आईच्या हातचे खा, भरपूर खेळा आणि व्यायाम करा, दारू-सिगारेट या व्यसनांपासून लांब राहा आणि मधुमेहाला दूर ठेवा, असा आरोग्यमंत्र ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ व चंकी पांडे यांनी मुलांना दिला.
पुणे- बाहेरील खाद्यपदार्थ जास्त खाऊ नका, आईच्या हातचे खा, भरपूर खेळा आणि व्यायाम करा, दारू-सिगारेट या व्यसनांपासून लांब राहा आणि मधुमेहाला दूर ठेवा, असा आरोग्यमंत्र ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ व चंकी पांडे यांनी मुलांना दिला.
डायबेटीस केअर अँड रिसर्च फाऊंडेशनतर्फे मधुमेह जनजागृतीसाठी मधुमेहाबाबत विशेषकरून ‘बालमधुमेह’ या विषयावरील जागरूकता वाढवण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन श्री गणेश कला क्रीडा मंदिरात करण्यात आले होते.
या वेळी ज्येष्ठ आर्थोपेडिक सर्जन के. एच. संचेती, उपप्रांतपाल चंद्रहास शेट्टी, फाऊंडेशनचे अध्यक्ष मधुमेहतज्ज्ञ डॉ. अभय मुथा, अमृतलाल मुथा, एमक्यूअरचे अरुण खन्ना, श्रीकांत सोनी आदी या वेळी उपस्थित होते.
डायबेटीस केअर अँड रिसर्च फाऊंडेशनतर्फे दरवर्षी बालमधुमेहींसाठी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार या वर्षी अहमदाबाद येथील मैत्री पांचोली हिस प्रदान करण्यात आला. जॅकी श्रॉफ यांनी या वेळी १ लाखाचा धनादेश डायबेटीस केअर अँड रिसर्च फाऊंडेशनला देणगी म्हणून दिला.
पास्ता, पिझ्झा अशा पदार्थासारखे बाहेरचे खाणे टाळा. आठवडय़ातून एखाद्यावेळी बाहेरचे खाण्यास हरकत नाही; परंतु आईने घरी बनवलेले जेवण खा. कब्बडी, खो-खोसारखे मैदानी खेळ खेळा, जास्तीत जास्त चाला, व्यायाम व योग करा या सर्व गोष्टी लहानपणापासूनच करा आणि मधुमेहाला दूर ठेवा. मी पण गोड खातो, मात्र मी खूप चालतो आणि घामाद्वारे सर्व बाहेर काढतो, असे जॅकी श्रॉफ यांनी सांगितले.
बदललेल्या जीवनशैलीमुळे, अनुवंशिकता, व्यायामाच्या अभावामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. भारताला मधुमेहाची राजधानी असे संबोधले जाऊ लागले आहे, मात्र दररोज व्यायाम महत्त्वाचा आहे. तसेच या आजाराची योग्य वेळी काळजी घेणे आवश्यक आहे. माझे आईवडील डॉक्टर आहेत. माझ्या कुटुंबात वडिलांकडून मधुमेहाची अनुवांशिकता आहे. त्यामुळे मी स्वत: व्यायाम करतो व दर सहा महिन्यांनी सर्व चाचण्या करतो, असे सांगून अशीच काळजी सर्वानी घ्यावी, असे आवाहन चंकी पांडे यांनी केले.
मैत्री पांचोली म्हणाली, मधुमेही असताना ग्रीसमधील सर्वात उंच शिखर चढणे, हा माझ्यासाठी जीवनातील अविस्मरणीय क्षण होता. मधुमेह असतानाही आपण काहीही करू शकतो, हे मला जगाला व भारताला दाखवून द्यायचे होते. लहान वयात मधुमेह असला तरी घाबरून जाऊ नका, वेळेवर इन्सुलिन घ्या, योग्य व वेळेवर आहार घ्या, सकाळी चला, व्यायाम करा आपण सर्व दैनंदिन गोष्टी करू शकतो, असा विश्वास तिने दिला.