अनुदानित (सबसिडी) सिलिंडरची संख्या वर्षाला सहापर्यंत मर्यादीत करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयाने सर्वसामान्यांना झटका देणारा आहे. मात्र एकत्र कुटूंबांना तेल कंपन्या अनुदानित कोटयात अपवाद करण्याच्या विचारात आहेत.
मुंबई – घरगुती वापराच्या अनुदानित (सबसिडी) सिलिंडरची संख्या वर्षाला सहापर्यंत मर्यादीत करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयाने सर्वसामान्यांना झटका देणारा आहे. लाखो कुटूंबांचे महिन्याचे बजेट यामुळे कोलमडणार असले तरी, एकत्र कुटूंबासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्या अनुदानित कोटयाच्या बाबतीत एकत्र कुटूंबांना अपवाद करण्याच्या विचारात आहेत. तुम्ही विवाहीत आहात, आई-वडील भावंडासोबत रहात असाल तर तुमचा वर्षाचा अनुदानित सिलिंडरचा कोटा दुप्पट होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला सहाऐवजी बारा सिलिंडर मिळू शकतात. फक्त अट एकच आहे. तुम्हाला दोन स्वतंत्र स्वयंपाक घर दाखवून त्यावर अन्न शिजवले जाते हे संबंधित तेल कंपनीला पटवून द्यावे लागेल. महिन्याचा जमा-खर्च जुळवात-जुळवात नाकीनऊ आलेल्या एकत्र कुटूंबासाठी ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे.
‘एक घर एक गॅस जोडणी’ या सरकारच्या धोरणांतर्गत एकापेक्षा जास्त गॅस जोडण्या बेकायद ठरतात. एकाच छताखाली दोन वेगवेगळी स्वयंपाक घरे जेवण बनवण्यासाठी वापरली जात असल्याचे एकत्र कुटूंबांनी पटवून दिले तर तेल कंपन्या सबसिडीच्या कोटयात अपवाद करण्याचा विचार करु शकतात.
एकाच घरातील दोन किचनसाठी दोन वेगवेगळया तेल कंपन्यांच्या गॅस जोडण्या ग्राहक घेऊ शकतात. तेल कंपनीचे समाधान झाले तरच ही मुभा मिळू शकते. तसेच तेल कंपनीचा वितरक स्वत: पाहणी करुन खातरजमा करेल असे तेल कंपनीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.