संसद हल्ल्याप्रकरणातील मुख्य आरोपी अफझल गुरुचे शव त्याच्या कुटुंबियांना देण्याची मागणी सरकारने फेटाळली आहे.
नवी दिल्ली – संसद हल्ल्याप्रकरणातील मुख्य आरोपी अफझल गुरुचे शव त्याच्या कुटुंबियांना देण्याची मागणी सरकारने फेटाळली आहे. अफझलला नऊ फेब्रुवारीला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती.
गृहमंत्रालयाच्या ज्येष्ठ अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भातला अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असून त्यानंतर जम्मू काश्मीर सरकारला सूचना देण्यात येतील. अफझलची बायको तब्बसूमने लिहिलेले पत्र बारामुल्लाहचे सहाय्यक आयुक्त यांच्याकरवी राज्य शासनाला पाठवले होते. त्या पत्रात अफझलचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात यावा अशी मागणी केली होती.
मात्र काश्मीर खो-यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अफझलचा मृतदेह कुटुंबियांना देण्यासाठी गृहमंत्रालयाने आक्षेप घेतला.
दरम्यान, अफझलचा मृतदेह कुटुंबियांना परत देण्यात आल्याच्या अफवा सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून रविवारी पसरल्या होत्या. तर अफझलच्या फाशीसंदर्भातली माहिती त्याच्या कुटुंबियांना उशीरा देण्यात आल्याबाबत पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. अफझलला फासावर चढवण्यापूर्वीच त्याच्या फाशीसंदर्भातील माहिती त्याच्या कुटुंबियांना आगाऊ कळवणे आवश्यक होते. मात्र गृहमंत्रालयाने त्याच्या कुटुंबियांना तशा कोणत्याही सुचना दिल्या नव्हत्या, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपली नाराजी व्यक्त केली.
अफझलचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्याचा नकार सरकारने दाखवला असला तरी तिहार तुरुंगात ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह पुरण्यात आला आहे, त्या ठिकाणी कुटुंबियांना नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र अफझलचा मृतदेह घेण्यासाठीच तुरुंगात जाऊ अशी ताठर भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतली आहे.