New year celebration : नवीन वर्षाचे सेलिब्रेशन

Share
  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर…
जुन्या वर्षाच्या सांगतेचा क्षण आणि नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल हे वळण असंच काहीसं असतं का, की जिथे क्षणभर विसावून गत काळाचा मागोवा आणि भविष्याचा वेध घ्यायचा असतो? आधी ठरवलेलं जे काही करायला जमलं नाही तेच पुन्हा नव्याने किंवा त्यापेक्षा आणखी काही नवं करण्याचा विचार करणं म्हणजेच नवीन वर्षाला सामोरं जाणं नव्हे का?

नाहीतर नवीन वर्ष येतं आणि जातं. नवीन वर्ष येतं म्हणजे नेमकं काय होतं? तर भिंतीवरचं कॅलेंडर बदलतं, डायरीची पानं फडफडतात… आपण सेलिब्रेशन करतो… शुभेच्छांची देवाण-घेवाण करतो… बस्स!

परवा दिवशी आमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये नव वर्षात कोण कोण काय काय नवीन संकल्प करणार याच्या नेहमीप्रमाणेच जोरदार चर्चा रंगल्या होत्या. एकीने म्हटलं, “नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवार आहे. म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आणि आठवड्याचा पहिला दिवस एकाच दिवशी आलाय. इतका सुंदर योगायोग मी थोडीच सोडणार आहे? बघाच तुम्ही आता रोज लवकर उठून वॉकला जाते की नाही आणि आणि एकदम कशी फिट्ट होते की नाही ते!” याबरोबर तिथे एकच हशा पिकला. कारण फिटनेसचा हा संकल्प दरवर्षी न चुकता जाहीर करणं आणि सोबत काहीतरी योगायोगही जोडून त्याला फिट्ट करणं हा तिचा आवडता छंद झालेला होता. अर्थात आपणही सारेच असे काही ना काही संकल्प निदान मनाशी तरी करतच असतो. त्यातले पूर्ण किती होतात हा भाग वेगळा! पण संकल्प करायला काहीतरी निमित्त हवं असतं, तेवढं मात्र आपल्याला नववर्षामुळे सहज मिळून जातं.

वास्तविक नवीन वर्ष म्हणजे विशाल कालचक्राचा एक छोटासा तुकडा. आपणच आपल्या सोयीने ठरवलेला. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपूर्वीचा एक सेकंद आणि नंतरचा म्हणजे नववर्षातील जानेवारी महिन्याचा पहिला सेकंद यात तसा काय फरक असतो हो? म्हटलं तर काहीच नाही. आपल्या जगण्यातही त्यामुळे फार फरक पडत नाही. पण तरीही आपण त्या क्षणाला खूप महत्त्व देतो, तो धुमधडाक्याने साजरा करतो. कारण तो कालचक्राच्या वाटेतला एक विसावा असतो. रोजचा दिवस तोच. आपणही तेच. जे काम आपण रोज करतो तेच एक तारखेलाही करणार असतो. तरीही सारं जग नवीन वर्षाच्या नवीन कोऱ्या दिवसाची वाट बघत अनेक नवी स्वप्नं पाहात असतं. अर्थात यात गैर काहीच म्हणता येणार नाही. कुठल्याही गोष्टीची सुरुवात होणं महत्वाचं असतं. कारण तीच आपल्याला सकारात्मकतेच्या पाऊलवाटेकडे घेऊन जाते. नवीन वर्षातही रोजच्यासारखाच सूर्य उगवतो आणि आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत चालत असतो. पण तरी नवीन वर्ष मनात एक आस घेऊन उगवतं. दररोजचा तोच सूर्य आशेची नवी किरणं घेऊन येतो.

यावर्षी नवं काहीतरी घडणार आहे, आपण काहीतरी नवीन घडवणार आहोत ही ती आस असते. तसाही माणूस हा नेहमीच उद्याच्या आशेवर जगत असतो.

कॅलेंडरची पानं बदलली तरी दैनंदिन काम तेच असतं. पण त्यातही आपण नवीन वर्षाचा दाखला देऊन म्हणतो की आता वेगळं काहीतरी होणार आहे, मी नवं काहीतरी करणार आहे. आणि हा सकारात्मक दृष्टिकोन चांगलाच आहे. कारण तो आपल्याला आयुष्याशी घट्ट बांधून ठेवतो. त्यामुळे सरत्या वर्षाच्या भल्या-बुऱ्या अनुभवातून शिकून समजून, पुन्हा त्याच त्याच चुका न करता नव्या उमेदीने काम करण्याचा संकल्प केला तर ते नवीन वर्षाचं खरं सेलिब्रेशन ठरेल. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणून समोरच्या माणसाबरोबर माणुसकीने वागणं, प्रामाणिकपणे काम करून यश मिळवणं, मनात कोणाबद्दलही आकस न ठेवता प्रेमाने राहण्याचं मोल ओळखणं म्हणजेच नवीन वर्षाला सामोरे जाणं. नवीन वर्ष सेलिब्रेट करायला आजकाल बहुतेक जण हाॅटेल किंवा रिसाॅर्टवर जातात. गेट-टुगेदर करतात. नववर्षाच्या पार्ट्या ही तर आज एक मोठी इव्हेंट बनली आहे. हरकत नाही. प्रत्येकाला आपापल्या मनाप्रमाणे आनंदी राहण्याचा हक्क आहे. पण यानिमित्ताने दुसऱ्यांच्या आनंदाचाही विचार करायला हवा. नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी यांच्याप्रमाणेच आपल्या अवतीभवतीच्या दीन दुर्बल, गोरगरीब, अंध-अपंग व वंचित समाजाची सुखदुःखं समजून घेत त्यांना यथाशक्ती मदत करायला हवी. चला तर मग, येणाऱ्या नवीन वर्षात आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेऊ या कारण तेव्हाच नवीन वर्ष आपल्याला नावीन्यतेने भेटेल आणि खऱ्या अर्थानं ते साजरं केल्याचा नवा आनंदही आपल्याला मिळेल.

Tags: new year

Recent Posts

झोपताना AC किती डिग्रीवर ठेवावा? जाणून घ्या

मुंबई: सध्या देशभरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. भीषण उन्हाने साऱ्यांचीच काहिली केली आहे. त्यातच एसीमध्ये…

33 mins ago

Mumbai Rains:घाटकोपर दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू, मृतांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

मुंबई: मुंबईत सोमवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत आलेल्या धुळीच्या वादळाने तसेच अवकाळी पावसाने…

2 hours ago

IPL 2024: राजस्थानला मोठा झटका, जोस बटलर नाही खेळणार पुढील सामने

मुंबई: राजस्थान रॉयल्सचा(rajasthan  सलामीचा फलंदाज जोस बटलरने संघाला मोठा झटका दिला आहे. आता बातमी येत…

3 hours ago

Mumbai Rain : अवघ्या क्षणाचा पाऊस अन् जीव जाण्याची चाहूल

जाणून घ्या कुठं-कुठं काय घडले? मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातले…

3 hours ago

Jioने आणला नवा प्लान, मिळणार डेटा, कॉलिंग आणि १५हून अधिक OTT

मुंबई: जिओने एक नवा प्लान सादर केला आहे. हा Ultimate streaming plans आहे. हा पोस्टपेड…

4 hours ago

Loksabha Election : पैसे द्या,मग मत देतो ; आंध्र प्रदेशात मतदारांची अजब मागणी

नवी दिल्ली : सध्या देशभरात चौथ्या टप्प्याचे मतदान उत्साह पाहायला मिळाले. परंतु, आंध्र प्रदेशमधील पलानाडूच्या…

4 hours ago