काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी अमेठीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
लखनऊ – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी अमेठीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी गौरीगंज ते अमेठी जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंतच्या ४० कि.मी.च्या मार्गावर रोड शो केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल यांच्यासोबत त्यांच्या आई आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, बहिण प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वडेरा उपस्थित होते. राहुल यांनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही वयैक्तीक स्वरुपाची टिका केली नसल्याचे सांगितले.
मी मोदी यांच्याबद्दल कोणतेही वयैक्तीक स्वरुपाचे वक्तव्य केलेले नाही. मोदींनी यापूर्वी आपल्या विवाहाची माहिती दिली नव्हती एवढेच मी म्हटले. प्रियंका गांधी यांनीही राहुल यांचे समर्थन केले. राहुल यांनी फक्त नरेंद्र मोदींच्या प्रतिज्ञापत्रातील तथ्य लोकांसमोर मांडले असे प्रियंका म्हणाल्या.
२००४ आणि २००९ प्रमाणे याही वेळी निवडणूक पूर्व सर्वेक्षण चाचण्यांचे अंदाज पूर्णपणे चुकतील असा दावा राहुल यांनी केला. अमेठीमधून दोनवेळा खासदार राहिलेले राहुल गांधी येथून तिस-यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी येथे तिरंगी सामना आहे. भाजपक़डून स्मृती इराणी आणि आम आदमी पक्षाकडून कुमार विश्वास रिंगणात आहेत.