प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार आणि अजित झा यांना आता पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समिती त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीतून डच्चू मिळाल्यानंतर प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार आणि अजित झा यांना आता पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या चौघांची शिस्तपालन समितीने पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोमवारी रात्री उशिरा चौघांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली.
या चौघांनी पक्षातील अरविंद केजरीवाल यांच्या एकाधिकारशाही विरोधात आवाज उठवला होता. मागच्या आठवडयात या चौघांनी गुरगावमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पक्षविरोधी ठरवत त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि आनंद कुमार यांनी या नोटीशीला उत्तर दिले तर, झा यांनी दिलेल्या मुदतीत नोटीशीला उत्तर दिले नाही. तिघांचेही खुलासे समाधानकारक नसल्याचे सांगत अखेर शिस्तपालन समितीने चौघांची पक्षातून हकालपट्टी केली.