Monday, June 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपुरुषांनी विवाहबाह्य संबंधांना घरात थारा देऊ नये...

पुरुषांनी विवाहबाह्य संबंधांना घरात थारा देऊ नये…

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

विवाहबाह्य संबंधांमुळे नेहमी महिलाच मानसिक, भावनिक, आर्थिकदृष्ट्या भरडली जाते असे नाही, तर पुरुषांना देखील विवाहबाह्य संबंधांमधून अनेकदा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त होणे, बायको, मुलं दूर होणे याबरोबरच अपरिमित आर्थिक हानी ही पुरुषांची देखील झालेली दिसून येते. त्यामुळे अनैतिक संबंधांना आपल्या आयुष्यात, कुटुंबात किती, कुठे, कसे स्थान द्यायचे याचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे.

संजय (काल्पनिक नाव) याची बायको आणि एकुलता एक मुलगा मागील बारा वर्षांपासून लांब आहेत. बायको मुलाला घेऊन माहेरी राहते आहे. संजयने पाच – सहा वर्षांपूर्वी पत्नीला फारकतीची कायदेशीर नोटीस पाठवली होती, परंतु पत्नी फारकत द्यायला नाही म्हणाली आणि तो विषय तिथेच संपला. संजयची पत्नी स्वतः नोकरी करून मुलाला शाळेत घालून मागील बारा वर्षांपासून माहेरीच स्थिरावली होती; परंतु तिने घटस्फोटाला स्पष्ट नकार दिला होता. पत्नी आणि मुलाला भेटायला मात्र संजय येत-जात असे. त्यांना शक्य तेवढी आर्थिक मदत देखील करीत असे. पत्नीने देखील संजयला तिच्या माहेरी यायला, त्याच्याशी बोलायला, फोन करायला, त्याच्यासोबत मुलाला घेऊन कुठेही बाहेर जायला, यायला कधीही बंदी घातली नव्हती; परंतु संजयची पत्नी कायमस्वरूपी त्याच्या घरी येऊन राहायला किंवा मुलाला त्याच्याकडे पाठवायला अजिबात तयार नव्हती. संजयला पत्नी आणि मुलाने कायमस्वरूपी परत त्याच्याकडे येण्यासाठी काय प्रयत्न करावेत या संदर्भात मार्गदर्शन हवे होते.

समुपदेशनाला आलेला संजय आता अंदाजे चाळीस वर्षांचा होता आणि बारा वर्षांपासून त्याचा संसार, पत्नी आणि मुलगा असून देखील झालेला नव्हता. लग्नानंतर दोनच वर्षांत मुलगा अतिशय लहान असताना पत्नी त्याला घेऊन कायमची माहेरी निघून गेली होती आणि संजय आजमितीला खूपच खचलेल्या अवस्थेत दिसत होता. संजयची तब्बेत देखील अतिशय उतरलेली दिसत होती आणि आर्थिक अवस्था सुद्धा बिकट जाणवत होती. वास्तविक संजयचा व्यवसाय आणि करिअर पाहिलं तर ते अतिशय उच्च दर्जाचे, उच्चशिक्षित, बुद्धिमान व्यक्ती करू शकेल असे क्षेत्र होते. संजयने स्वतःच्या क्षेत्रात खूप मेहनत आणि प्रगती देखील केलेली होती. अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या गाठी होता, मोठं नावलौकिक त्याने सामाजिक स्तरावर कमावलेलं होतं; परंतु वैवाहिक आणि आर्थिक बाबतीत मात्र संजय स्वतःला सपशेल अपयशी समजत होता. संजयने मागील बारा वर्षांचा प्रापंचिक आढावा जेव्हा थोडक्यात सांगितला, तेव्हा त्याचा संसार उद्ध्वस्त होण्यामागील कारण हे त्याचेच विवाहबाह्य संबंध होते. हे संबंध आता पूर्णपणे संपुष्टात आले होते; परंतु संजयला मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करून गेले होते. झाले असे होते की, बारा वर्षांपूर्वी संजयच्या आयुष्यात त्याच्याच कार्यालयात काम करणारी सोनी (काल्पनिक नाव)ही अविवाहित मुलगी आली होती. सोनी दुसऱ्या छोट्या शहरातून नोकरीच्या निमित्ताने आलेली असल्यामुळे तिच्या राहण्याची, जेवण्याची व्यवस्था संजयने स्वतःच्याच एका छोट्या रूममध्ये केलेली होती. कार्यालयीन कामात हुशार असल्यामुळे, संजयच्या प्रगतीला अपेक्षित असा हातभार लावण्यामुळे सोनी अतिशय अल्पावधीत संजयसाठी महत्त्वाची बनली होती.

सुशिक्षित असल्यामुळे सोनीने कामाच्या सर्व जबाबदाऱ्या लीलया पेलल्या होत्या आणि संजयचे आता तिच्याशिवाय पान हलत नव्हते. साहजिकच दोघांमध्ये होत असलेली अति जवळीक संजयच्या पत्नीला खटकू लागली होती आणि दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले होते. संजयची पत्नी देखील उच्चशिक्षित आणि मोठ्या सुशिक्षित घरातील असल्यामुळे ती देखील संजयला व्यावसायिक कामात हातभार लावत होतीच. संजयला मात्र आता सोनी जास्त जवळची झाल्यामुळे तो कार्यालयीन कामकाजात देखील पत्नीचा सतत अपमान करणे, तिला कमी लेखणे, तिच्या कामात चुका काढणे या पद्धतीने वागत होता. तर प्रापंचिक आयुष्यात देखील पत्नीला संजय अजिबात किंमत देत नव्हता. ना तिच्याशी कोणतेही पती – पत्नीचे संबंध ठेवत होता. तरी देखील सातत्याने पडती भूमिका घेऊन पत्नी त्याला सोनीपासून लांब होण्याची विनंती करीत होती. आताशा संजयचे सोनीला ज्या ठिकाणी वास्तव्यास ठेवले होते त्याठिकाणी स्वतः मुक्कामी राहणे, तिला सातत्याने स्वतःच्या राहत्या घरी पत्नी नसताना अथवा असताना देखील वेगवेगळ्या कारणांनी आणणे, तिला स्वतःच्या घरात हक्काने वावरू देणे, प्रत्येक घरगुती विषयात, कार्यक्रमात सहभागी होऊ देणे खूप वाढले होते. संजयच्या पत्नीचा संयम दिवसेंदिवस संपत चालला होता. आपल्या डोळ्यांसमोर पतीचे असे अनैतिक संबंध सहन करणे तिला अशक्य होत होते. अनेकदा अनेक ठिकाणी संजयच्या पत्नीला सोनी आणि संजयचे वागणे – बोलणे खटकत होते. दोघांमधील शारीरिक संबंधांचे पुरावे देखील पत्नीच्या हाती लागले होते. संजयला याचा जाब विचारला असता तो पत्नीशी प्रचंड भांडण करणे, त्रागा करणे, तिला घरातून चालती हो म्हणणे, घटस्फोट घे असे म्हणून मानसिक त्रास देत होता. काहीही झाले तरी सोनीला सोडणार नाही, वाटल्यास तू कायमची चालती हो हीच भाषा संजयची वेळोवेळी होती.

सोनी आणि संजयचे राजरोस आपल्या समोर सुद्धा उघड उघड सुरू असलेले अनैतिक संबंध सहन न होऊन एक वर्ष स्वतःच्या डोळ्यांसमोर सतत पतीचे असे वागणे सहन करून अखेर संजयची पत्नी आता खूप त्रासून गेली होती आणि त्यामुळेच तिने मुलाला घेऊन घर सोडले होते. आता तर संजयला कोणतीही आडकाठी राहिली नव्हती. बायकोला परत आणण्यासाठी ना संजयने काही प्रयत्न केले, ना झालेल्या प्रकरणाबाबत त्याला काही पश्चाताप होता. आता सोनीला संजय थेट आपल्या राहत्या घरी घेऊन आला आणि दोघेही पती-पत्नी सारखे राहू लागले. संजयचे राहाते घर भाड्याचे असल्यामुळे घर मालकांनी त्याला ते घर सोडायला सांगितले, कारण आजूबाजूच्या लोकांनी संजयने बाहेरची बाई घरात आणून ठेवली आहे अशी तक्रार केली होती.

संजय सोनीला घेऊन परत दुसऱ्या भाड्याच्या घरात राहू लागला. कार्यालयीन कामकाज सांभाळून दोघेही अनैतिक संबंध ठेऊन उघड उघड एकत्र राहत होते. सोनी दुसऱ्या शहरातील असल्यामुळे तिच्या घरच्यांना या गोष्टीचा थांगपत्ता देखील नव्हता. ते याच समजुतीत होते की, आपली मुलगी नोकरी करून हॉस्टेलला राहते आहे. संजयच्या घरचे सर्वजण त्याच्या गावी राहत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कोणताही हस्तक्षेप करणे शक्य नव्हते आणि बायको माहेरी गेल्यामुळे संजयच्या घरच्यांना तो जुमानेल असे काही वाटत नव्हते. तरीही त्यांच्या पद्धतीने त्यांनी सोनीचा नाद सोडण्याबाबत संजयला सांगितले असता त्यांना प्रचंड अपमानाला सामोरे जावे लागले होत. संजयने कुटुंबातील सर्वांशी कायमचे संबंध तोडून टाकले होते, कारण त्याला काहीही झाले तरी सोनीला सोडायचे नव्हते. (पूर्वार्ध)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -