ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र मिळाले आहे. गेल्या दहा दिवसांतील धमकीचे हे दुसरे पत्र आहे.
मुंबई – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र मिळाले आहे. गेल्या दहा दिवसांतील धमकीचे हे दुसरे पत्र आहे. धमकीच्या पत्रामुळे अण्णांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
या पत्रावर महादेव पांचाळ, लातूर असे लिहिलेले असून उस्मानाबाद येथील पोस्टाचा शिक्का असल्याचे हजारे यांचे निकटवर्तीय दत्ता अवारी यांनी सांगितले.
दहा दिवसांपूर्वीच अण्णांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांशी संबंध ठेवून नका अशी धमकी त्या पत्रात देण्यात आली होती. सात ऑगस्टची तारीख त्या पत्रावर होती. तसेच अण्णांनी राळेगण सिद्धीमध्येच रहावे असेही पत्रातून सांगण्यात आले होते.
या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानानुसार कलम ५०६ अंतर्गत गुन्हाही दाखल कऱण्यात आला होता.
दरम्यान, मला धमक्या काही नवीन नाहीत. कितीही धमक्या आल्या तरी मी माझे राष्ट्रहिताचे काम सुरु ठेवणार असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली आहे.