मानखुर्दमध्ये निर्दयी आईनेच आपल्या आठ वर्षीय मुलीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई- मानखुर्दमध्ये निर्दयी आईनेच आपल्या आठ वर्षीय मुलीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आईला अटक केली असून प्रियकर मात्र फरार झाला आहे.
उषा भोले (२८) ही महिला दोन वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त रहाते. मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड परिसरात ती मुलगी तनिषा (८) आणि १२ वर्षांच्या मुलासह राहत होती. दरम्यान तीचे अविनाश फुलपगारे याच्याशी अनैतिक संबंध होते. तिच्याच घरी तो राहत होता.
रविवारी रात्री दारुच्या नशेत घरी आलेल्या अविनाशने तनिषाला घराबाहेर जाण्यास सांगितले. मात्र, ती घराबाहेर गेली नाही, त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिचे डोके जमिनीवर आपटले. त्यात ती बेशुद्ध झाली. नंतर कोणाला संशय येवू नये म्हणून तिला जवळच्या शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केले. यावेळी ती मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
त्यानंतर त्या मुलीच्या वडीलांना कळवण्यात आले. वडीलांनी पोलिसांजवळ हत्येचा संशय व्यक्त केला. त्यावरून शताब्दी रुग्णालयामधून या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यातील अहवालानुसार, तनिषाला मारहाण करुन तिची हत्या केल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी उषा भोले हिला अटक केली असून तिचा प्रियकर अविनाश हा फरार झाला आहे. त्याच्या पोलीस कसून शोध घेत आहेत.