भारतातील खाणसम्राट अदानीचा ऑस्ट्रेलियातील २७ अब्ज ७० कोटी डॉलरच्या कोळसा खाण प्रकल्पाला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे.
मेलबोर्न – भारतातील खाणसम्राट अदानीचा ऑस्ट्रेलियातील २७ अब्ज ७० कोटी डॉलरच्या कोळसा खाण प्रकल्पाला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. या कोळसा खाणीचे पारंपरिक मालक गॅलिली बेसिन कंपनीने क्वीन्सलँड सरकारने अदानीला भाडेतत्त्वावर खाणी देण्याच्या कराराला न्यायालयात आव्हान दिले आहे.
वँगन अँड जगालिंगू (डब्ल्यू अँड जे) या प्रातिनिधिक समूहाने या कराराविरुद्ध ऑस्ट्रेलियातील फेडरल न्यायालयात याचिका दाखल केली आहे. क्वीन्सलँडचे खाणमंत्री अँथनी लिनहॅम यांनी खाणी भाडेतत्त्वावर देण्याचे केलेले करार योग्यरीत्या केलेले नाहीत, असा आरोप याचिकेत केला आहे.
डब्ल्यू अँड जे प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत अदानींना कंत्राट देण्यात आले तसेच अगोदरही या भूमीचा वापर अदानींना करू देण्यास तीन वेळा परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही त्यांनाच लीजवर खाणी देण्यात आल्या, असे याचिकेत म्हटले आहे. सर्व वैधानिक आवश्यकता पूर्ण झाल्यावरच आपण लीजचा विचार करू, असे लिनहॅम यांनी १५ ऑक्टोबरला जारी केलेले पत्रही डब्ल्यू अँड जेने प्रसिद्धीस दिले आहे.
डब्ल्यू अँड जेचे प्रवक्ते अॅड्रियन बुरागब्बा यांनी सांगितले की, हा भयंकर प्रकल्प आम्ही तीन वेळा नाकारला आहे. त्यामुळे पारंपरिक मालकांचा हक्क डावलून आपल्या सत्तेचा वापर करून अदानींना ही खाण देण्याचा प्रकार लज्जास्पद आहे. फेडरल न्यायालयाच्या न्यायिक आढाव्याचा निकाल बाहेर येईपर्यंत आपण लीजबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे लिनहॅम यांनी आम्हाला पत्र पाठवून कळवले होते.
आताचा त्यांचा हा निर्णय म्हणजे आमची केलेली फसवणूक आहे, असा आरोप बुरागब्बा यांनी केला आहे. लिनहॅम यांचा निर्णय हा क्रूर राजकारणाचा आहे, असेही ते म्हणाले.