हॉटेल उद्योग क्षेत्रातील कोकणकन्या – प्रियांका गांधी

Share

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

चूल आणि मूल’पुरतंच बाईचं अस्तित्व मर्यादित असतं. कालौघात ही संकल्पना मागे पडली. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहे. किंबहुना ज्या ज्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत ते क्षेत्र उत्तम पद्धतीने प्रगती करत आहे. पूर्वी बॉस म्हटलं की, असा पुरुष नजरेसमोर यायचा ज्याच्या हाताखाली अनेक लोक काम करत. त्याची आज्ञा पाळत. आता अशा अनेक स्त्रिया उच्चपदस्थानी विराजमान झालेल्या आहेत. ज्या आपल्यासोबतच्या व्यक्तींचे कौशल्य हेरून त्यांना कामाची जबाबदारी सोपवितात आणि ती जबाबदारी पार पाडण्यास प्रेरित करतात. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना जगासमोर आणणारी ही लेखमाला आहे, ‘दी लेडी बॉस’.

कोकण म्हटलं की, डोळ्यांसमोर उभा राहतो तो प्रेमात पाडणारा निसर्गाचा देखावा, फेसाळणारा समुद्र, आकाशासोबत स्पर्धा करणारी नारळ-माडांची उत्तुंग झाडे, आबालवृद्धांना वेड लावणारा हापूस आंबा आणि तोंडाला पाणी सुटेल असे मासे. मुंबईत कोकणाचा हा फील येतो तो हॉटेल कोकणकट्टामध्ये. कोकणातल्या घावणे, आंबोळ्यापासून ते कुर्ल्या, तिसऱ्या, बोंबिल सुरमईपर्यंत अस्सल कोकण आपण आपल्या ताटात अनुभवत असतो. इतका जिवंतपणा आपल्याला अनुभवायला मिळतो कारण या साऱ्या खाद्यपदार्थांना एका अन्नपूर्णेचा स्पर्श लाभलेला असतो. किचनमधल्या कूकपासून ते जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या ग्राहकांपर्यंत प्रत्येकावर तिच्या मायेची नजर असते. ही अन्नपूर्णा म्हणजे हॉटेल कोकणकट्टाच्या संचालिका प्रियांका प्रमोद गांधी. त्यांचीच ही कथा.

गुहागरच्या पडवे येथील गांगण कुटुंबात प्रियांकाचा जन्म झाला. स्वरूपा हे तिचं माहेरचं नाव. स्वरूपाचे बाबा शासकीय मुद्रणालयात कामास होते. तर आई गृहिणी. स्वरूपाला एक भाऊ आहे. एकूण चारजणांचे हे गांगण कुटुंब. स्वरूपाचं शालेय शिक्षण अंधेरीतल्या विद्याविकास विद्यालयात झाले. दहावीनंतर तिने वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती एका बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपनीत नोकरीस लागली. दरम्यान गुहागर येथील मुंढरच्या प्रमोद गांधी या तरुण उद्योजकासोबत स्वरूपाचा विवाह झाला आणि स्वरूपा गांगण, प्रियांका गांधी झाली.

स्वरूपाच्या आईच्या हाताला वेगळीच चव होती. खऱ्या अर्थाने अन्नपूर्णाच तिच्या हातावर वसत असे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आईचा हा वारसा स्वरूपाने जपला. ती सुद्धा पाककलेत वाकबगार झाली. दहा वर्षे नोकरी केली. पण स्वत:चं काही तरी असावं ही इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच पती प्रमोद गांधी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी कोकणकट्टा नावाने एक पार्सल काऊंटर सुरू केले. पहाटे उठून सर्व आटोपून प्रियांका स्वत:च्या हाताने खाद्यपदार्थ तयार करायच्या. सुरुवातीला कूक ठेवले होते. मात्र एके सकाळी काहीही कल्पना न देता हे कूक कामावर आलेच नाहीत. ग्राहक तर बाहेर होते. अशा वेळी स्वत: किचनचा ताबा घेऊन त्यांनी काऊंटर सुरू ठेवले. आज त्या त्यांच्या कामात एवढ्या निष्णांत आहेत की, किचनपासून कॅश काऊंटरपर्यंत एखाद्या कर्मचाऱ्याने अकस्मात दांडी मारली, तर बिथरून न जाता त्याच्या कामाची जबाबदारी त्या हाताळतात.

‘हाॅटेल व्यवसाय करायचा हा विचार खूप दिवस मनामध्ये होता आणि स्वत:चे हाॅटेल चालू करू शकू एवढे भांडवलही होते. पण हाॅटेल व्यवसायाचा काहीही अनुभव नसताना आपण हाॅटेल व्यावहारिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. हॉटेल बंद करावे लागेल ही भीती देखील मनात होती. यावर उपाय म्हणून आम्ही एका शासकीय कार्यालयाचे कॅण्टीन चालवायला घेतले. ते एक वर्ष चालवले. त्याचा फायदा आम्हाला कर्मचारी वर्ग ओळखण्यास झाला. तसेच मला हाॅटेल संदर्भातील लागणाऱ्या सामानांच्या मार्केटिंगचा अनुभव मिळाला. त्यानंतर आम्ही एक पार्सल काऊंटर सुरू केले. ते वर्षभर चालविल्यानंतर आम्ही १५-२० आसन क्षमतेचे हाॅटेल चालवले. अशा प्रकारे ४-५ वर्षांचा अनुभव मिळाल्यानंतर आमच्यामध्ये एक चांगला आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे आम्ही कोविडच्या काळातही न डगमगता, तज्ज्ञांचा या काळात हाॅटेल सुरू न करण्याचा सल्ला न जुमानता आम्ही कोकणकट्टा सुरू केले,” असे प्रियांका गांधी सांगतात.

कोकणकट्टामध्ये बोंबिलपासून ते सुरमईपर्यंत चविष्ट माशांची डिश मिळतेच पण इथले घावणे, आंबोळ्या आपल्याला थेट कोकणात गेल्याचा फिल देतात. सोबतच मोदक, पुरणपोळ्या म्हणजे ‘अस्सल चवीचा कोकणकट्टा’ हे नाव सार्थ करतो.

निव्वळ खाद्यपदार्थच नव्हे, तर कोकणातील संस्कृती, सण, साहित्य सर्वसामान्य लोकांना उमजावे यासाठी कोकणकट्टा विविध उपक्रम राबविते. याचाच एक भाग म्हणून पहिल्या वर्धापन दिनी कोकणकट्टाने ज्येष्ठ अभिनेता विजय कदम, जयवंत वाडकर, साई सामाजिक संस्थेचे विनय वस्त, रंगशलाकाचे संचालक आनंद शेट्ये या कोकणातील अस्सल हिऱ्यांना ‘कोकणरत्न सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले. तसेच गांधी दाम्पत्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोकणकट्टास दिलेल्या नि:स्पृह सेवेबद्दल कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात केले. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे पहिलेच हॉटेल व्यावसायिक असावेत.

“मी दुपारी १२ वाजल्यापासून किचनमध्ये असते, ते हॉटेल बंद करूनच घरी जाते. त्यामुळे हे सोबत काम करणारे २० कर्मचारी नसून आमचं कुटुंबच आहे. आमचे कर्मचारी अगदी पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहेत. अनेक ग्राहक पार्सल काऊंटर होते तेव्हापासूनचे जोडलेले आहेत, जे आजही येतात. हेच आमच्या यशाचं रहस्य आहे.” अशा शब्दांत नकळपणे मानवी व्यवस्थापनाचे धडे प्रियांका गांधी आपल्याला देऊन जातात.

गांधींचा मुलगा विक्रान्त याने चेन्नईतून हॉटेल व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढील उच्चशिक्षणासाठी तो कॅनडात आहे. रूढार्थाने हॉटेल मॅनेजमेंटची वा बिझनेस मॅनेजमेंटची पदवी न घेतलेली कोकणकट्टाची प्रियांका गांधी ही कोकणकन्या आपल्या मनमिळावू, मायाळू स्वभावामुळे आणि सुगरण असण्याच्या कर्तृत्वाने हॉटेल व्यवसाय क्षेत्रातील ‘दी लेडी बॉस’ ठरली आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

11 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

12 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

12 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

13 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

13 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

13 hours ago