पेल्यातील वादळाची डोकेदुखी

Share

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्याराज्यांमध्ये कमालीची धावपळ सुरू झालेली आहे. मतदारसंघ एकच व इच्छुक अनेक असल्याने प्रस्थापित नेत्यांची आणि पक्षप्रमुखांची अडचण होते आणि डोकेदुखी प्रचंड प्रमाणात वाढते. त्यात बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये एकहाती सत्ता मिळविणे अवघड जात असल्याने सत्ता मिळविण्यासाठी, सत्ता राखण्यासाठी इतर पक्षांशी युती, आघाडी करावी लागते. मग अशा वेळी जागावाटपामध्ये काही जागा मित्र पक्षांनाही सोडाव्या लागतात. त्यातून नाराजी आणखीनच वाढीस लागते. एकतर प्रत्येक मतदारसंघात इच्छुक असताना त्यात मतदारसंघ मित्रांना दिल्यास मातब्बर कार्यकर्ते व प्रस्थापित पदाधिकारी नाराजी व्यक्त करत बंडखोरीची भाषा बोलू लागतात.

अनेक जण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारीही करतात. अर्थात हा मानसिक त्रास निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत पक्षप्रमुखांना तसेच पक्षातील मातब्बर नेतृत्वाला सहन करावाच लागतो. अर्थात नाराजीची भाषा बोलणाऱ्या, बंडखोरीची तयारी करणाऱ्या शंभरामध्ये दोन-तीन जणच बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असतात. इतर जण नाराजी व्यक्त करत आपले उपद्रवमूल्य तसेच पक्षातील आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. पण हे १०-१५ दिवस पेल्यातील वादळ शमवेपर्यंत पक्षप्रमुखांसाठी प्रतिष्ठेचे असतात. निवडणुकीच्या टप्प्यात पक्षातील वाढती नाराजी हे चित्र जनसामान्यांमध्ये चुकीचा संदेश घेऊन जाते व त्याचा मतदानावरही काही प्रमाणात परिणाम होत असतो. उमेदवारांच्या मुलाखती घेणे, उमेदवार निश्चित करणे, मित्रपक्षांना जागा निश्चित करणे हे सर्व करत असताना पक्षातील नाराजांची, संभाव्य बंडखोरांची मनधरणी करणे हे सर्व एकाचवेळी करताना पक्षप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे निवडणुका म्हटल्यावर हे प्रकार दरवेळी घडतच असतात, सर्वसामान्यांना पाहावयास मिळत असतात.

शिवसेनेचे पुरंदरचे विजय शिवतारे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राणा भीमदेवी थाटात केलेले राजकीय तांडव महाराष्ट्रातील जनतेने जवळून पाहिले आहे, अनुभवलेही आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटत अनेकांच्या भेटीगाठी घेत अजित पवारांच्याविरोधात रान पेटविले होते. अजित पवारांच्या विरोधात नको त्या थराला जात शिवराळ भाषाही वापरली होती. निवडणूक लढविणारच अशी भीष्मप्रतिज्ञा करत बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केलीही होती. अर्थात शिवतारे यांची बंडखोरी अचानक निर्माण झालेली नाही, तर यामागे राजकीय वादाची पार्श्वभूमी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवतारेंना पराभूत करण्यात अजित पवारांचे योगदान मोठे होते. विधानसभा निवडणुकीत शिवतारेंना पाडणारच अशी घोषणा करत अजित पवारांनी ती घोषणा खरीही करून दाखविली होती. त्यामुळे या वादामागे राजकीय सुडाची भावना असल्याने बारामती मतदारसंघातले वातावरण गेल्या १५-२० दिवसांत ढवळून निघाले होते.

शिवतारे टीकेचा भडीमार व शिवराळ भाषेचा सर्रास वापर करताना अजित पवारांनी मात्र डोक्यावर बर्फ ठेवत कमालीचा संयम दाखविला होता. अखेरीला वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवतारेंची बैठक होऊन बारामती मतदारसंघात निर्माण झालेल्या पुरंदरच्या बंडोबाला थंड करण्यात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यश आले आहे. नगर लोकसभा मतदारसंघातही थोड्या फार प्रमाणात तीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात दाखल झालेले आमदार नीलेश लंके हे नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत होते. त्यांनी गावपातळीवर मोर्चेबांधणीही केली होती. पण अजित पवार गटात राहून लोकसभा निवडणूक लढविणे शक्य नसल्याचे दिसताच त्यांनी अजित पवार गटाचा त्याग करत शरद पवार गटाशी मनोमिलाफ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सातारच्या जागेवर उदयनराजेंचा गेल्या काही महिन्यांपासून दावा होता. स्वत: उदयनराजे हे राज्यसभेचे खासदार असतानाही त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. निवडणूक लढविताना जोपर्यंत पक्षाचे तिकीट जाहीर होत नाही, पक्षाकडून उमेदवारी अर्जासोबत एबी फार्म जोडला जात नाही, तोपर्यंत सर्वकाही अनिश्चित असते. अखेरच्या क्षणी दुसऱ्या पक्षातील एखादा मातब्बर आपल्या पक्षात प्रवेश करून तिकीट घेऊन जातो, ते अनेकदा समजतही नाही. मतदारसंघ एक व इच्छुक अनेक असल्याने त्यागाची भूमिका जोपासत पक्षवाढीसाठी योगदान देणे आवश्यक असते, हीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या आमदार-खासदारांसमोर मार्गदर्शन करताना मांडली होती. पक्षप्रमुखांची मर्जी राखणे हीदेखील राजकारणात कला बनली आहे. नाहीतर कालपरवा आलेली मंडळी अल्पावधीतच पक्षात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात आणि आयुष्यभर पक्षाचे झेंडे घेऊन नाचणारे, नेत्यांच्या नावाने बेंबींच्या कंठापासून घसा कोरडा होईपर्यंत घोषणा देणाऱ्यांची दखलही घेतली जात नाही.

कालपरवा येणाऱ्या मिलिंद देवरांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिळते. कारण शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवरील समीकरणे सांभाळायची होती. पूर्वी शिवसेना एकसंध असतानाही काय घडले होते? मराठी माणसांचा नारा देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत विखुरलेल्या शिवसेनेने राज्यसभेवर संजय निरुपम, चंद्रिका केनिया, वेणुगोपाल धूत अशी अनेक अमराठी माणसे पाठविली होती. निष्ठावंतांची नावे केवळ चर्चेत असतात, पण अखेरच्या क्षणी उमेदवारी भलत्यालाच मिळते. हा भारतीय लोकशाहीतील राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला प्रकार आहे. त्या तुलनेत भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष असल्याचे पुन्हा एकवार पाहावयास मिळालेले आहे. अन्य पक्षांमध्ये नाराजीचे, बंडखोरीचे सूर आळवले जात असतानाच महाराष्ट्रातील भाजपामध्ये पक्ष संघटनेची शिस्त जोपासताना कुठेही नाराजी दिसून आलेली नाही. मित्रपक्षांना सांभाळताना त्याग करावा लागणार, ही मनाची समजूत भाजपा पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांनी काढलेली आहे. बंडोबांचे बंड थंड करण्याचे व त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न त्या त्या पक्षात युद्धपातळीवर सुरू आहेत. काही प्रमाणात आयाराम-गयारामही तिकीट मिळविण्यात यशस्वी होतील. सध्या पक्षांर्तगत पातळीवर पेल्यातील वादळे सुरू झाली आहेत. सर्वसामान्य जनतेचे मात्र या कलगीतुऱ्यामध्ये राजकीय मनोरंजन होत आहे.

Recent Posts

केजरीवालांची स्टंटबाजी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…

3 hours ago

श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…

3 hours ago

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

4 hours ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

6 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

7 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

7 hours ago