समुपदेशनच आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरेल

Share

मीनाक्षी जगदाळे

ज्या वयात शैक्षणिक, वैचारिक, व्यावसायिक, सामाजिक कर्तृत्व करून आपली तसेच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित असते, त्या वयात अतिशय तरणीताठी मुलं आपले आयुष्य स्वतःच्या हाताने बरबाद करून घेताना दिसतात. ही मुले ज्या परिसरात अथवा ज्या घरात जन्माला येतात तिथे आयुष्याबाबत कोणीही सकारात्मक, चांगले, योग्य मार्गदर्शन करणारे त्यांना भेटलेले नसते. आता मिळेल तसा, मिळेल तिथून पैसा मिळवणे, आपल्या गरजा भागवणे हेच ध्येय अशा तरुणांसमोर असते.

गुन्हेगारी क्षेत्रात राजरोसपणे जास्तीत जास्त प्रमाणात समाजात वावरणाऱ्या तरुणांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात कुठे आहे, हे पाहणे गरजेचे आहे. या तरुणांची राहण्याची, गुन्हेगारी करण्याची ठिकाणे, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, मूळ गाव, त्यांचे आयडेंटीटी आणि अॅड्रेस प्रूफ, त्यांनी स्वीकारलेली टोपण नावं, निर्माण केलेली स्वतःची नकली ओळख, त्यांनी आजपर्यंत केलेले छोटे-मोठे गुन्हे, त्यांचा फोटो, वय, संपर्क क्रमांक या सर्व माहितीसहित प्रसार माध्यमातून, सोशल मीडियामधून जास्तीत जास्त प्रमाणात प्रसारित होणे आवश्यक आहे. यामुळे सर्वसामान्य जनता सतर्क होण्यासाठी सहाय्य होईल. गल्लीबोळात विनापरवानगी, विनारजिस्ट्रेशन निर्माण झालेली छोटी-छोटी मंडळं, संघ, संस्था, संघटना आणि त्याच्या नावाखाली राबविले जाणारे विविध सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका, आंदोलन, मोर्चे, शिबीर, उपक्रम यावर पूर्णतः बंदी घालणे आवश्यक आहे. बहुतांश ठिकाणी या सर्व उपक्रमांच्या आडून एकमेकांच्या खोडी काढणे, आपले वर्चस्व सिद्ध करणे, विनाकारण वाद उकरून काढणे आणि त्यातून स्वतःची त्या परिसरात दहशत निर्माण होण्यासाठी हत्यारांचा वापर करणे यांसारख्या घटनांना उत्तेजन मिळते. अतिशय सराईतपणे कोणतेही हत्यार जवळ बाळगताना अथवा वापरताना ही पिढी धजावत नाही, इतका क्रूरपणा यांच्यात भिनलेला असतो.

समुपदेशनामार्फत या वाया जात चाललेल्या युवा जनतेला सकारात्मक वाटचालीकडे कसे नेता येईल, यावर प्रबोधन होऊ शकते. त्यांच्याच वयातील कर्तृत्वान तसेच मोठ्या प्रमाणात यश मिळवून, मानसन्मानाने जीवन जगणाऱ्या इतर तरुणांची उदाहरणे देऊन, आयुष्यात आचार-विचार, मूल्यं यांचे महत्त्व पटवून देऊन, शिक्षण, उद्योजकता, व्यावसायिकता याबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून तसेच आजपर्यंत गुन्हेगार जगतातील प्रत्येकाचं भविष्य किती विदारक आहे, हे उदाहरणांसह पटवून देऊन छोटे-छोटे गुन्हे करणाऱ्या आणि त्यातूनच भीड चेपत जाणाऱ्या युवा पिढीला भानावर आणता येणे शक्य होईल.

या सर्व तरुण मंडळींच्या पालकांना देखील समुपदेशनामार्फत चर्चासत्रात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. आपला मुलगा नेमका काय करतोय, त्याचे सखेसोबती कोण आहेत, त्याने कोणत्याही चुकीच्या मार्गाने वाटचाल केली, तर त्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याची पालकांना देखील पूर्वकल्पना असणे आवश्यक आहे. स्वतःचा चिरंतन विकास साधण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी अनेक प्रामाणिक, चांगले, दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत. तरुण रक्त असताना एक मिनिटासाठी डोक्यात आलेला राग, मिळालेला चुकीचा सल्ला, सुडाची-बदल्याची भावना आणि त्यातून झालेली मारामारी, जीवघेणे हल्ले अथवा खून तुम्हाला कायमस्वरूपी आयुष्यातून उठवू शकतात, हे सातत्याने या तरुण पिढीच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.

कायदा सुव्यवस्था, कायद्यातील कलमं व त्यानुसार बदलणारे शिक्षेचे स्वरूप, गुन्हेगारीतून संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या सत्य घटना सांगितल्या पाहिजेत. या युवकांना प्रबोधनातून लक्षात आणून देणे गरजेचे आहे की, ते समजतात तितक हे सगळं सहज सोपे नाहीये. कदाचित यावेळी केलेलं समुपदेशन, मार्गदर्शन अशा युवकांसाठी आयुष्याचा टर्निंग पॉइंट बनू शकतो आणि ते कायमस्वरूपी गुन्हेगारीतून बाहेर पडून चांगलं आयुष्य जगू शकतात.

लहान मुलांचा गुन्हेगारीसाठी सर्रास वापर होताना दिसतो; कारण ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईमध्ये पळवाट मिळेल, सूट मिळेल अशी सर्वसाधारण धारणा गुन्हेगारांची असते. कोणत्याही आमिषापोटी लहान मुलं पटकन अशा कामाला बळी पडतील, गुन्हेगारीसाठी त्यांचं मन वळवणं सोपं जाईल हा हेतू यामागे असतो. त्यामुळे झोपडपट्टीमध्ये राहणारी लहान मुले, भीक मागणारी लहान मुलं, रेल्वे स्टेशनजवळील वस्त्यांमधील मुलं, महानगरपालिकेच्या तसेच खासगी शाळांमध्ये शिकणारे, पण अत्यंत सर्वसामान्य घरची परिस्थिती असलेले विद्यार्थी, रस्त्याच्या कडेला, पुलाखाली बेकायदेशीररीत्या वस्त्या करून राहणारे परप्रांतीय आणि त्यांची मुलं, पान टपऱ्या, चहा टपऱ्या, औद्योगिक वसाहतीमधील टपऱ्यांवर काम करणारी मुले, याठिकाणी भंगारवाले म्हणून फिरणारे युवक, छोट्या छोट्या हॉटेलवर, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कामाला वेटर म्हणून, कूक म्हणून असलेली मुलं याना देखील समुपदेशन करणे आवश्यक आहे.

या तरुणपिढीमधील मूलतः सगळेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसतात किंवा त्यांची तशी इच्छाही नसते. हे युवक ताबडतोब चुकीच्या मार्गांचा स्वीकार करतात, असे नक्कीच नाही. पण वारंवार त्यांच्या चांगल्या प्रयत्नांना आलेले अपयश, वारंवार, चिकाटीने, मेहनतीने, प्रामाणिकपणे पैसे कमवण्याचे, रोजगार मिळवण्याचे प्रयत्न करून देखील न मिळालेली संधी, नोकरी व्यवसायात आलेले अपयश, बेरोजगारी त्यामुळे येणारे नैराश्य, पैसे कमवण्यासाठी, गरजा भागवण्यासाठी घरातून येणारा दबाव, वाढत चाललेले वय यातून मानसिकता बिघडत जाणे, समाजात चांगल्या माणसाला, चांगल्या कामाला, खरेपणाला काही किंमत नाही, अशी मनोधारणा होणे, संयम आणि सहनशक्ती संपुष्टात येणे ही देखील यामागील कारणे आहेत. त्यांना समुपदेशन, योग्य ते मार्गदर्शन करून नक्कीच योग्य दिशा मिळू शकते.

Recent Posts

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

60 mins ago

Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…

2 hours ago

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

5 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

5 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

8 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

9 hours ago