काही महिन्यांपासून ख्रिश्चन बांधवांच्या आस्थेचे केंद्र असणा-या चर्चवर सातत्याने हल्ले होत असून, गुरुवारी पहाटे आग्रा कॅटॉमेन्ट भागातील एका चर्चची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली.
या घटनेमुळे स्थानिक ख्रिश्चन नागरीकांमध्ये संतापाची भावना आहे. या प्रकरणी आग्र पोलिस स्थानकात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोडफोडीमध्ये चर्चच्या प्रवेशव्दारासह आवारातील दोन पुतळयांचे नुकसान झाले.
या घटनेने आग्र्यामधील ख्रिश्नच समाज संतप्त झाला असून, या समाजाच्या नेत्यांनी गुन्हेगारांना २४ तासांच्या आत अटक करुन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मागच्या महिन्यात पश्चिम बंगालमधील कॉन्वेंट शाळेत चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या दरोडेखोरांनी एका वयोवुध्द ननवर बलात्कार केला होता. या प्रकरणी दोन बांगलादेशी नागरीकांना अटक झाली आहे. यापूर्वी हरयाणामधील निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या एका चर्चवर हल्ला झाला होता.