म्हाडाच्या सोडतीत अपंग प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणातील ४९ घरांची स्वतंत्र सोडत नव्या वर्षात १० जानेवारीला काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
मुंबई – म्हाडाच्या सोडतीत अपंग प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणातील ४९ घरांची स्वतंत्र सोडत नव्या वर्षात १० जानेवारीला काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. ऑनलाइन अर्ज व इतर प्रक्रिया डिसेंबरच्या दुस-या आठवडय़ापासून सुरू होईल. सोडतीसाठी सातही प्रवर्गाचा यामध्ये समावेश केला जाणार आहे.
या सोडतीसाठी पूर्ण अंधत्व, कमी दृष्टी, कर्णबधीर, अवयवयांतील कमतरता, गतीमंदत्व, मनोविकृती अशा सातही प्रवर्गातील व्यक्ती या सोडतीसाठी अर्ज करू शकणार असून, सोडतीसाठी म्हाडाचे नियम लागू असणार आहेत. अपंग व्यक्तींसाठी कलम २नुसार सर्व ठिकाणी ३ टक्के आरक्षण असताना म्हाडाच्या सोडतीत फक्त दोनच टक्के आरक्षण देण्यात येत होते. तसेच म्हाडा कायद्यातील नियमानुसार अंध, अपंग आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असे तीनच प्रवर्ग यात होते. त्यामुळे इंडिया सेंटर फॉर ह्युमन राइटस अँड लॉ या संस्थेने २००९मध्ये जनहित याचिका केली होती.
त्यावर खंडपीठाने अपंग व्यक्तींची व्याख्या बदलून प्रवर्ग वाढवण्याचे निर्देश दिले होते. निर्णय होईपर्यंत सोडतीतील एकूण घरांपैकी १ टक्का घरे राखून ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार म्हाडाने २०११च्या सोडतीतील ४१ व २०१२च्या सोडतीतील ८ घरे अशी ४९ घरे राखून ठेवली होती. म्हाडाने २०१३ व २०१४च्या सोडतीतील तीन टक्क्यांप्रमाणे ३ टक्के आरक्षण आणि नव्याने निश्चित केलेल्या प्रवर्गानुसारच सोडतीत घरांचा समावेश केला आहे.