Friday, June 14, 2024

ओळख

रमेश तांबे

एक होता कावळा, दिसायला जरा काळा! त्याला नेहमी वाईट वाटायचे, आपण काही नाही कामाचे. आपला रंग किती काळपट, दिसतो किती बावळट. आपला आवाज किती चिरका, आपल्याला कुणी नाही बोलवत. आपण उंच नाही उडत, आपल्या पंखात नाही ताकद!

एके दिवशी कावळ्याने ठरवले, आपण स्वतःला बदलायचे. इतरांसारखे छान-छान बनायचे. मग कावळा गेला बगळ्याकडे अन् म्हणाला, “बगळेकाका बगळेकाका तुमचा रंग गोरा कसा? द्या ना उत्तर मला जरा.” बगळा म्हणाला, “रोज करा अंघोळ म्हणजे निघेल अंगाचा मळ.” महिनाभर अंघोळ करून दमला. पण काळा रंग जरा नाही उडाला. म्हणून गोरा बनायचा नाद कावळ्याने सोडला.

मग कावळा गेला मोराकडे अन् म्हणाला, मोरा मोरा तुझी पिसे किती छान! केवढी डौलदार आहे तुझी मान! मलासुद्धा हवीत अशीच पिसे, माझ्याकडे बघून साऱ्यांना फुटेल हसे! मोर म्हणाला आमच्या रानात ये. तेथे पडलेली मोरपिसे तू घे. मग कावळा गेला मोरासोबत रानात, एक एक पीस गोळा करू लागला हसत. कावळ्याने सारी पिसे खोचली आपल्या अंगात, थोडा थोडा दिसू लागला मोराच्या वेषात! कावळ्याला खूप आनंद झाला. त्याच आनंदात तो आकाशात उडाला. पण एका मिनिटातच सारी पिसे गळून पडली. कावळ्याची सारी मेहनत वाया गेली. दुसऱ्या दिवशी कावळा जंगलात जाऊन गरुडाला भेटला आणि म्हणाला, गरुडदादा गरुडदादा एवढे उंच कसे उडता? पंखात बळ येण्यासाठी कोणत्या व्यायामशाळेत जाता! गरुड हसत म्हणाला, “कावळेभाऊ ऐका जरा नीट, व्हा जरा तुम्ही धीट. पाच तास रोज रोज, सराव करा उंच उडण्याचा. मग बघा सगळ्यांना हेवा वाटेल तुमचा. आता कावळा रोज उडू लागला. पंखांचा व्यायाम सुरू झाला. उडून उडून कावळा गेला दमून. आता त्याचे पंख गेले दुखून. गळू लागली त्याची पिसे आता पाच तास उडणार कसे! मग उंच उडण्याचा त्याने दिला नाद सोडून!

आपला आवाज गोड होतोय का बघूया प्रयत्न करून, गाण्याऱ्या पक्ष्यांना येऊ जरूर भेटून. कावळ्याला वाटले हे काम सोपे आहे. रोज फक्त गायचे आहे. आता कावळा गेला मैनेकडे आणि म्हणाला, “मैनाताई मैनाताई ऐका ना जरा… आवाज माझा भसाडा, आहे थोडा चिरका, होईल ना तो बरा!” मैना म्हणाली, “कावळेभाऊ कावळेभाऊ एकदम सोपे आहे बघा. रोज-रोज गात राहायचं. कोण काय बोलतंय आपण नाही बघायचं. एक दिवस आवाज तुमचा, जगात होईल भारी. कोकीळसुद्धा ऐकायला येईल तुमच्या दारी!” मग रोज कावळा गाऊ लागला गाणी, किती विचित्र होती त्याची वाणी. सकाळ, दुपार, संध्याकाळ, कर्कश आवाजाने साऱ्यांचे कान किटले! मग पक्ष्यांसह, माणसांनीदेखील त्याला पिटाळले. एका झाडावर बसून कावळा दूर जंगलात, विचार करू लागला मनात. आपल्याला काहीच नाही जमत. इतरांसारखं खास नाही बनता येत. कावळा एकदम निराश झाला. दोन महिने तो लपूनच बसला. त्याच्या मनात येई माझ्याकडे विशेष असं काही नाही. रंग नाही, रूप नाही. आवाज नाही, कोणती कला नाही. दोन महिने निराशेत गेले.

एके दिवशी कावळा घराबाहेर पडला. उडता उडता एका शाळेत पोहोचला. तिथे गुरुजी मुलांना कावळ्यांचाच गुण सांगत होते. ते ऐकून कावळा चकीत झाला. गुरुजी सांगत होते, “प्रयत्न करणे हा कावळ्याचा विशेष गुण आहे. तो साऱ्या मुलांनी घ्यावा.” हे ऐकून कावळ्याला स्वतःचा अभिमान वाटला. माणसांनादेखील आपल्यापासून शिकण्यासारखं आहे याचंच त्याला आश्चर्य वाटलं.

मग मी स्वतःला कमी का समजू, माझ्यातही आहे विशेष गुण! रंग नाही, रूप नाही, आवाज नाही असे असले तरी मी आहे भारी! कारण सगळ्यात हुशार माणूस प्राणीदेखील माझ्यापासून शिकतो काही. आज कावळ्याला स्वतःची खरी ओळख पटली. त्याची छाती अभिमानानं फुगली. आनंदाने त्याने घेतली आकाशात भरारी, खरेच आज भलतीच खूश होती कावळ्याची स्वारी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -