Friday, June 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजचिमुकला लढा!

चिमुकला लढा!

विशेष: शिरीष वासुदेव देशपांडे

गेल्या रविवारी शरद पोंक्षे यांचे “नथुराम गोडसे” नाटक बघायला आम्ही दोघं गेलो होतो. गेटवर एक स्टाॅल होता. तिथे येणाऱ्या सर्वांना एक छोटीशी आकर्षक पुस्तिका वाटली जात होती “अंदमान बोलावतंय”. नाटकात नथुरामकडून सावरकर आणि अंदमानचा उल्लेख अगदी स्वाभाविक होता. नाटकात काही उणिवा, त्रुटी असल्या तरी शरद पोंक्षेंचा अभिनय – अभिनय कसला शरद पोंक्षेंच्या मुखातून नथुरामच बोलतो. जबरदस्त प्रभावी भूमिकेतून नथुराम गोडसेचे दर्शन निश्चितच भारावून टाकणारे होते. असो.

तर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून मी बाहेर आलो आणि अनूला सांगितले, “अनू, मला अंदमान बोलावतंय”. आजवर अनूला माहीत झालंय की, अनेकदा मी आंघोळ करून बाहेर आलो की, हमखास काहीतरी नवीन कल्पना, नवा विचार घेऊन येतो. “कालचा परिणाम दिसतोय”, अनूची पहिली रिअॅक्शन.‌ “होय, थोडंफार तसंच”, मी म्हणालो आणि मग आम्ही दोघं साधारणतः १९८७ मध्ये मी अंदमानसाठी दिलेल्या त्या चिमुकल्या लढ्याच्या आठवणीत हरखून गेलो. काय होता माझा तो अंदमानचा लढा?

त्याचं असं झालं. १९८५च्या मार्चमध्ये दहावीच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकातील काही गंभीर चुका मी महाराष्ट्र शिक्षण मंडळाला दाखवून दिल्या होत्या. त्यांनी त्या सुधारण्यास नकार दिला. त्यामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका, लोकसभेत खासदार मधू दंडवत्यांकरवी शिक्षण मंडळाविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव अशी (माझ्या दृष्टीने) एक मोठी लढाई मी त्यावेळी नुकतीच यशस्वीपणे लढलो होतो. (त्याबद्दलही लवकरच लिहीन).

त्या कायदेशीर लढाईनिमित्त दहावीच्या त्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकाच्या डझनभर प्रती मी विकत घेतल्या होत्या. हा सर्व लढा मला हवा तसा समाधानकारकरीत्या संपला होता. आता त्या सर्व पुस्तकांची मला गरजही नव्हती म्हणून ती काढून टाकण्यासाठी कपाटाबाहेर काढली. एकदा डोळेभरून त्या पुस्तकांकडे पाहिलं. दहावीच्या नागरिक शास्त्राच्या त्या पुस्तकाने माझं आयुष्यच बदललं होतं. आज मी ग्राहक चळवळीत जो‌ काय उभा आहे त्याचं बरचसं “श्रेय” चुकीची माहिती देणाऱ्या त्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकाला द्यावी लागेल. म्हणून काहीशा कृतज्ञतेने त्या पुस्तकाकडे मी पाहिलं आणि क्षणात माझ्या डोळ्यांत काही तरी खुपलं. झालं! मी त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर परत परत बघत राहिलो. असं काय होतं त्या मुखपृष्ठावर? त्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकावरील मुखपृष्ठावर होता आपल्या भारताचा संपूर्ण नकाशा. पण बघतो तर काय माझ्या भारतभूमीची अंदमान, निकोबार, लक्षद्वीप ही बेटे त्या नकाशात दाखवलीच नव्हती. झालं! देशपांडे खवळले.

भारताचाच भाग असलेली ही बेटे दाखवल्याशिवाय हा भारताचा नकाशा प्रसिद्ध होऊच कसा शकतो? माझे बाबा स्वातंत्र्यासाठी लढलेले, तुरुंगवास सहन केलेले, तुरुंगवासाची शिक्षा जाहीर होताच कोर्टातच “वंदे मातरम्” म्हणण्याचे धाडस करणारे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केलेल्या सेवेचे encashment म्हणून मिळणारे पेन्शनही न घेणाऱ्या सच्चा देशभक्त असलेल्या माझ्या बाबांचे रक्त माझ्यातही आहेच. मला नाही पटला तो नकाशा. म्हटलं तर क्षुल्लक प्रश्न, म्हटलं तर माझ्या देशप्रेमाचा, देशभक्तीचा प्रश्न. आज अंदमान, निकोबार नकाशातून वगळलंत. उद्या जम्मू-काश्मीर वगळून नकाशा छापाल. चालणार आहे आपल्याला? नाही ना? मग अंदमान, निकोबारसारखी छोटिसी बेटं का असेना, भारताचा असा लचका कोणाला तोडून द्यायचा का? अर्थात नाही. मन बंड करूनच उठलं. नेहमीप्रमाणे मग आई आणि अनूबरोबर चर्चा. आईचे आपले नेहमीप्रमाणे उद्गार, “शिरीष, तुलाच कसं रे हे सर्व दिसतं?” असो. तर मग ठरलं. याविरुद्ध आता काही तरी करायचं आणि रद्दिवाल्याकडे जाणारी ती सर्व डझनभर नागरिक शास्त्राची पुस्तके निमूट पुन्हा माझ्या कपाटात गेली.

आता प्रश्न होता की, आता नेमके करायचे काय? पुस्तक महामंडळाला परत लिहावे तर त्यांचा याबद्दलचा आधी दाखवलेल्या दुरुस्तीबाबतचा अनुभव संतापजनकच होता. म्हणून तो नाद सोडून दिला. पण विषय सोडला नव्हता. काही तरी करायला हवं असं तीव्रतेने वाटत होतं. पण योग्य मार्ग सापडत नव्हता; परंतु आपण चांगलं‌ काम करायला घेतलं तर नियती सुद्धा आपल्याला साथ देते असा माझा अनुभव आहे आणि नेमकं तसंच झालं.

१९८६ च्या सुरुवातीलाच मी मुंबई ग्राहक पंचायतीत दाखल झालो होतो. (त्याला देखील हे नागरिक शास्त्राचे पुस्तकच कारणीभूत होते.) नकाशातील ही चूक मला साधारणपणे १९८७ मध्ये नजरेस आली. तोपर्यंत मी मुंबई ग्राहक पंचायतीत छोटे-छोटे विषय घेऊन त्यात मला यश‌ही मिळू लागले होते. माझा खटपट्या स्वभाव काही वरिष्ठांच्या तोपर्यंत चांगलाच लक्षात आला होता. मुंबई ग्राहक पंचायतीच्या एका कार्यक्रमाला दादर येथील पर्ल सेंटरमध्ये ग्राहक पंचायतीचे तत्कालीन उपाध्यक्ष एम. आर. पै उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्याआधी चहा पिता पिता पै सरांनी मला विचारलं, “काय शिरीष, सध्या नवीन काय चाललंय?” त्यांना नागरिक शास्त्राच्या पुस्तकातील चुका दुरुस्त करून घेण्यासाठी मी दिलेला लढा माहीत होता. त्यानंतर ग्राहक पंचायतीत आल्यापासून एक-दीड वर्षातच मी हाताळलेले issues सुद्धा त्यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांचा तो प्रश्न होता.

वास्तविक भारताच्या नकाशातील चुका हा काही ग्राहक चळवळीतला विषय होऊ शकत नव्हता. तरी पण माझ्या मनातील त्याबद्दलची खदखद चहा पिता-पिता मी त्यांना बोलून दाखवलीच आणि त्यांना हेही सांगितले की, “मला काही करून हा चुकीचा नकाशा दुरुस्त करून हवा आहे आणि शिक्षण मंडळाने याबद्दल माफी मागणेही मला अपेक्षित आहे, पण मला कळत नाही कुठे याबद्दल तक्रार करावी.” एम. आर. पै सर म्हणजे अशा बाबतीत माहितीचा खजिनाच. त्यांनी तत्काळ मला सांगितले, “शिरीष, हे पुस्तक डेहराडूनला Surveyor General of India ला पाठव आणि मग गंमत बघ.” मी त्यावर पै सरांना सविस्तर पत्ता विचारला. त्यांचे मृदू स्वरातील शब्द मला अजूनही आठवतायत. “शिरीष, Dehradoon is a very small place. Just write Surveyor General of India, Dehradoon and that’s enough.” आणि झालं. देशपांडे पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागले. दुसऱ्याच दिवशी Surveyor General ना माझे पत्र आणि नागरिक शास्त्राचे ते पुस्तक पोस्टाने रवाना झाले.

आश्चर्य म्हणजे १५ दिवसांत Surveyor General of India ने महाराष्ट्र राज्य पुस्तक मंडळाला “कारणे दाखवा” नोटीस बजावली आणि अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे भारताच्या नकाशातून कशी काय वगळली जाऊ शकतात? याची विचारणा केली आणि त्याची प्रत मला पाठवली. ही नोटीस मिळताच पुस्तक मंडळाला परत एक झटका बसला. त्यांनी सर्व्हेयर जनरलला खुलासा पाठवला की, नागरिक शास्त्राच्या पुस्तकावर छापलेला भारताचा नकाशा ही “कलात्मक कृती” होती (artistic representation) आणि तो प्रत्यक्ष नकाशा नाही; परंतु सर्व्हेयर जनरलने हा खुलासा फेटाळून लावत पुस्तक मंडळाला बजावले की, कायद्यानुसार भारताचा नकाशा हा त्यात कोणतीही काटछाट, छेडछाड न करता सर्व्हेयर जनरलने मंजूर केलेला अधिकृत नकाशाच प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पुस्तक मंडळाने अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांसह भारताचा नकाशा छापायला हवा. अशा प्रकारे “कलात्मक कृती” म्हणून अंदमान, निकोबार बेटे वगळून भारताचा नकाशा छापणे हा गुन्हाच असल्याचेही पुस्तक मंडळाला बजावण्यात आले.

एवढी तंबी मिळाल्यावर पुस्तक मंडळाने अखेर दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यानंतर अंदमान, निकोबार, लक्षद्वीपसह अधिकृत सुधारित नकाशा छापण्याऐवजी आपली कर्मदरिद्री वृत्ती दाखवत “पुढील आवृत्तीत आम्ही भारताचा नकाशा न‌ छापण्याचा निर्णय घेतला असल्याचे” पुस्तक मंडळाने सर्व्हेयर जनरला कळवले आणि या विषयावर अखेर पडदा पडला.‌ पुढील‌ वर्षी नागरिक शास्त्राचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्यावर अंदमान, निकोबारसह भारताचा संपूर्ण नकाशाच गायब झाला. भारताचा चुकीचा नकाशा छापण्यापेक्षा तो न छापलेलाच बरा असं मनाला समजावून मी सुद्धा या विषयाला अखेर पूर्णविराम दिला. निदान अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप वगळून छापलेला चुकीचा नकाशा मागे घेण्यास मी शिक्षण मंडळाला भाग पाडले हे समाधानही माझ्यासाठी खूप होते. अशा या माझ्या अंदमान, निकोबारसारख्या चिमुकल्या बेटांसाठी दिलेल्या चिमुकल्या लढ्याचे त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी खूप कौतुक करून दाद दिली होती. आज या सर्व आठवणी जवळजवळ ३६ वर्षांनी पुन्हा ताज्या फुलासारख्या मनात फुलल्या. त्यामुळे मी ठरवलंय “अंदमान बोलावतंय”, तर आपण जरूर जायचं, लवकरच कधी तरी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -