पुण्यापाठोपाठ मुंबईतही काही सेलिब्रेटींना मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले.
मुंबई – पुण्यापाठोपाठ मुंबईतही काही सेलिब्रेटींना मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. सिनेअभिनेता अतुल कुलकर्णी, वंदना गुप्ते या सेलिब्रेटी मतदारांना मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही.
चांदीवली विधानसभा मतदारसंघातील संदेशनगर, बैलबाजार या परिसरातील अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. त्यामुळे येथील नागरिकांना मतदान करता आले नाही. चांदीवलीमध्ये काही मतदारांनी या विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलनही केले.
मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच मतदान करता येईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी कालच स्पष्ट केले होते. पुण्यामध्येही जवळपास लाखभर नागरीकांची नावे मतदार यादीतून गायब झाली होती. पुण्यात अमोल पालेकर, सलील कुलकर्णी या सेलिब्रेटींना मतदान करता आले नव्हते. पुण्यातील मतदारांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.