सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पेड न्यूज प्रकरणात महत्वाचा निकाल दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशोक चव्हाणांना दणका बसला आहे.
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पेड न्यूज प्रकरणात महत्वाचा निकाल दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशोक चव्हाणांना दणका बसला आहे. अशोक चव्हाणांनी पेड न्यूज प्रकरणात चौकशी विरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार आली तर, आयोगाला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. अशोक चव्हाणांनी निवडणूक आयोगाच्या चौकशी करण्याच्या अधिकारावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने आयोगाच्या बाजूने निकाल दिला. उमेदवाराने निवडणूक खर्चामध्ये जाहीरात खर्च दाखवला नसेल तर, आयोगाला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अशोक चव्हाणांच्या विरोधातील तक्रारीवर ४५ दिवसांच्या आत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. २००९ ची विधानसभा निवडणूक लढवणा-या अशोक चव्हाणांसाठी वर्तमानपत्रातून जाहीराती देण्यात आल्या होत्या. या निवडणूक खर्चावर त्यांच्या भोकर मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. माधव किन्हाळकर यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
निवडणूक आयोगाने सुरुवातीपासून हे प्रकरण गांर्भीयाने घेतले होते. चव्हाणांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारावर आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर चव्हाणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही आयोगाच्या बाजूने निकाल दिला. पेड न्यूज संदर्भातील अन्य तक्रारींवरही सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल मार्गदर्शक ठरणार आहे.