Share

मृणालिनी कुलकर्णी

हिरव्या रंगाच्या छटांनी, रानफुलांनी, रिमझिम पावसाच्या सरींनी, ऊन-पावसाच्या लपंडावात सरणारा श्रावण, वातावरण आल्हाददायक करून, पशु-पक्षी, प्राणी, वनस्पती साऱ्यांनाच आनंद देतो. वेगवेगळ्या व्रतवैकल्याने सण उत्सवाने भरलेला, भारलेल्या मंगलमय श्रावणात प्रत्येक दिवसाचे, सणांचे महत्त्व वेगळे असते. नागपंचमी ते पिठोरी अमावस्येमध्ये येणाऱ्या सणात वर्षभर नि:स्वार्थीपणे साथ देणाऱ्यांचे आपण पूजन करून कृतज्ञता व्यक्त करतो. असा हा नाती जपणारा श्रावण महिना!

पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी, मुलाच्या सुखसमृद्धीसाठी, दीर्घायुष्यासाठी आई (बेसनच्या) पिठापासून दुर्गामातेसह ६४ देवीच्या मूर्ती आणि पूजेसाठी दिवे बनविते. यालाच श्रावणी अमावास्या किंवा मातृदिन असेही म्हणतात. याच दिवशी बैलपोळा असतो. परंपरेनुसार बैलाची पूजा केल्यानंतर आई मुलाला वाण देते.

आई! जन्माबरोबर मिळणारे मातृत्व. ईश्वर जगात सर्वत्र जाऊ शकत नाही म्हणून आईची निर्मिती केली असे म्हणतात. माणसाच्या जीवनातील पहिली ओळख, पहिला गुरू आई! आई या शब्दांत संपूर्ण कुटुंब सामावलेले असते. ‘मातृ देवो भव!’

मोलमजुरी करणाऱ्यांपासून अगदी उच्च पदस्थापर्यंत आपल्या मुलाला घडविणारी, मुलाच्या मागे मैत्रीण बनून खंबीरपणे उभी राहणारी आईच असते. अनेकांनी जगात स्वतःचा ठसा उमटविला त्यामागे आईची शिकवण असते.

काही मायलेकरांच्या अतूट जोड्या

१. जिजाऊंच्या संस्कार शिक्षणातूनच शिवाजी महाराज हे तेजस्वी नेतृत्व जन्मास आले.
२. यशोदा सदाशिव साने! श्यामची आई! सानेगुरुजी! अत्यंत दारिद्र्यात कमालीची स्वाभिमानी यशोदाने श्यामला छोट्या-छोट्या प्रसंगातून, जाणिवेतून शिकविले. मायलेकातील प्रवाही संवाद जो आज पाल्य पालकात दिसत नाही. आचार्य अत्रे म्हणतात, श्यामची आई हे मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र आहे.
३. शुद्ध चारित्र्याचा आणि लष्करी नेतृत्वाने अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवून देणारे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्यांना संस्कारित करणारी त्याची आई मेरी बाॅल. पेड्रिक्स बर्गला बसविलेल्या कोनशिलेवर ‘वॉशिंग्टनची आई मेरी’ ही अक्षरे कोरली आहेत.

आपल्याच मातीतील एक शौर्यकथा

१. केवळ तान्हुल्याच्या काळजीपोटी, आपले बाळ भुकेलेले असेल, या एकाच विचाराने हिरा (हिरकणी) गवळण २७०० फूट उंच असलेल्या गडाच्या एका कड्यावरून खाली उतरते.

२. ताडोबाच्या जंगलात आपल्या बछड्याला धोका आहे, कळताच बेफान होऊन डरकाळी फोडत बछड्याच्या दिशेने झेपावणारी वाघीण वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऋताने पाहिली. सर्व प्राणिमात्रांत आईची माया सारखीच असते.

आईची शिकवण

१. विख्यात शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रह्मण्यमच्या वडिलांच्या बदली नोकरीमुळे चंद्राला आईनेच शिकविले. चंद्राचे काका हिंदुस्थानातले पहिले नोबेल पुरस्कार विजेते सर सी. व्ही. रमण! आईने सातत्याने चंद्राला ‘काकांपेक्षा मोठा हो!’ हे बिंबवले. खगोलभौतिक विषयांत नोबेल पारितोषक मिळवून चंद्रशेखरने आईची इच्छा पूर्ण केली.
२. ‘तुझ्याकडे शब्दांच धन आहे, त्यामुळे तू लिहीत जा’ हे सांगून बालवयातच आईने आपल्या मुलीची उमेद वाढविली, त्या प्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड.
३. शात्रज्ञ थॉमस एडिसन आणि जपानची दूरदर्शन कलाकार आणि युनिसेफची सद्भावना दूत झालेल्या तोतोचान (तेतसुको कुरोयानाशी) यांच्या यशस्वितेचे मूळ दोन्ही आयांनी आपल्या मुलांना बालपणी तुम्हाला शाळेतून काढून टाकण्यात आले होते हे सांगितले नव्हते.
४. प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर यांनी स्वतःच्या चित्र प्रदर्शनात ‘होमलीडर’ शीर्षकाखाली त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या, संस्कार करणाऱ्या आपल्या आई-वडिलांचे पेंटिंग्स केले होते. ते म्हणतात, आई-वडील हेच घर या संस्थेचे ‘होमलीडर’ असतात.
५. पोलीस इन्स्पेक्टर अरविंद इनामदारांना त्यांची आई म्हणायची, ‘स्वतःसाठी देवाजवळ सगळेच मागतात, दुसऱ्यासाठी प्रार्थना कर, परमेश्वर तुझेही कल्याण करील’!
आई आपल्या मुलासाठी काही अंशी स्वार्थी असते हे पूर्णतः नाकारता येणार नाही. त्याच समाजात ज्यांना कोणीही नाही अशा मुलांना जवळ करणारेही अनेक तरुण मुले, काही जोडपी आहेत. अनाथांची माय सिंधुताई सकपाळ; दुर्लक्षित, उपेक्षित मुलांसाठी कार्ये करणाऱ्या रेणू गावस्करांना पाहता, आपली उंची किती कमी आहे हे तीव्रतेने लक्षात येते.
जरा हटके उदा.

१. इतिहासातले अतिशय दुर्मीळ, दुर्लभ, उत्तुंग उदाहरण पन्नादाईचे. मेवाडच्या भविष्यासाठी स्वतःच्या मुलाचे आपल्या डोळ्यांसमोर बलिदान दिले.
२. खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवरील एका कलाकाराचे भाष्य मला स्पर्शून गेले होते. ते म्हणाले, मी माझी कला आईला डेडिकेट करतो. क्षणभर थांबले नि म्हणाले आई म्हणजे फक्त माझी आई नव्हे, तर आईपण निभावणाऱ्या सर्व! पुन्हा क्षणभर थांबून बोलले, मग ती स्त्री असो व पुरुष हे मला अभिप्रेत नाही.
३. घर लहान, पैसे बेताचेच असूनही घरातही आई-वडिलांची सेवा करणाऱ्यांना मी जवळून पहिले आहे. तरीही आज वाढणारी वृद्धाश्रमाची संख्या हे चित्र भयावह आहे. समवयस्कांना भेटायला गेल्यावर वर्तनातून घरातील नातेसंबंध लक्षात येतात.

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा होणाऱ्या ‘मदर्स डे’चा जगव्यापी अर्थ ‘एका आईचा नाही, तर आईपणाचा, मातृत्वाच्या भावनेचा सोहळा व्हावा’ हा आहे. शेवटी आईपणा मागचा व्यापक अर्थ; ‘आई ही व्यक्ती असली तरी आईपण ही वृत्ती आहे, भावना आहे. ती भावना व्यापक हवी. म्हणजेच तिने सर्वांशीच मायेच्या ममतेने वागायला हवे. त्याचे उदा. मदर टेरेसा होय. तिच्यामध्ये सर्वांविषयी प्रेम, माया, शांतता, बंधुत्व सामावले जाईल, अशा व्यापक व्याख्येत, आजचा मदर्स डे वैयक्तिक झाला. आईला कार्ड्स, फुले, गिफ्ट्स देऊन बाजारीकरण झाल्यामुळे, ती व्यापकता संकुचित झाली. म्हणून आईनेच सुरू केलेल्या ‘मदर्स डे’संबंधी तिची मुलगी अॅना जार्विस म्हणते, आईला पत्र लिहा, तिला जाऊन भेटा, तिच्याशी संवाद साधा, तुमचा सहवास द्या, हा तिचा आग्रह होता.

‘आई’वर लिहिले गेलेले साहित्य समृद्ध आहे; परंतु भिंतीच्या आतला अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो! पिठोरी अमावस्येच्या निमित्ताने आई मुलाच्या नात्याचा हा अल्पसा ऊहापोह. मातृदेवोभव !

Recent Posts

Salary Saving : पैशांची उणीव भासतेय? सेव्हिंगचा ‘हा’ फॉर्म्युला वापरा

खर्चानंतरही भासणार नाही पैशांची अडचण! मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या आपल्या भविष्याची चिंता असते.…

1 hour ago

Sanjay Dutt : ‘वेलकम ३’चा भाग नसणार संजय दत्त! केवळ एका दिवसाचं शूटिंग केलं आणि…

संजयने का केलं बॅकआऊट? मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'वेलकम टू जंगल' (Welcome to jungle)…

2 hours ago

PM Narendra Modi : कोण आहे पंतप्रधान मोदींचा राजकीय उत्तराधिकारी? स्वतः केला खुलासा

केजरीवालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर पाटणा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यात पूर्णपणे मतदान…

2 hours ago

Covid New Variant : पुन्हा मास्क! कोरोनाच्या आणखी एका विषाणूमुळे जगाची चिंता वाढली

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला. अलिकडच्या काळात या आजाराची प्रकरणे कमी…

2 hours ago

Nitesh Rane : ४ जूनला मशाल विझणार आणि हातात केवळ आईस्क्रिमचा कोन उरणार!

भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप यांमुळे उद्धव ठाकरे लंडनला पळणार नितेश राणे यांची जहरी टीका मुंबई…

3 hours ago