कुर्ल्यातील फिनिक्स मार्केट, सिटी मॉल येथे शनिवारी अमेरिकेच्या वाणिज्य कचेरीच्या वतीने अमेरिकेचा २३७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मुंबई- कुर्ल्यातील फिनिक्स मार्केट, सिटी मॉल येथे शनिवारी अमेरिकेच्या वाणिज्य कचेरीच्या वतीने अमेरिकेचा २३७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अमेरिकेचा इतिहास, स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व व या देशाची माहिती उपस्थितांना मिळावी यासाठी विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमात जवळपास दीड हजार भारतीय नागरिक व अमेरिकेच्या वाणिज्य कचेरीतील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते.
एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, बाजार, सिनेमागृह, मॉल अशा ठिकाणी असलेल्या लोकांना गोळा करून आनंदमेळावा किंवा विशेष छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्याची पद्धत अमेरिकेत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त फिनिक्स मार्केट, सिटी मॉलमध्ये याच पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेत अशाच पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. तसाच इथेही करावा असा मानस असल्याचे अमेरिका वाणिज्य कचेरीच्या सांस्कृतिक कार्यवाह अँजेला गेम्झा यांनी सांगितले. मॉलमध्ये आलेल्यांना अमेरिकेतील संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचेही त्या म्हणाल्या. या वेळी झालेल्या आईस्क्रीम खाण्याच्या ‘गोड’ स्पर्धेत लहानग्यांसोबतच मोठय़ांनीही भाग घेतला.
लहानग्यांसाठी ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा घेण्यात आली. यात इंग्रजी भाषेतील एखादा शब्द उच्चारून त्याचे स्पेलिंग लवकरात लवकर जो सांगेल त्याला बक्षीस देण्यात आले. लहान मुलांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला.
दुपारी दोन वाजता सुरू झालेले हे कार्यक्रम रात्री आठ वाजेपर्यंत जल्लोषात सुरू होते. या वेळी आयपॅडच्या माध्यमातून अमेरिकेतील प्रसिद्ध स्थळांची माहिती देण्यात आली. अमेरिकेचा इतिहास, नागरिकशास्त्र या विषयांवर एक प्रश्नोत्तर स्पर्धाही घेण्यात आली. त्यालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात मुंबईकरांनीही सहभाग घेऊन देश, संस्कृतीत फरक असला तरी स्वातंत्र्य हे सर्वानाच गरजेचे असल्याचा संदेश दिला.