माथेरानकरांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला होता
माथेरान – माथेरानकरांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला होता. मात्र पावसाळी हवामान आणि दरडी कोसळण्याची भीती यामुळे या सेवेला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. परिणामी तारखांवर तारीख शोधणा-या या शटल सेवेच्या मुहूर्ताला पुन्हा एकदा 15 सप्टेंबरची तारीख मिळण्याची शक्यता आहे. नेरळ-माथेरान ही मिनी ट्रेन सेवा पावसाळयात तेथील हवामान आणि दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेऊन बंद ठेवण्यात येते.
मात्र पावसाळय़ात दैनंदिन वापराच्या वस्तूंची ने-आण करताना पडणारे कष्ट, आजारी तसेच वयोवृद्धांचे होणारे हाल यामुळे अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी अनेक वर्षे माथेरानकरांकडून करण्यात येत आहे. ही मागणी लक्षात घेऊनच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी पर्यटक आणि माथेरानकरांच्या सोयीसाठी शटल सेवेला हिरवा कंदील दिला होता. ही सेवा 15 ऑगस्टपासून सुरू होणार होती.
त्यासाठी 10 आणि 11 ऑगस्ट रोजी सुरक्षा चाचणीही घेण्यात आली. मात्र, माथेरानच्या दरीत दाट धुके पसरल्याने हा मुहूर्तही पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, पावसाचा जोर ओसरल्याने ही सेवा 15 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्या दृष्टीने 3 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली आहे. इतक्या संकटांनंतर तरी आता ही सेवा सुरू होईल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.