मद्यपानामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. मात्र, तरीही मद्यपानाची चटक लागलेल्या व्यक्तींना ही सवय सोडवत नसते. यासाठी हे मद्यपी कारणीभूत नसून त्यांच्या शरीरातील जनुकांमुळे असे घडत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.
मद्यपानामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. मात्र, तरीही मद्यपानाची चटक लागलेल्या व्यक्तींना ही सवय सोडवत नसते. यासाठी हे मद्यपी कारणीभूत नसून त्यांच्या शरीरातील जनुकांमुळे असे घडत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. मद्यपानाच्या वृत्तीत वाढ करण्यासाठी कारणीभूत असलेल्या ३९ जनुकांच्या समूहाचा संशोधकांनी शोध लावला आहे. विविध कुटुंबे आणि जुळ्या व्यक्तींचा अभ्यास करून त्यांनी मद्यपी वृत्तीमध्ये वाढ होण्यासाठी ही जनुके कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. मात्र, अतिशय गुंतागुंतीच्या असलेल्या या समस्येला शेकडो जनुके कारणीभूत आहेत. यापैकी प्रत्येक जनुकाचा अतिशय अल्प प्रमाणात या समस्येमध्ये सहभाग आहे.
जिनोम वाइड असोसिएशन स्टडीज (ग्वास) या संशोधनाच्या आधारे आयोवा काव्र्हर महाविद्यालय आणि येल वैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.त्यांच्या संशोधनात त्यांनी मद्यपानाच्या समस्येला प्रामुख्याने कारणीभूत असलेल्या ३९ जनुकांच्या समूहाचा शोध लावला आहे. या शोधामुळे मद्यपानाची समस्या निर्माण करणाऱ्या जीवशास्त्रीय यंत्रणांच्या अभ्यासाची नवी दालने खुली होण्याची अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.
इतर जनुकेही या समस्येला कारणीभूत असली तरी या जनुकांमधील प्रथिने परस्परांपासून वेगळी नसल्याने ती एक समूह म्हणून काम करत असतात. त्यामुळे या जनुकांनी निर्माण केलेली प्रथिने एकमेकांचे शेजारी किंवा एकाच जीवशास्त्रीय मार्गाचा भाग असू शकतात. त्यांचा परस्परांशी असलेल्या संबंधांचा विचार करून या जनुकांचे जाळे कशा प्रकारे एकमेकांना प्रतिसाद देते व एकत्रितपणे मद्यपी वृत्तीला चालना देते याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा वापर मद्यपींना मद्यपानापासून परावृत्त करण्यासाठी केला जाणार आहे.