Share

रमेश तांबे

अक्षय आणि त्याचे बाबा फिरायला निघाले होते. त्यांची चारचाकी गाडी होती. बाबा गाडी चालवत होते अन् अक्षय शेजारी बसून बाहेरची मजा बघत होता. रस्त्यावर धावणाऱ्या रंगीबेरंगी गाड्या, अथांग पसरलेला समुद्र, लोकांची चाललेली पळापळ तो सारे बघत होता. अधूनमधून बाबांना काही गोष्टी विचारत होता. थोड्या वेळाने गाडी एका सिग्नलवर थांबली. तेवढ्यात एक पुस्तके विकणारा गरीब मुलगा त्यांच्या गाडीजवळ आला. तोच अक्षयने खिडकीची काच झपकन वर केली अन् त्याच्याकडे न बघताच समोर बघू लागला. अक्षयचं हे वागणं बाबांच्या लगेच लक्षात आलं. त्यांना आपल्या पोराचं जरा नवलच वाटलं!

सिग्नल सुरू होताच बाबांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली अन् तिथेच थांबवली. तेव्हा अक्षय आश्चर्याने म्हणाला, “बाबा काय झालं. गाडी का थांबवली.”

बाबा गाडीतून उतरले अन् रस्त्यावरच्या त्या मुलाला हाक मारली. तोपर्यंत अक्षयदेखील गाडीतून खाली उतरला. तो मुलगा धावतच त्यांच्याजवळ आला. अक्षयने पाहिले तो १०-१२ वर्षांचा मुलगा होता. हातात इंग्रजी पुस्तकांचा गठ्ठा होता. विस्कटलेले केस, अंगावर जुनेच पण स्वच्छ कपडे. तो जवळ येऊन म्हणाला, “साहेब काय देऊ!” तो जवळ येताच अक्षय लांब सरकला. मग बाबांनी त्याला नाव विचारले. तो मुलगा बोलू लागला, “मी नीलेश चंद्रकांत सोरटे. सहावीत पालिकेच्या शाळेत शिकतो. उरलेल्या वेळेत इथे पुस्तकं, गजरे तर कधी फुगेही विकतो. दिवसभरात पन्नास साठ रुपये मिळतात.” तो मुलगा मोठ्या उत्साहाने सांगत होता. त्यांचे बोलणे ऐकून बाबांचा चेहरादेखील फुलून गेला होता. पण अक्षयला कळत नव्हतं की बाबा कशासाठी त्या मुलाशी इतकं बोलतात. अक्षय वैतागून बाबांना म्हणाला, “अहो बाबा चला ना, आपल्याला मजा करायची आहे ना. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना!”

तो मुलगा पुन्हा बोलू लागला. “मी तिकडे त्या झोपडपट्टीत राहतो. माझी आई गजरे विकते अन् बाबा चणे! घरात छोटा भाऊदेखील आहे. तोही शाळेत जातो.” त्या मुलाचं बोलणं अगदी गोड होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळच तेज होतं. त्याचं मोठ्या उत्साहानं अन् आनंदानं सारं काही सांगणं बाबांना खूप आवडलं. एवढ्या पाच दहा मिनिटाच्या त्याच्या बोलण्यात त्याने आम्ही गरीब आहोत, आम्हाला राहायला चांगले घर नाही, अभ्यासाला जागा नाही, असे काहीच सांगितले नाही.

आता मात्र अक्षय त्याचं बोलणं मन लावून ऐकू लागला. त्या मुलाची स्वतःशी तुलना करू लागला. मी केवढ्या मोठ्या घरात राहतो. आपल्याकडे दोन मोठ्या गाड्या आहेत. आपली शाळादेखील किती मोठी अन् छान आहे. घरात अभ्यासाला स्वतंत्र खोली आहे. खाण्यापिण्याची, कपड्यांची तर नुसती चंगळच असते. हवं ते मागा लगेच हजर! अक्षय विचारात गुंतलाय, हे बाबांच्या लक्षात आलं. बाबांनी अक्षयला विचारलं, “अरे अक्षू आपण त्याच्या जवळची ही सगळी पुस्तकं घेऊया का रे!” “हो बाबा घ्या ना. आमच्या शाळेजवळच एक बालवाडी आहे, तिथं मी सगळी पुस्तकं देईन.”

अक्षयचे बोलणे ऐकून बाबांना बरे वाटले. दहा पुस्तकांचे दोनशे पन्नास रुपये बाबांनी त्या मुलाला देऊन टाकले. तेव्हा अक्षयने खिशातून एक कागद काढला. त्यावर फोन नंबर लिहिला अन् त्या मुलाचा हात हातात घेत म्हणाला, “मित्रा नीलेश मी अक्षय, तुला कधी कसली गरज वाटली, तर मला फोन कर. तू आजपासून माझा मित्र!”
मुलगा आनंदाने म्हणाला, “होय अक्षय दादा!”

त्या मुलाचा निरोप घेऊन दोघेही गाडीत बसले. बाबांचं काम झालं होतं. रस्त्यावर भीक मागणाऱ्या नव्हे, तर काम करणाऱ्या मुलाला पाहून खिडकीच्या काचा बंद करणाऱ्या अक्षयचा आज पुनर्जन्मच झाला होता. कारण अक्षयने त्या मुलाला मित्र मानले होते. बाबांना खूप आनंद झाला होता. कारण छानछोकी, सुखासीन आयुष्य जगणारा अक्षय आज खऱ्या अर्थाने सहृदयी अन् चांगला मुलगा बनला होता. बाबांनी हळूच अक्षयकडे पाहिले, तर त्याचा चेहरा आनंदाने नुसता फुलून गेला होता!

Recent Posts

PM Modi : “डरो मत, भागो मत”, पंतप्रधान मोदींनी रायबरेलीच्या उमेदवारीवर राहुल गांधींची उडवली खिल्ली!

नवी दिल्ली : काँग्रेसने आज उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा केली.…

5 mins ago

Voting Awareness : मतदानाला जावंच लागतंय! मेट्रोही देणार मतदानाच्या दिवशी सवलत

मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय मुंबई : मतदान (Voting) हा प्रत्येक नागरिकाचा हक्क…

7 mins ago

Gurucharan Singh : गुरुचरण सिंह यांनी बेपत्ता होण्याचा प्लॅन स्वतःच आखला?

दहा दिवसांनंतर समोर आली मोठी अपडेट नवी दिल्ली : 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak…

1 hour ago

LS Polls : लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत कडक सुरक्षा तपासणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (LS polls) पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून,…

2 hours ago

कोपर्डी आत्महत्या प्रकरणी दोन आरोपी अटकेत

नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने येथील दलित…

4 hours ago

विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर कोपर्डीत तरुणाची आत्महत्या

नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या…

5 hours ago