अनेक कुटुंबात रुग्णांची होते आहे हेळसांड…

Share

समुपदेशनला आलेल्या अनेक प्रकरणातून काही बाबी प्रकर्षाने जाणवत असतात. अनेक घरांमध्ये अंथरुणाला खिळलेले, परावलंबी असलेले ज्येष्ठ, आजारी, वयस्कर, वृद्ध सदस्य असून त्यांची सेवा करणं, त्यांना वेळोवेळी पाहणं, नियमित डॉक्टरकडे नेणं, त्यांचे व्यायाम घेणे, त्यांच्या गोळ्या, औषधं, त्यांची शारीरिक स्वच्छता करणे, पथ्य पाणी पाहणे या गोष्टी वर्षानुवर्षे नियमित स्वरूपात करणे घरातील इतर सदस्यांना खूपच त्रासदायक होत असून त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद आणि भांडण उद्भवताना दिसत आहेत. वयोमानाने आजारपणामुळे आधीच रुग्णाचा स्वभाव चिडचिडा, हटवादी आणि हेकेखोर होत असतो त्यात त्याला घरातून काळजी, प्रेम, आपुलकी आणि चांगली सेवासुश्रूषा मिळत नसेल, तर तो पूर्णतः खचून जातो. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबातील सर्व लोकांची एकजूट, रुग्णाला हाताळण्याची शैली, रुग्णाशी संबंधित कामे वाटून घेण्याची हातोटी आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असते. आपल्याला जे समोर आहे ते करावे तर लागणारच असते, त्याला पर्याय नसतो मग तेच काम आपण किळस न करता, वैतागून अथवा चिडून, रुग्णाला अपशब्द न वापरून केले, तर आपल्याला सुद्धा त्रास होणार नाही आणि घरातील पेशंट पण मानसिक दृष्टीने लवकर उभारी धरेल यात शंका नाही.

अनेक ठिकाणी वयोवृद्ध व्यक्ती शारीरिक तसेच मानसिक आजारांनी देखील ग्रस्त असतात. त्यामुळे घरातील सदस्यांच्या संयमाची आणि सहनशीलतेची कसोटी लागते. अशा कठीण प्रसंगांना तोंड देताना अनेक ठिकाणी या रुग्णाच्या अशा परिस्थितीला जबाबदार कोण, तो स्वतः कसा आयुष्यभर चुकला, चुकीचा वागला, त्याने कुठे आपल्यासाठी काय केलं, त्याच असंच होणार होतं, त्याने आधी आपल्याला त्रास दिलेला आहे या गोष्टी लक्षात ठेवून, त्या व्यक्तीबाबत नकारात्मक भावना मनात ठेवून हिडीस फिडीस करत त्याच्याशी वागलं बोललं जातं. ते आपले आई-वडील असोत, सासू-सासरे असोत अथवा ज्यांच्यावर ही वेळ आली, असे आपले कोणतेही नातेवाईक असोत. आपल्यावर त्यांची सेवा करण्याची वेळ आली, आपल्याच नशिबी हे काम आलं म्हणून त्यावर पश्चाताप, राग वैताग संताप करून घेताना अनेक जण दिसतात. इतर कोणीही नातेवाईक ही जबाबदारी घेत नाहीत, आपणच का हे काम करायचं? आपणच का अडकून पडायचं, तो भाऊ बघत नाही, ती बहीण विचारत नाही, दुसरी सून स्वतःकडे ठेवून घेत नाही, रुग्णाचा खर्च इतर कोणीच उचलत नाही, मग आम्हीच का करायचं? या प्रश्नाचा खूप मोठा बाऊ करून कुटुंबातील लोक पेशंटला बरं करण्याऐवजी, त्याला मानसिक धीर देण्यापेक्षा त्याला शरमेने मान खाली घालायला लावतात. घरोघरी रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत असलेले दिसून येते. वास्तविक अंथरुणाला खिळलेले, मनोरुग्ण असलेले, गंभीर दीर्घ मुदतीचे आजार असलेले आपल्या घरातील रुग्ण सदस्य डॉक्टरच्या औषध उपचारापेक्षा पण, आपणच घरातून दिलेल्या प्रेमाच्या आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या ट्रीटमेंटने बरे होण्याची शक्यता जास्त असते.

घरातील पेशंटसमोर घरातील इतर लोक जर त्यांचा आपल्याला कसा त्रास होतो आहे, किती घाण वाटत आहे, किती किळस येतो आहे, हे सगळे कसे त्रासदायक आहे, अशक्य आहे, यावर बोलत असतील, त्याला जेवण, खानपान यावरून छळत असतील, त्याला उपाशीपोटी ठेवणे, घरात डांबून ठेवणे, रुग्णाला सतत आपल्या नजरकैदेत ठेवणे, त्याच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवून त्याला ताब्यात ठेवायचा प्रयत्न करणे, यासारखे घृणास्पद प्रकार घरोघरी पाहायला मिळतात. रुग्ण परावलंबी आहे म्हणजे तो शारीरिक दृष्टीने दुबळा आहे. पण, त्याचे मन, भावना, इच्छा तर निश्चित जिवंत असतात. त्यामुळे त्याच्याबाबत वागताना अथवा चर्चा करत असताना त्याचा अपमान होईल, मनोधैर्य खचेल, असं वागणं, बोलणं पूर्णतः चुकीचं आहे.

अनेक चांगल्या सुसंस्कृत सुशिक्षित कुटुंबातील लोक आपल्या घरातील वृद्ध, आजारी, मनोरुग्ण अशा पेशंटला वाईट वागणूक देऊन घराबाहेर काढणे, त्यांना वृद्धाश्रमात किंवा इतर ठिकाणी कायमस्वरूपी टाकून देणे, त्यांच्या नावावर काही प्रॉपर्टी, मालमत्ता, पैसे, दागदागिने असल्यास ते चुकीच्या मार्गाने हस्तगत करून अशा रुग्णांची फसवणूक करणे, यांसारखे प्रकार सर्रास करताना दिसतात. आपल्याच घरातील, आपल्या जवळील व्यक्तीला चुकीच्या गोळ्या, औषधं देणे, वेळेवर योग्य गोळ्या न देणे, स्वतःचा त्रास कमी होण्यासाठी त्याच्या मृत्यूची वाट पाहणे, तसं तोंडावर बोलून दाखवणे, त्याच्यापासून कधी सुटका होईल, अशा पद्धतीने रुग्णाशी हिडीसफिडीस करून वागणं असे प्रकार आज अनेक घरात सुरू असून त्यावरून घरातील इतर सदस्यांची भांडणे विकोपाला गेलेली दिसतात.

म्हातारपण आलेल्या, आजारी, थकलेल्या, ग्रासलेल्या आजमितीला निरुपयोगी बनलेल्या आपल्या रक्ताच्या नात्यातील, जवळील व्यक्ती कोणाला सांभाळायला नको असते, पण त्या व्यक्तीचे पैसे, त्याचे घरं, त्या व्यक्तीला मिळणारी पेन्शन, इतर आर्थिक लाभ अथवा त्याच्या बँकेतील पैसे यावर मात्र सगळे हक्क सांगत असतात. त्याहून कहर म्हणजे स्वतःच्या खिशातून अशा रुग्णांवर खर्च तर कोणाला करायचा नसतो, पण त्याचेच हक्काचे पैसेसुद्धा त्याच्या इलाजासाठी, त्याच्या खाण्या-पिण्यासाठी अथवा त्याच्या गरजा भागविण्यासाठी वापरण्याची कोणाचीही दानत नसते. रुग्णाच्या हक्काचे पैसेसुद्धा अनेक घरातील सदस्य स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी वापरताना दिसतात.

अशा परिस्थितीमध्ये कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना दोष देणे, आपापसात वादंग करणे, एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलणे, स्वतःपुरता विचार करणे पूर्णपणे चुकीचं आहे. जर आपण सगळेच मिळून घरातील आनंद, सुख, मजा, हौसमौज एकत्र वाटू शकतो, सेलेब्रेशन, सणवार, पर्यटन, हॉटेलिंग एकत्र एन्जॉय करू शकतो, तर घरातील एखाद्या व्यक्तीवर आरोग्याबाबत समस्या उद्भवल्यास आपण एकत्र येऊन त्याच्या दुःखात, त्याच्या त्रासात त्याला साथ का देऊ शकत नाही? ही वेळ आपल्यावरसुद्धा येऊ शकते, या मानसिकतेमधून अशी परिस्थिती हाताळणे योग्य राहील.

आपल्याला जे आपल्यासोबत होऊ नये वाटते, ते इतर कोणासोबत आपण करू नये, या विचारधारेतून जर आपण वागलो, तरच कुटुंबातील अशा आव्हानांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो. आपल्याच घरातील, आपलेच लोक ज्यांनी स्वतः धडधाकट असताना, ते कमावते असताना, सुदृढ असताना अनेक जबाबदाऱ्या घेतलेल्या असतात, कष्ट केलेले असतात, आपल्यासाठी त्याग केलेले असतात, कुटुंबाला हातभार लावलेला असतो, आपल्याला सुख-दुःखात साथ दिलेली असते त्यांच्यावर दीर्घ मुदतीचे आजारपण ओढवल्यास आपण त्यांना एकटं पाडणं, त्यांना दुर्लक्षित ठेवणं हे निश्चितच माणुसकीला धरून नाही. घरातील एखादी व्यक्ती जोपर्यंत आपल्या फायद्याची आहे, कामाची आहे, तोपर्यंत ती प्रिय असणं आणि त्या व्यक्तीची उपयोगिता संपल्यावर तिला एखाद्या वस्तूसारखं अडगळीत टाकणं, हे माणुसकीमध्ये बसणारे नाही, हा विचार अंगीकारणे काळाची गरज आहे.

-मीनाक्षी जगदाळे

Recent Posts

नेहमी खोटे बोलणारे लोक! काय आहे मानस शास्त्रीय कारण?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…

50 mins ago

घोषणा आणि वल्गना…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…

2 hours ago

IPL 2024: अय्यरच्या जोडीचा धमाका, कोलकाता आयपीएलच्या फायनलमध्ये

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…

3 hours ago

Reel बनवण्याच्या नादात तरूणाने १०० फूट उंचावरून पाण्यात मारली उडी, झाला मृत्यू

मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…

4 hours ago

मुंबईतील मतदान प्रक्रियेच्या ढिसाळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…

5 hours ago

खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसण्याची सवय लावा, होतील हे बरेच फायदे

मुंबई: जमिनीवर ज्या पद्धतीने लोक बसतात ते एक प्रकारचे आसन असते. यामुळे शरीरास अनेक फायदे…

5 hours ago