काशीमीरा परीसरातील अनधिकृत बांधकामे तसेच माती भराव प्रकरणी गेल्या काही दिवसांमध्ये महापालिकेने एमआरटीपी कायद्याअंतर्गत ५१ जणांविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात एमआरटीपीचे ८ गुन्हे दाखल केले आहेत.
भाईंदर – काशीमीरा परीसरातील अनधिकृत बांधकामे तसेच माती भराव प्रकरणी गेल्या काही दिवसांमध्ये महापालिकेने एमआरटीपी कायद्याअंतर्गत ५१ जणांविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात एमआरटीपीचे ८ गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये टाटा पॉवरच्या अधिका-यांचाही समावेश आहे. प्रभाग समिती क्र. ६च्या अखत्यारित येणा-या महाजन वाडी, पेणकर पाडा, मांडवी पाडा, डाचकुल पाडा, माशाचा पाडा, काजू पाडा, चेणे , वरसावे आदी भागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. यापैकी बहुतांशी बांधकामे आदिवासींच्या जमिनींवर तसेच ना विकास क्षेत्रात आहेत.
प्रभाग अधिकारी दादासाहेब खेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार चेणा नदीपात्रात माती भराव केल्याप्रकरणी महसूल विभाग कारवाई करत नसताना पालिकेने शौकत खान व अन्य अज्ञात आरोपीविरोधात एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला. दोन वेळा अनधिकृत बांधकामे तोडूनही पुन्हा बांधकाम केल्याने अरुणकुमार कृपाशंकर श्रीवास्तव, देवनारायण लक्ष्मण ठाकूर व अन्य दोघा जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तसेच काशीगाव परीसरात अनधिकृत बांधकामे करणा-या देवनाथ मुन्नर पालसह अन्य १० जण, दिनेश ओमप्रसाद मिश्रा व त्याचे १० सहकारी तसेच अन्य ५ जण , मुकेश विश्वनाथ सिंग व त्याचे १० सहकारी आणि अन्य २ जणांविरोधात एमआरटीपीचा गुन्हा दाखल केल्याचे खेत्रे म्हणाले. येथेही अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचे खेत्रे यांनी सांगितले.
दरम्यान काशी येथील क्लासिक स्टुडिओच्या जागेत ना विकास क्षेत्रात टाटा पॉवरने अनधिकृत विजेचे उपकेंद्र बांधल्या प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास परिसरातील रहिवाशांनी विरोध केला. त्यातच स्थानिक भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांनी तर थेट खेत्रे यांच्या दालनाबाहेर रहिवाशांसह ठिय्या आंदोलन करून कारवाईला विरोध केला.
दरम्यान खेत्रे यांनी या प्रकरणी टाटा पॉवरचे अधिकारी व्ही. टी. नारायणन, विकास जोशी, मिलिंद राणेंसह जागा मालक मनोज बी. चौहान, क्लासिक स्टुडिओचे संचालक अनिल सरदाना यांच्यावर काशीमीरा पोलीस ठाण्यात एमआरटीपीखाली गुन्हा दाखल केला.