गेल्या सहा दिवसांपासून विविध देशांच्या शोधपथकांनी तपास करूनही बेपत्ता मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही.
वॉशिंग्टन/क्वालालंपूर- गेल्या सहा दिवसांपासून विविध देशांच्या शोधपथकांनी तपास करूनही बेपत्ता मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे या विमानाचा घातपात झाल्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, बेपत्ता झाल्यानंतर हे विमान चार तास उडत असताना त्याने उपग्रहाला संदेश पाठवल्याचे आढळले आहे. त्यामुळे दक्षिण चीनचा समुद्र, मलाक्काच्या सामुद्रधुनीनंतर आता हिंदी महासागरात या विमानाचे शोधकार्य केले जाणार आहे.
विमान शोधण्यासाठी उपग्रहाने काढली सहा लाख छायाचित्रे »
हे विमान बेपत्ता झाल्यानंतर चार तास ते उडत होते. त्यामुळे हे कृत्य वैमानिकाने जाणूनबुजून केले असावे, असा अमेरिकी अधिका-यांचा कयास आहे. तसेच विमानाचे अपहरण करण्याचा किंवा आत्महत्या करण्याचा वैमानिकाचा हेतू असावी, अशी शक्यता आहे.
विमान बेपत्ता झाल्याची चौकशी होण्याची शक्यता असल्याने वैमानिकाने आत्महत्या केली असावी. तसेच त्याने सर्व संपर्क यंत्रणा बंद केली असावी. तसेच हिंदी महासागरात डाटा रेकॉर्डस् मिळण्याची शक्यता कमी असेल. त्यामुळे या घातपाताचे कारण समजू शकणार नाही, त्यामुळे वैमानिकाने हे विमान हिंदी महासागरात नेले असावे, अशी शंका ऑस्ट्रेलियन आणि आंतरराष्ट्रीय वैमानिक असोसिएशनचे सदस्य माइक ग्ल्यान यांनी व्यक्त केली.
हे विमान हिंदी महासागरात बुडाल्याची शक्यता अमेरिकेच्या संरक्षण आणि हवाई तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे अमेरिकेच्या ‘यूएसएस किड’ या युद्धनौकेला मलाक्काच्या सामुद्रधुनीतून हिंदी महासागरात जाण्याचे आदेश दिले आहेत, असे पेटॉँगॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जेफ्री पूल यांनी सांगितले.