अनुदान जमा होण्यासाठी लाभार्थीचे बँकेत संयुक्त खाते (जॉइंट अकाउंट) उघडणे आवश्यक असताना आतापर्यंत एकही खाते उघडण्यात आलेले नाही, अशी धक्कादायक माहिती आहे.
मुंबई- लाभार्थीचे अनुदान थेट बँकेतील त्यांच्या खात्यात जमा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली. रेशनचा फायदा मिळण्यासाठी यंत्रणेने राज्यभरात चार जिल्ह्यांत लाभार्थीची बँकेत खाती उघडण्यास सुरुवातही केली. पण मुंबई मात्र यात अद्याप पिछाडीवरच आहे. शिवाय थेट अनुदानासाठी ज्या आधार कार्डची जोड दिली जाणार आहे, ते आधार कार्ड मुंबईत फारच थोडय़ा लाभार्थीपर्यंत पोहोचले आहे. या परिस्थितीत लाभार्थीना अनुदान थेट बँकेतील खात्यात जमा होण्यासाठी आधारचा आधारही नसेल, असेच चित्र आहे. तर दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी अनुदान जमा होण्यासाठी लाभार्थीचे बँकेत संयुक्त खाते (जॉइंट अकाउंट) उघडावे, असे आदेश देण्यात आले होते. पण आतापर्यंत एकही खाते उघडण्यात आलेले नाही, अशी धक्कादायक माहिती आहे.
आधारकार्ड मिळालेले आहे अशा पात्र लाभार्थीचीच थेट अनुदानासाठी बँक खाती उघडली जाणार आहेत. मात्र मुंबईत आधारकार्ड मिळालेले लाभार्थीही संख्येने कमी आहेत. रेशनचा फायदा मिळण्यासाठी अन्न व नागरीपुरवठा विभागाने थेट अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील मुंबई व उपनगर, वर्धा, नंदुरबार, पुणे, अमरावती हे पाच जिल्हे निवडले. तीन महिन्यांपूर्वीच या जिल्ह्यांत बँक खाती उघडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अमरावती ५० टक्के, नंदुरबार ७१ टक्के, पुणे १३ टक्के, वर्धा ७१ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत ही प्रक्रिया सुरूच झालेली नाही.
आधारकार्ड मुंबईसह राज्यभरातील सर्व जिल्ह्यांत नेण्यास दोन महिन्यांत गती येईल. सरकारी यंत्रणांचा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लाभार्थीपर्यंत थेट अनुदान योजना पोहोचाव्यात यासाठी आधार केंद्रे, यंत्रसामुग्री व कर्मचारी वर्गही वाढवण्यात येणार आहे. नव्या वर्षात याला नक्कीच गती येईल. – राजेश अग्रवाल, प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग
मुंबईत आधारकार्ड ६७ लाख म्हणजेच ६० टक्के नागरिकांना मिळाले अशी सरकारी आकडेवारी आहे. यातील ४५ टक्के थेट अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत. मुंबईतील झोपडपट्टीत रॉकेलचा फायदा घेणारे ६० टक्के शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना ही योजना नेमकी काय आहे, याची माहितीच नाही. आधारकार्ड देण्यासाठी मुंबईत सुरू असलेली केंद्रे नेमकी कुठे याची माहितीही झोपडपट्टय़ांतून राहणा-यांना नाही. पहिला टप्प्यात त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही, दुसरा टप्पाही धीम्या गतीनेच सुरू आहे. हा टप्पा आता हाउसिंग सोसायटय़ांसाठी राबवण्यात येणार आहे. त्यामुळे दुस-या टप्प्यातही झोपडपट्टीत राहणारे लाभार्थी आधारकार्डला मुकण्याचीच शक्यता आहे.
रॉकेलचे थेट अनुदान मिळण्यासाठी मुंबईत लाभार्थीचे बँक खाते उघडण्याची प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. संबंधितांना याची माहिती मिळण्यासाठी रेशन यंत्रणेकडून जनजागृती करण्यात येईल. – अश्विनी जोशी, शिधावाटप नियंत्रक.