नरिमन पॉइंट येथील अग्निशमन केंद्रातील जवान किशोर जाधव यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी केंद्र अधिकारी सचिन तळेकर यांना अखेर गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई –नरिमन पॉइंट येथील अग्निशमन केंद्रातील जवान किशोर जाधव यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी केंद्र अधिकारी सचिन तळेकर यांना अखेर गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे. तळेकर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असून, तोपर्यंत त्यांना निलंबित केल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी सुहास जोशी यांनी दिली.मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वर्दीची माहिती नरिमन पॉइंट येथील अग्निशमन केंद्राच्या नोंदवहीत करण्यात आली होती. मात्र, त्यात करण्यात आलेल्या खाडाखोडीची माहिती जाधव यांनी फेसबुकवर टाकल्याचा संशय घेत तळेकर यांनी त्यांना दोन दिवसांपूर्वी मारहाण केली होती. यात त्यांना जबर दुखापत झाल्याने त्यांच्यावर जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मनसेचे चेतन कदम यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत, संबंधित अधिका-यावर कोणती कारवाई केली, अशी विचारणा केली होती. त्यानंतर गुरुवारी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेच्या सरचिटणीस श्रद्धा जाधव आणि कार्याध्यक्ष शरद कुवेसकर, मुंबई फायर सव्र्हिसचे महाबळ शेट्टी यांच्या शिष्टमंडळाने मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी सुहास जोशी यांची भेट घेऊन तळेकर यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली.
यावेळी जोशी यांनी लढाऊ कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर सहआयुक्त एस. एस. शिंदे यांनी तळेकर यांच्या निलंबन आदेश दिले आहेत. तळेकर यांच्याविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना बडतर्फ करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे जोशी यांनी
स्पष्ट केले.