माझ्या देवाक् काळजी रे…!

Share

अनुराधा परब

आपल्या जगण्यावर, रोजच्या व्यवहारांवर ग्रामदेवतेचा प्रभाव असल्याचा पूर्वापार समज आहे. या देवता बहुतकरून स्त्री देवता असून पुरुष देवता त्यांच्या रक्षक, युद्धाच्या देवता म्हणूनच जगभरामध्ये समोर येतात. या परस्पर संबंधांतूनच त्यांच्या उपासना, पूजा यांची रचना विणलेली दिसते. सिंधुदुर्गातील देवतांविषयी समजून घेताना त्यांची रूपे ही रौद्र स्वरूपाच्या अधिक जवळ जाणारी आहेत, हे जसं लक्षात येतं तसंच त्यांच्या उपासनांमध्येही याच रौद्रत्वाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. देवतेचा कोप होऊ नये म्हणून किंवा कोप झाल्यास ती शांत व्हावी म्हणून पशुबळी देण्याची प्रथा हे त्याचं एक रूप म्हणता येईल. काळ आणि कर्म ही दोन तत्त्वे जशी देवता उत्पत्तीच्या मुळाशी असतात तसेच पाप – पुण्य, नीती – अनीती, शुभाशुभ, योग्य – अयोग्य यांसारख्या कल्पनादेखील याच उत्पत्तीच्या निमित्ताने अस्तित्वात आलेल्या असाव्यात. या कल्पनांशी मानवी जीवनव्यवहार बांधला गेला असल्याने त्याच्या अदृश्य धारणांचा धागा हा देवतांशी नेऊन जोडलेला दिसतो. यातूनच प्रार्थना, साकडे, नवस-सायास, देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे विधी, पूजा यांची एक उपासनापद्धती संस्कृतीच्या प्रवाहात विकसित झालेली दिसते.

कोकणामध्ये मंगलकार्याप्रसंगी आपापल्या देवतेसमोर, ग्रामदेवतेसमोर गाऱ्हाणे घालण्याची लोकपरंपरा आहे. हे गाऱ्हाणे म्हणजे तरी काय?, तर हाती घेतलेले कार्य हे कोणत्याही अडथळ्यांविना पूर्णत्वास जावे, याकरिता केलेली प्रार्थनाच होय. भाषा मोठी गमतीदार असते. खरेतर “ गाऱ्हाणं” या शब्दाचा मूळ अर्थ ‘तक्रार – कागाळी करणे किंवा मांडणे’ असा होतो. तक्रार ही आपल्याजवळच्या माणसाकडे केली जाते. यात जसा हक्काचा भाग असतो तसाच ऋतक रागाचाही भाव लपलेला असतो. या तक्रारीतून मांडलेली आपली मागणी मान्य व्हावी, हाच त्यामागचा हेतू असतो. कोकणातील गाऱ्हाणे हे मात्र यापेक्षा थोडे वेगळे आहे. न्याय, नीती, धर्म हा मूलाधार असलेल्या गावऱ्हाटीतील हे गाऱ्हाणे म्हणजे कृतज्ञता आणि क्षमायाचना यांचा मिलाफ म्हणता येईल. मंगलप्रसंगी तसेच जत्रा – यात्रा या दिवशी, अन्य दिवशी दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वतीने प्रामुख्याने सिंधुदुर्गातील गांवकरी अर्थात मानकरी घाडी आणि गुरव हे गाऱ्हाणे घालतात. ही मंडळी देवस्थानातील पूजेबरोबरच तिथला कारभारदेखील पाहतात. त्यांनी तिथे विशेष मान असतो. या व्यक्ती म्हणजे देवता आणि भाविक यांतील दुवा मानले जातात. त्यांनी घातलेली साद ही देवापर्यंत पोहोचते, असा श्रद्धाभाव इथे प्राचीन काळापासून नांदत आलेला आहे.

गाऱ्हाणे घालताना “बा देवा म्हाराजा, बारा गावच्या, बारा येशीच्या, बारा वाडीच्या बारा पाचाच्या, बारा वहिवाटीच्या, देवा म्हाराजा… आम्ही अज्ञ म्हणून जी सेवा करू, ती तू सूज्ञ होऊन मान्य करून घी. खयचा संकट इला असेल, तर त्येका येशीभायेरच ठीव. कुणी आडव्या असात त्येका उभो कर. लेकरू तुका शरण इलेला आसा. खय काय चुकला असात, ता पायाबुडी घी, सगळ्यांचा भला कर…!” यासारखी प्रार्थना केली जाते. सिंधुदुर्गातील गाऱ्हाण्यांतील तपशिलात थोडाबहुत फरक असेल तेवढाच. अन्यथा, देवाकडे यापूर्वी येऊन किंवा न येऊनही मागितलेली गोष्ट पूर्ण झाल्याची कृतज्ञता म्हणून तसेच आपल्या वहिवाटीत काही उणंपुरं राहून गेले असेल, तर त्याविषयीची क्षमा म्हणून गाऱ्हाणे घालून भावना व्यक्त केली जाते. सगळ्यांचे हित चिंतणाऱ्या या गाऱ्हाण्यामध्ये विश्वप्रार्थनेची बीजे दिसतात, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

गाऱ्हाणे हे जसे कोकणाचे वैशिष्ट्य आहे, तसेच ‘कौल लावणे’ हादेखील एक महत्त्वाचा श्रद्धाविधी इथे रुजलेला आहे. कोणतेही शुभकार्य करायचे असेल, तर त्यासाठी देवतेची परवानगी घेण्याकरिता म्हणून मंदिरातील पाषाणाला किंवा मूर्तीला अक्षता वा फूल लावून अपेक्षित तो डावा – उजवा कौल मागितला जातो. इतकेच नाही, तर गावाच्या पंचक्रोशीत कोणताही उत्सव साजरा करायचा असल्यास डाळपस्वारी, गावपळण यांसारखे नेम आखायचे असल्यास सकारात्मक कौल मिळणे अत्यावश्यक ठरते. हे काम गुरव समाजाकडून केले जाते. त्यातही लिंगायत गुरव आणि गुरव हे दोन उपभेद आहेत. पैकी लिंगायत गुरव हे शंकराचे भक्त असून ते मांसाहार करीत नाहीत. कौल लावतानादेखील गाऱ्हाणे घालण्याची परंपरा आहे; परंतु त्याचे स्वरूप वेगळे आहे. कौलप्रसाद मिळणे म्हणजेच कार्याला देवाची संमती मिळणे, न्याय मिळणे असे समजले जाते. अशी संमती मागण्याचे कारण म्हणजे ज्या देवतेकडे हा कौल मागितला जातो. ती देवता त्या पंचक्रोशीची, गावाची संरक्षक देवता असते. तिची संमती म्हणजेच कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याची निश्चिती, अशी ती धारणा आहे. धारणांचे हे अंतःप्रवाह संस्कृतीचे वरच्या स्तराला वेगळे रूप मिळवून देतात.

गर्द जंगलाने वेढलेल्या कोकणामध्ये जेव्हा केव्हा गावऱ्हाटी अस्तित्वात आली असेल, तेव्हा मूळ स्थापनकर्त्या समाजाने सीमा आखून, वसविण्याजोगी जागा तयार करून, पाया खोदून नंतर देवालये उभी केली. या संपूर्ण प्रक्रियेचा उल्लेख तसेच मानकरीसूचक ‘म्हारकी – घाडकी – गुरवकी’ या तीन शब्दांतून व्यक्त होतो. पाषाण ते मूर्ती हा इथल्या देवतांचा प्रवास तसेच त्या देवतांच्या पूजाविधींमधील गाभा पाहिल्यानंतर असेच लक्षात येईल की, माणसाला त्याच्या भीतीवर मात करायची असेल, तर समोर आश्वस्त करणारा आकार लागतो. सगुण साकार ते निराकार या आध्यात्मिक मार्गावरील गाऱ्हाणे आणि कौल म्हणजे एक प्रकारे भावपूर्ण मनाला “माझ्या देवाक् काळजी” असे म्हणत दिलेला आश्वासक दिलासा आहे.

Recent Posts

NEET Exam : एनटीएला नीट-यूजी २०२४ परीक्षेच्या पेपर लीकवर सर्वोच्च न्यायालयात याचिका हस्तांतरित करण्यास परवानगी

सर्वोच्च न्यायालयाची एनटीएसह याचिकाकर्त्यांना नोटीस; सर्व याचिकांवर ८ जुलै रोजी होणार एकत्रित सुनावणी नवी दिल्ली…

46 mins ago

Canara Bank : खोटे सोने तारण ठेवून कॅनरा बँकेची तब्बल ८६ लाखांची फसवणूक!

काय आहे प्रकरण? सोलापूर : कॅनरा बँकेच्या सोलापूरच्या शाखेची (Solapur Canara Bank) फसवणूक करण्यात आल्याची…

55 mins ago

Digital Display : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पश्चिम रेल्वेकडून मिळणार ‘ही’ खास सुविधा

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाइन असणारी लोकल (Mumbai Local) प्रवाशांच्या सेवेसाठी सतत नवनवीन सुविधा देत असते.…

1 hour ago

Water Crisis in World : फक्त दिल्ली, महाराष्ट्र, बंगळूरूच नाही तर जगातील ‘या’ शहरांनाही पाण्याच्या दुष्काळाचा धोका

नवी दिल्ली : भारतातील काही शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजधानी नवी दिल्ली…

2 hours ago

Hit Movies : एकाच दिवशी ‘पुष्पा २’ ला धडकणार श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’!

बॉक्स ऑफिसवर कोण कमवणार दमदार कलेक्शन? मुंबई : बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी अनेक मोठे चित्रपट…

2 hours ago

Nitesh Rane : संजय राऊत आणि त्याचा मालक पवार साहेबांची गांजा गँग!

काँग्रेस आणि पवार साहेब उद्धव ठाकरेंना विधानसभेत २५ पेक्षा जास्त जागा देणार नाहीत नितेश राणे…

2 hours ago