अॅमेझॉन भारतात आणखी तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यात कंपनीचे अध्यक्ष जेफ बेझोस यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
नवी दिल्ली- अॅमेझॉन भारतात आणखी तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यात कंपनीचे अध्यक्ष जेफ बेझोस यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. अॅमेझॉनने आधी २ अब्ज डॉलची गुंतवणूक केली असून या घोषणेने एकूण गुंतवणूक ५ अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे. ई-कॉमर्समध्ये अग्रेसर असलेल्या फ्लिपकार्टशी अॅमेझॉन तीव्र स्पर्धा करत आहे. यामुळे भारतात आणखी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
अॅमेझॉन इंडियाने भारतात केलेल्या या गुंतवणुकीमुळे त्यांचे भारतातील भांडवल फ्लिपकार्ट आणि सॉफ्टबँक पुरस्कृत स्नॅपडीलच्या एकत्रित भांडवलापेक्षाही जास्त आहे. चीनमधील अलिबाबा या महाकंपनीशी स्पर्धा हरल्यावर भारतासारख्या बाजारपेठेत गुंतवणूक करणे अॅमेझॉनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही भारतात अगोदरच ४५,००० नोक-यांची निर्मिती केली आहे. अजूनही भारतात आम्हाला प्रचंड क्षमता दिसते आहे, असे बेंझोस म्हणाले. आमच्या सर्वाधिक महत्त्वाकांक्षी मैलाच्या दगड योजनेलाही आमच्या संघाने पार केले आहे. त्यामुळे भारतात आम्ही आणखी तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहोत, याची घोषणा करताना मला आनंद होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बेंझोस यांना यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलतर्फे जागतिक नेतृत्व पुरस्कार प्रदान केला. २०१५पासून अॅमेझॉन भारतात गुंतवणूक गतिमान करत आहे.
अमेरिकन कंपन्या गुंतवणार ४५ अब्ज डॉलर
एकंदरीत अमेरिकन कंपन्यांनी भारतात ४५ अब्ज डॉलरची गुंतवणूक येत्या दोन ते तीन वर्षात करण्याचे आश्वासन दिले आहे. यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलने पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेतील उद्योगजगात गोलमेज परिषद आयोजित केली होती. त्यातून ही गोष्ट स्पष्ट झाली. यूएसबीएसने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ४५ अब्ज डॉलर हा आकडा ढोबळमानाने धरला असून डिजिटल इंडिया आणि इतर आर्थिक सुधारणा राबवण्याच्या भारत सरकारच्या धोरणांमुळे ही रक्कम दुप्पटही होईल. रुपर्ट मडरेक यांचा स्टार ग्रुप यासह अनेक अमेरिकन कंपन्या भारतात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.