Share

अमृता वाडीकर

आयपीएल म्हणजे क्रिकेटसोबतच मनोरंजनाचा तडका. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याची प्रचिती वारंवार येत असते. म्हणूनच क्रिकेट चाहतेही आयपीएलची आतुरतेने वाट बघत असतात. यंदाचं आयपीएल अनेक अर्थांनी वेगळं असणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दहा संघ एकमेकांना भिडणार आहेत. काही संघांचे कर्णधार बदलले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मार्च महिना सुरू झाला की, क्रिकेट चाहत्यांना वेध लागतात ते आयपीएलचे. आयपीएलसारखं वलय अन्य कोणत्याही लीग स्पर्धेला लाभलं नाही. २००८ मध्ये पहिली आयपीएल पार पडल्यानंतर या स्पर्धेच्या लोकप्रियतेचा आलेख सतत चढाच राहिला आहे. या स्पर्धेत होणारी चौकार, षट्कारांची बरसात, अखेरच्या षट्कापर्यंत रंगणारे सामने, पराभवाच्या छायेत असणाऱ्या संघाने अखरेच्या क्षणी मारलेली बाजी यामुळे प्रेक्षक आपसूकच या स्पर्धेकडे आकर्षित होतात. आयपीएल सुरू झाल्यानंतरचा दीड महिना कसा संपतो, हे क्रिकेट चाहत्यांना कळतही नाही. प्रत्येक संघाच्या, खेळाडूच्या कामगिरीचं विश्लेषण होत असतं. स्पर्धेचं विजेतेपद कोण पटकावणार, याबाबतचे ठोकताळे बांधायला सुरुवात होते. एकंदरित काय तर, या काळात अवघं क्रिकेटविश्व आयपीएलमय झालेलं असतं. सगळीकडे उत्सवाचा, आनंदाचा आणि उल्हासाचा माहोल असतो. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्रेक्षकांना काही तरी वेगळेपण अनुभवायला मिळतं.

गेली दोन वर्षं आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या सावटाखाली पार पडली. २०२० मध्ये ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत रंगली. मागील वर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवावे लागले. मात्र यंदा ही स्पर्धा भारतात रंगत आहे. कोरोनामुळे कोणताही गोंधळ होऊ नये आणि स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. खेळाडूंना फार प्रवास करावा लागू नये, यासाठी सर्व साखळी सामने मुंबई, नवी मुंबई तसंच पुण्यातल्या मैदानात रंगणार आहेत. यासोबतच यंदाच्या आयपीएलमध्ये बरंच काही नवं पाहायला मिळणार आहे. नव्या संघांच्या समावेशामुळे चुरस अधिक वाढणार आहे. अनेक संघांचे कर्णधार बदलले आहेत. खेळाडूंचे संघ बदलले आहेत. प्रायोजकांपासून नियमांपर्यंत यंदा बरंच काही बदललं आहे. त्यामुळे मनोरंजनाचा डबल धमाका होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

यंदा प्रथमच टाटा आयपीएलचे मुख्य प्रायोजक आहेत. २०२२ आणि २०२३ अशी दोन वर्षं आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वाची जबाबदारी टाटांकडे असेल. त्यामुळे यंदाच्या आयपीएलचा उल्लेख ‘वीवो आयपीएल’ नाही तर ‘टाटा आयपीएल’ असा होईल. लखनऊ सुपर जाएंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या संघांमुळे स्पर्धेतली चुरस चांगलीच वाढणार आहे. लखनऊ सुपर जाएंट्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी के. एल. राहुल, तर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे असेल. त्यामुळे पंजाबकडून खेळणारा राहुल लखनऊकडून खेळेल, तर मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू असणारा हार्दिक पंड्या गुजरातच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. यंदाच्या आयपीएल सामन्यांच्या रचनेतही बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील हंगामापर्यंत स्पर्धेतले आठ संघ एकमेकांविरुद्ध दोनदा खेळत असत. म्हणजे प्रत्येक संघ चौदा सामने खेळत असे. मात्र यंदा दहा संघ असल्यामुळे पाच संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. दोन गटांत विभागणी करण्यासाठी संघांचे क्रमांक ठरवण्यात आले. आयपीएलचा किताब पटकावणं तसंच अंतिम फेरीत पोहोचणं या बाबी ध्यानात घेऊन संघांना क्रमांक देण्यात आले. त्या आधारे मुंबई इंडियन्सला पहिला तर चेन्नई सुपर किंग्जला दुसरा क्रमांक देण्यात आला. या निकषांनुसार केकेआर तिसऱ्या तर सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानी राहिलं. याच पद्धतीने अन्य संघांचे क्रमांक ठरवण्यात आले. १, ३, ५ आणि ७ क्रमांक असणारे संघ अ गटात तर २, ४, ६, ८ क्रमांक असणारे संघ ब गटात अशी विभागणी करण्यात आली.

गुजरात आणि लखनऊ हे नवे संघ असल्यामुळे त्यांना क्रमांक देण्यात आले नाहीत. लखनऊला ‘अ’ तर गुजरातला ‘ब’ गटात समाविष्ट करण्यात आले. प्रत्येक गटातले संघ आपल्या गटातल्या संघांसोबत प्रत्येकी दोन सामने खेळतील. तसंच दुसऱ्या गटातल्या समान क्रमांक असणाऱ्या संघासोबत त्यांना दोन सामने खेळावे लागतील. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या गटात चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबईला ‘ब’ गटातल्या चेन्नईसोबत दोन सामने खेळावे लागतील. यासोबतच दुसऱ्या गटातल्या उर्वरित संघांसोबत प्रत्येकी एक सामना खेळावा लागेल. वेगळ्या रचनेमुळे यंदाच्या स्पर्धेतली रंगत अधिक वाढणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात संघाला दोन डीआरएस घेण्याची संधी मिळेल. याआधी फक्त एक डीआरएस घेण्याची परवानगी होती. म्हणजेच एका सामन्यात दोन संघांना मिळून चार डीआरएस घेता येतील. मध्यंतरी मेलबर्न क्रिकेट क्लबने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल सुचवले होते. हे बदल या वर्षी ऑक्टोबरपासून लागू होणार असले तरी आयपीएलच्या पंधराव्या हंगामात झेलाशी संंबंधित नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच चेंडू टोलावल्यानंतर फलंदाजाने बाजू बदलल्या तरी नवा फलंदाज स्ट्राइक घेईल. यंदा बायो बबलबाबत बीसीसीआयने खूप सक्ती केलेली आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूने बायो बबल भेदून आयपीएलमध्ये घुसखोरी केली होती. जुन्या अनुभवातून धडा घेऊन बीसीसीआय शहाणं झालं आहे.

यंदा बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खेळाडूला सात दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे. म्हणजेच संबंधित खेळाडू सात दिवस स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. तसंच या काळात त्या खेळाडूच्या संघाचा सामना असेल, तर त्याचं १०० टक्के मानधन कापलं जाईल. म्हणजेच बायो बबल भेदणाऱ्या खेळाडूला दुहेरी फटका बसेल. खेळाडूने पुन्हा बायो बबल भेदण्याची हिंमत केली, तर त्याला विलगीकरणासोबतच एका सामन्यात न खेळण्याची शिक्षा दिली जाईल. तिसऱ्यांदा बायो बबल भेदल्यास खेळाडूला स्पर्धेत खेळता येणार नाही तसंच संबंधित संघाला त्या खेळाडूऐवजी बदली खेळाडूही घेता येणार नाही. अशा कडक नियमांमुळे कोणताही खेळाडू बायो बबल भेदण्याची हिंमत करू शकणार नाही, असं बीसीसीआयला वाटतं. आपणही तशी अपेक्षा करायला हरकत नाही. यंदा विराट कोहली आयपीएलमध्ये कर्णधाराची भूमिका वठवणार नाही. यंदा बंगळूरुचं कर्णधारपद फाफ ड्यू प्लेसिसला देणार आहे. त्यामुळे विराट एक खेळाडू म्हणून खेळणार आहे. कर्णधारपदाचं ओझं नसल्यामुळे विराटची बॅट तळपेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. यावेळी रवी शास्त्री यांच्या समालोचनाची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ते पुन्हा एकदा समालोचकाच्या खुर्चीत बसणार आहेत. तसंच यंदाच्या लिलावात सुरेश रैनाला कोणीही खरेदी केलं नव्हतं. त्यामुळे तोही आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. जाहिरातदार बरेच पैसे मोजायला तयार असतात. आयपीएलची वाढती प्रेक्षकसंख्या बघता विविध ब्रँड्स, कंपन्या आहे तो भाव देऊन स्लॉट बुकिंग करतात. यामुळे आयपीएलचं प्रसारण करणाऱ्या वाहिनीची चांदी होत असते. आता तर ओटीटीमुळे आयपीएलचे सामने कुठेही बघता येत असल्यामुळे ही स्पर्धा म्हणजे ब्रँड्ससाठी नवनवे ग्राहक जोडण्याची उत्तम संधीच असते आणि कंपन्याही त्याच दृष्टिकोनातून या स्पर्धेकडे बघत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये ड्रीम ११, क्रेड, व्हाइट हॅट ज्युनियर, लाईव्हस्पेससारखे ब्रँड्स आयपीएलशी जोडले गेले. या वर्षीही काही नवे ब्रँड्स आयपीएलशी जोडले गेले आहेत. मिशो, झेप्टो, नियो, स्पिनी, प्रिस्टिन केअर, स्पॉटिफाय आणि अथर एनर्जी हे ब्रँड्स पहिल्यांदाच आयपीएलशी जोडले गेले आहेत.

म्हणजेच यंदा या ब्रँड्सच्या जाहिरातीही पाहायला मिळणार आहेत. स्टार स्पोर्टसकडे आजघडीला आयपीएलचे एकूण १५ प्रायोजक आहेत. तसंच आयपीएलचं प्रसारण करणारी ‘डिस्ने हॉटस्टार’ ही ओटीटी वाहिनीही चांगलीच मालामाल होणार आहे. या वाहिनीने १३ प्रायोजकांसोबत करार केले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत जाहिरातीचं स्पॉट बुकिंग करणाऱ्या काही कंपन्यांनी यंदा प्रायोजकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. आयपीएलची वाढती लोकप्रियता तसंच टीव्ही आणि ओटीटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वयोगटातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मिळणारी संधी यामुळे जाहिरातदार आयपीएलकडे आकर्षित होत आहेत. आयपीएलचं यंदाचं बदललेलं स्वरूप तसंच स्पर्धा अधिक वलयांकित आणि आकर्षक करण्याच्या दृष्टीने सुरू असणारे प्रयत्न बघता हा हंगाम लोकप्रियतेचे आणि प्रेक्षकसंख्येचे अनेक विक्रम मोडेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

13 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

14 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

14 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

15 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

15 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

15 hours ago