ड्रोनच्या सहाय्याने वस्तूंचे वितरण करण्याची रिटेल क्षेत्रात खळबळ माजवणारी संकल्पना ‘अॅमेझॉन’ कंपनीने जाहीर केली.
ड्रोनच्या सहाय्याने वस्तूंचे वितरण करण्याची रिटेल क्षेत्रात खळबळ माजवणारी संकल्पना ‘अॅमेझॉन’ कंपनीने जाहीर केली. त्यानंतर जगभरात या संकल्पनेवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. जगातील इंटरनेट सर्च इंजिनमधील बडी कंपनी गुगलने अॅमेझॉनसमोर यंत्रमानवाचा वापर करण्याचा पर्याय तयार करत या स्पर्धेमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही यंत्रमानवाच्या साहाय्याने वस्तू वितरित करणार असल्याचे गुगलने जाहीर केले.
या योजनेत माणसासारखे दिसणारे दोन यंत्रमानव गुगल तयार करणार आहे. कंपनीकडे ग्राहकाने मागणी नोंदवल्यावर हे यंत्रमानव गुगलच्या चालकरहित गाडीत बसून संबंधित ग्राहकाच्या घरी जाऊन वस्तू वितरित करतील. अॅमेझॉनच्या ड्रोन वितरण योजनेपेक्षा आमची योजना अधिक वास्तववादी आहे. नव्या युगातील यंत्रमानव तयार करण्यासाठी गुगलने गेल्या वर्षभरात सात तंत्रज्ञान कंपन्या विकत घेतल्या. गुगलचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर बनवणा-या अॅँडी रुबीन यांच्याकडे नवीन यंत्रमानव विभागाची जबाबदारी सोपवली आहे.
गुगलने यंत्रमानवांची निर्मिती करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा कंपन्यांमध्ये चालणा-या उत्पादन प्रक्रियांसाठी हा यंत्रमानव वापरला जाणार आहे. कंपनीतून उत्पादित होणारा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा तयार केली जात आहे.