Categories: कोलाज

मालवणी माणूस

Share

सतीश पाटणकर

सिंधुदुर्ग जिल्हा हा “मालवणी मुलुख” म्हणून ओळखला जातो. कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, संस्कृतीबरोबरच निसर्गाने मुक्त उधळण केलेला असा हा जिल्हा.

मालवणी मुलुखाच्या वैशिष्ट्याबरोबरच मालवणी माणूस हा अनेकांचा कुतूहलाचा विषय. मालवणी माणूस वरसून फणसासारखो दिसलो, तरी आतून मात्र रसाळ. मोडलो तरी वाकाचो नाय, पाठ धरल्यान, तर सोडूचो नाय आणि प्रेम केल्यान, तर तुमच्याशिवाय जगाचो नाय, असा या वेगळा रसायन आसा.

मागासलेपणा, त्यामुळे येणारी निराशा, हिशोबीपणा, तोलून मापून घेण्याची वृत्ती, पैसा वसूल करण्यामागे असलेला कल, स्वत:बद्दलची ठाम मते, गप्पांमध्ये रंगत जाणारा विनोद, खवचटपणा, तिरकसपणा, बेरकीपण असे सारे गुण मालवणी माणसात एकटवलेले आढळून येतात. मालवणी माणूस असा का? या प्रश्नाला भौगोलिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, आर्थिक असे अनेक पदर आहेत. इतर कोणत्याही समूहापेक्षा मालवणी माणसावर सर्वात जास्त लिहिलं गेलंय की,

“मालवण पाण्यामध्ये किल्ला!
शिवाजी आत कसा शिरला!!”

आपल्यापैकी अनेकांचा मालवणी मुलुखाशी संबंध आला तो या पिकनिक साँगपुरता. मालवणी जत्रोत्सवातील वडे सागोतीची मालवणी ठसक्याची चवही अनेकांनी चाखली असेल. महाराष्ट्राला मालवणी भाषेचा खरा ठसका पहिल्यांदा दाखविला तो मच्छिंद्र कांबळींच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाने. वि. स. खांडेकर, जयवंत दळवी, प्र. श्री. नेरूरकर, मधु मंगेश कर्णिक, डॉ. महेश केळुसकर, प्रा. बाळकृष्ण लळीत यांच्या साहित्यातूनही कोकणी माणसाचं सुरेख वर्णन आले आहे.

कोकणी माणूस जसा उत्सवप्रेमी आहे, तसाच तो खाद्यप्रेमीही आहे. कोकणातील पाहुणचार हा लज्जतदार, चटकदार, आणि चमचमीत मेजवानीने झडतो. जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी तिथल्या थाळीत गरमागरम घालणे किंवा आंबोळी असेल, तर जेवणाला अधिक रंगत असते, एवढे मात्र निश्चित.

कोकण हा महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य प्रदेश आहे. हिरवीगर्द झाडी, लाल माती, गरजणारा दर्या आणि रूपेरी वाळू याचं लेणं लेवून ही किनारपट्टी आपल्याला नेहमीच साद घालत असते. या भूमीशी भगवान परशुरामांचं नातं जोडलेले आहे. कोकणातील सुग्रास जेवण मनात दडून बसलेल्या खवय्यांना इथं तृप्तीचा ढेकर येतो. अस्सल कोकणी लज्जतदार, चटकदार कोकणी स्वयंपाकघरात मासळीच्या तुलनेत शाकाहारी पदार्थ काहीसे दुर्लक्षित राहिले आहेत. मत्स्याहारी, मांसाहारी आणि शाकाहारी थाळीतही मनाची जागा मात्र कोकणच्या वडे, आंबोळी आणि घावणे आणि सोलकडी या खाद्यप्रकाराने पटकावली आहे. कोकणी माणूस जसा उत्सवप्रिय तसा तो खाद्यप्रियही आहे. वडे-सागोती आणि चमचमीत बांगड्यांच्या तिखल्यावर तो तुटून पडतो. पावसाळ्यात ताजे मासे मिळाले नाहीत, तर सुक्या माशांच्या वासाने तरी त्याच्या पोटात चार घास जातात. मालवणी माणसाशी गप्पा मारणे हा विलक्षण अनुभव असतो. तो एकदा गप्पा मारायला बसला की, तो कुणाचीही भिडभाड ठेवत नाही. आपली रोखठोख मतं स्पष्टपणे मांडण्यात मालवणी माणसाला विलक्षण आनंद मिळतो. त्याच्या या गप्पांमध्ये उत्स्फूर्त विनोद असतो. खवचटपणा असतो. तिरकसपणा फिरकी असं सर्व काही असतं. मालवणी माणसांशी अवांतर गप्पा ही ज्ञानाला धार लावणारी गंमत असते. अशा गप्पा मारताना मालवणी माणूस समोर कोण आहे, याची कधीच पर्वा करत नाही. त्याची मते ठाम आणि जाम असतात. चर्चा आणि वादविवाद करताना त्याची बुद्धी तलवारीच्या धारेसारखी तळपत असते. तो भांडेल तेही अगदी तर्कशुद्ध आणि मुद्देसुद्दपणे. चर्चेच्या वेळी समोरच्या माणसाला मस्त चिमटे काढणे हे त्यांचं वैशिष्ट्य. वाद, खाणं, नाटक, सिनेमा, खेळ, कोर्ट केसेस हे त्याचे जिव्हाळ्याचे विषय. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपासून मागील निवडणुकीत एनडीएचा कोणता मुद्दा चर्चेला आला नाही. याची सखोल चर्चा आपल्याला इथल्या खेडेगावातील टपरीत रंगलेली ऐकायला मिळेल.

मालवणी माणसांची असंख्य वैशिष्ट्ये सांगता येतील. स्वत: उपाशी राहून दुसऱ्याला जेवू घालणारा, शंभर रुपयांची वस्तू दहा रुपयाला मागणारा. नाही मिळाली, तर ती बोगस म्हणून सांगणारा मालवणी माणूस म्हणजे एक अजब असं रसायन आहे. गणपतीत भजने करणारा, शिमग्यात सोंग नाचविणारा, दशावतारात रमणारा आणि रडणाऱ्याला हसविणारा अशी त्यांची ख्याती आहे. आपल्या हक्काशी नेहमीच जागरूक असणारा मालवणी माणूस. गावाकडच्या दोन गुंठे जमिनीच्या हक्कासाठी आपलं अख्खं आयुष्य आणि पुढच्या दोन पिढ्या कोर्ट-कचेरी लढविणारा माणूस जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच सापडणार नाही.

“आपला ठेवा झाकान आणि दुसऱ्याचा बघा वाकान” किंवा “ज्येच्या मनात पाप तेका पोरा होतत आपोआप”, “रोग रेड्याक आणि औषध घोड्याक” किंवा “जेचा जळता, तेका कळता” अशा इथल्या म्हणींचा बोलीत पुरेपूर वापर आपल्याला आढळून येईल.

इलात पावण्यांनू! बसा!!
बसतल्यात,
तर डाळकूट आसा…
जेयतल्यात,
तर पेज आसा…
रवतलास,
तर सान झाली…
जातलास, तर सकळ आसा…
चाफ्या बुडसून वाट आसा…!

असा स्पष्टवक्तेपणा फक्त मालवणी माणसात पाहायला मिळतो. कोकण रेल्वेचं कामकाज सुरू होतं. एका माणसाचे केस कापता कापता रामाने त्याच्या दुकानात बसलेल्या मराठी शाळेतील गुरुजींना विचारले, “गुरुजी आज पेपरात काय छापान इला?” पेपर वाचता वाचता गुरुजी म्हणाले, “कोकण रेल्वेच्या कामाला सुरुवात होतेय.” आपल्या कात्रीचा आवाज करत रामा म्हणाला, “गुरुजींनू या रेल्वेचो आपणांक काय येक फायदो नाय. माका सांगा ही रेल्वे खयना सुटतली?”

गुरुजी म्हणाले, “मेंगलोरातून.” रामा म्हणाला, “बरोबर म्हणजे जॉर्जच्या “मेंगलोरातून.” म्हंजे, थयसून ती भरान येतली. म्हंजे आम्ही स्टँडिंग.”
इतकी वर्षं होऊनही आज कोकणातील माणसाला रामानं केलेल्या विधानाचा वेळोवेळी प्रत्यय येत आहे. मालवणी माणसाच्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा आहेच. आपले म्हणणे तो समोरच्याला ठासून सांगतो.

“आले मालवणी माणसाच्या मना, तेथे कोणाचे चालेना” असं गमतीने म्हटलं जातं ते उगीच नाही.

मालवणी माणूस हा श्रद्धाळू ग्रामदेवतेचा कौल घेतल्याशिवाय तो एक पाऊल पुढे टाकणार नाही. भूतं-खेतं, देवचार याबरोबरच पृथ्वीतलावरील ३३ कोटी देवतांपैकी ३२ कोटी देवता आमच्याच मुलखात ही इथल्याच माणसांची मक्तेदारी. अंगात येण्यासारखे प्रकारही येथे पाहायला मिळतात. एक वेळ घरात जेवणाची मारामार असेल; परंतु दुसऱ्याकडे हात न पसरणारा मालवणी माणूस जत्रा, नाटके, सभा सभारंभात मात्र सर्वात पुढे असलेला आढळून येईल. आयुष्यात तोंडाला रंग फासून रंगमंचावर न चढलेला मालवणी माणूस शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे कदाचित मराठी रंगभूमीवर नाटककार, नेपथ्यकार, दिग्दर्शक, कलाकार यात सर्वात जास्त मंडळी ही मालवणी मुलखातीलच दिसून येतात. क्रीडा क्षेत्र असो वा नाही, तर पत्रकरिता प्रत्येक क्षेत्रात मालवणी माणसाची छाप पडलेली दिसून येईल. ही स्वभाववैशिष्ट्य असणारा “मालवणी माणूस” ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची दुसरी ओळख आहे, एवढं मात्र निश्चित.

मालवणी माणूस हा जातीचा खवय्या आहे. त्याला स्वतःला चांगलेचुंगले खायला तर आवडतेच, पण इतरांना छान छान पदार्थ तयार करून खाऊ घालायला पण खूप आवडते. त्यामुळेच असंख्य लज्जतदार मसाल्यांच्या यथायोग्य मिश्रणातून आणि परंपरागत जोपासलेल्या पाकक्रियेतून मालवणी, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची परंपरागत चव ही मालवणी मुलखात पिढ्यानपिढ्या शिजवली जाते, शिकवली जाते आणि जोपासली ही जाते.

Recent Posts

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

37 mins ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

2 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

2 hours ago

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

3 hours ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

5 hours ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

6 hours ago