लेगस्पिनर अॅडम झंपाच्या (१९ धावांत ६ विकेट) अफलातून ‘स्पेल’नंतरही सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्सला चार धावांनी मात खावी लागली.
विशाखापट्टनम- लेगस्पिनर अॅडम झंपाच्या (१९ धावांत ६ विकेट) अफलातून ‘स्पेल’नंतरही सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्सला चार धावांनी मात खावी लागली. महेंद्रसिंग धोनी आणि सहका-यांचा हा सलग दुसरा आणि ११ सामन्यांतील आठवा पराभव आहे.
मंगळवारी झालेल्या लढतीत हैदराबादच्या १३८ धावांचे माफक आव्हानही पुण्याला पेलवले नाही. फॉर्मात असलेला सलामीवीर अजिंक्य रहाणे (०) आल्यापावली परतला. ‘वनडाऊन’ जॉर्ज बेली (३४), चौथ्या स्थानी बढती मिळालेला अष्टपैलू आर. अश्विन (२९) तसेच मधल्या फळीतील कर्णधार धोनीने (३०) थोडा प्रतिकार केला तरी सुपरजायंट्सना ८ बाद १३३ धावा करता आल्या. त्यांना विजयासाठी चार धावा कमी पडल्या.
तत्पूर्वी, अॅडम झंपाच्या (४-०-१९-६) अचूक मा-यामुळे हैदराबादला ८ बाद १३७ धावा करता आल्या होत्या. झंपाचे परिश्रम वाया गेले तरी सामनावीराचा पुरस्कार त्यालाच मिळाला.
झंपाची कामगिरी ही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची टी-२०मधल सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. पुण्याला ११ सामन्यांतून तब्बल ८ पराभव पाहावे लागले. केवळ तीन सामने (६ गुण) जिंकलेला पुणे संघ गुणतालिकेत शेवटून दुस-या (सातव्या) क्रमांकावर फेकला गेला आहे.