१ जुलै १९७२ पूर्वी सेवत आलेल्या १ हजार ६२२ अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी वित्त विभागाशी चर्चा करून त्यावर काही मार्ग काढता येईल का?
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/09/teachers.jpg)
मुंबई- १ जुलै १९७२ पूर्वी सेवत आलेल्या १ हजार ६२२ अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी वित्त विभागाशी चर्चा करून त्यावर काही मार्ग काढता येईल का? यावर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले.
राज्यातील अप्रशिक्षित शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आमदार नागो गाणार यांनीही उपप्रश्न उपस्थित केले होते.
१ जुलै १९७२ पूर्वी सेवेत आलेले राज्यात सुमारे १६२२ अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक आहेत. या शिक्षकांना सेवानिवृत्ती योजना लागू करण्याबद्दलचा प्रस्ताव शासन स्तरावर अमान्य करण्यात आला आहे. २०१२च्या विधिमंडळ अधिवेशनात सेवानिवृत्ती योजना लागू करण्याबाबत सभापतींनी निर्देशही दिले होते.
या अप्रशिक्षित शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा मोठा आहे. या शिक्षकाना सेवानिवृत्ती वेतन दिल्यास सुमारे ४५ कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. या शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन दिल्यास एमएसईबी, विद्यापीठ विभागाचे प्रश्न उपस्थित होतील. या प्रश्नासंदर्भात शिक्षण खाते सकारात्मक असून वित्त खात्याशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले.