पाकिस्तानचा ऑफस्पिनर सइद अजमलची गोलंदाजी शैली पुन्हा संशयास्पद आढळली आहे.
गॉल- पाकिस्तानचा ऑफस्पिनर सइद अजमलची गोलंदाजी शैली पुन्हा संशयास्पद आढळली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अजमलच्या गोलंदाजी शैलीबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यासंदर्भात सामनाधिका-यांनी अजमलचे किती आणि कोणते चेंडू संशयास्पद आढळले त्याची यादी आयसीसीला दिली आहे.
आता येत्या २१ दिवसांत त्याला त्याची गोलंदाजी शैलीबाबतची चाचणी द्यायची आहे. अर्थातच त्या चाचणीचा निकाल येईपर्यंत अजमल गोलंदाजी करू शकतो. ते पाहता श्रीलंकेविरुद्ध येत्या गुरुवारपासून सुरू होणा-या दुस-या कसोटीत अजमल खेळेल.
दरम्यान, अजमलची गोलंदाजी शैली निर्दोष सिद्ध होईल, असा विश्वास पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक मोइन खान यांनी व्यक्त केला. अजमलची गोलंदाजी शैली यापूर्वी २००९मध्ये संशयास्पद आढळली होती. त्याचा ‘दुसरा’ चेंडू वादग्रस्त ठरला होता. मात्र आयसीसीने अखेर अजमलला निर्दोष ठरवले. यावर्षी मे महिन्यातही स्टुअर्ट ब्रॉडने ट्विटरद्वारे अजमलच्या गोलंदाजी शैलीबाबत आक्षेप घेतला होता. अजमल सध्या पाकिस्तान संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू आहे.