मुंबई वाहतूक पोलिस या वर्षीही अनधिकृत पार्किंग व डबल पार्किंग गांभीर्याने घेणार असून, याविरोधात मोहीम तीव्र करणार आहेत.
मुंबई – मुंबई वाहतूक पोलिस या वर्षीही अनधिकृत पार्किंग व डबल पार्किंग गांभीर्याने घेणार असून, याविरोधात मोहीम तीव्र करणार आहेत. मागील वर्षी नो-पार्किंगमध्ये उभ्या करण्यात येणा-या चार लाख ६९ हजार वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यातून ४ कोटी १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबईत सध्या दररोज पाच हजार वाहनांची भर पडत असल्यामुळे पार्किंगची सुविधा गंभीर बनली आहे.
रस्त्यावर गाडय़ा उभ्या करणे, डबल पार्किंग करण्यासारखे प्रकारही वाढले आहेत. याचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर होत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. २०१३ प्रमाणे या वर्षीही वाहतूक पोलिस नो पार्किंग व डबल पार्किंगविरोधात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती उपायुक्त वाहतूक (उपनगर) प्रताप दिघावकर यांनी दिली. या शिवाय गेल्या वर्षी ड्रायव्हिंग क्लासेस, शोरूमबाहेर बेकायदा उभ्या करण्यात आलेल्या वाहनांविरोधातही कारवाई करण्यात आली. या वर्षीही अशीच कारवाई करण्यात येणार आहे. गेल्योवर्षी अनधिकृत पार्किंगविरोधात केलेल्या कारवाईमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात पोलिसांना बरेच यश आले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत ४७ हजार ५६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, यातून ४१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.