कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बालचा अहंकार दुखावला गेल्याने त्याने मला मारहाण करून खंडणीची मागणी केली.
मुंबई – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बालचा अहंकार दुखावला गेल्याने त्याने मला मारहाण करून खंडणीची मागणी केली. दोन वर्षापूर्वी इक्बालने त्याच्या वाढदिवशी गैरसमजातून मला धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कदाचित त्याचा अहंकार दुखावला गेला होता. तेव्हापासून तो मला धमकावण्याच्या संधीची वाट पाहत होता, असा दावा तक्रारदार सलीम शेख यांनी ‘प्रहार’शी बोलताना केला.
शेखकडे तीन लाखांची खंडणीची मागितल्याप्रकरणी इक्बाल कासकरसह त्याच्या दोन साथीदारांना नुकतीच जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली होती. याविषयी अधिक माहिती देताना तक्रारदार शेख यांनी सांगितले की, ‘मी महाराष्ट्र इद्रीसी वेल्फेअर असोसिएशन सामाजिक संस्थेसाठी काम करतो. यात घरगुती भांडण, गैरसमजातून झालेले वाद मिटवण्याचे काम केले जाते. जे. जे. जंक्शनजवळील एका इमारतीत पहिल्या मजल्यावरील घरावरून दोन पाटर्य़ामध्ये वाद होता. तो सोडवण्यासाठी मी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना समोरासमोर बसवले व चर्चेतून हा वाद सोडवला. याची कागदपत्रेही बनवण्यात आली आहेत. त्यातील एका बाजूची ‘पार्टी’ हे प्रकरण घेऊन इक्बालकडे गेली. तिने मोबाईल नंबरही कदाचित इक्बालला दिल्याचा तक्रारदार शेख यांचा आरोप आहे.
यावरूनच इक्बालने मला बोलवून घेत ‘तू कंपनीच्या नावाने इतरांना धमकावत असल्याचे विचारले. त्याला नकार देत मी कोणाचेही नाव घेऊन कोणाला धमकावले नसून त्याच्या पडताळणीसाठी दोनही पाटर्य़ाना समोरासमोर बोलवावे, असे सांगितले. पण त्यांनी काहीही न ऐकता इक्बाल, शब्बू व त्यांच्या एका साथीदाराने मला मारहाणीस सुरुवात केली. त्यावेळी इक्बाल म्हणाला, तू इतके दिवस व्यवसाय करतोस, आम्ही तुझ्याकडे कधी काही मागितले नाही. पण आता तू तीन लाख रुपये आम्हाला दे!,
त्यानंतर जवळपास पाऊण तास मारहाणीनंतर मला थोडा वेळ द्या, असे त्याने सांगितले. इक्बालने आठवडाभरात पैशाची तजवीज करण्यास सांगितले. त्यानंतर ते मला सोडले. सोडण्यापूर्वी तू कुर्ला, मुंब्रा, विरार कुठेही जा. आम्ही तुला दोन मिनिटांत उचलू, अशी धमकीच इक्बालने दिल्याचे शेख यांने सांगितले. दोन वर्षापूर्वी एका व्यवहारासाठी आपण दिलेली दहा लाखांची आगाऊ रक्कम फ्लॅट विकणा-या व्यक्तीने परत करत व्यवहार रद्द केला होता. त्यावेळी इक्बालने मला बोलवून घेऊन तू कंपनीच्या नावाने त्यांना धमकावल्याबद्दल विचारले होते. त्यावेळी व्यवहार रद्द करणा-या व्यक्तीने सलीमभाई असे काहीही बोलले नसल्याचे सांगितले. मात्र तोंडघशी पडलेला इक्बाल तेव्हापासून आपल्याला कात्रीत पकडण्याच्या प्रयत्नात होता, असे शेखने सांगितले.