नकारात्मकतेची होवो होळी…

Share

वैष्णवी कुलकर्णी

दैनंदिन कामं करताना आपल्या हेतूआड येणाऱ्यांवर तुफान शेरेबाजी करणं, वाईट साईट बोलून त्यांना नामोहरम करणं अशा बाबी समाजात नेहमीच सुरू असतात. पण ‘शिमगा’ या शब्दाला चिकटलेली ही सगळी घाण बाजूला सारत होळी सादरी करण्याच्या सुयोग्य पद्धती, त्यामागील कथा आणि या सणाचं प्रयोजन जाणून घेतलं तर त्याचं महत्त्व अधिक नेमकेपणानं समजेल असं वाटतं.

देशभर अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे होळी. सर्व दुष्ट, अमंगल, नकारात्मक शक्तींचा नाश करून नव्या वर्षाच्या स्वागताला सज्ज होण्याचा एक सुंदर रिवाज या सणाच्या निमित्तानं पार पडतो. ही परंपरा आजही गावागावांतून जपली जाते. शिमगा हे याच सणाचं दुसरं नाव. अर्थात हा सण वर्षातून एक दिवस साजरा होत असला तरी तसं तर ‘शिमगा’ दर दिवशीच साजरा होत असतो! एकमेकांच्या नावानं बोंब ठोकणं, एकमेकांना अद्वातद्वा बोलणं, एकमेकांच्या कुळाचा उद्धार करणं हे होळीच्या निमित्तानं मनातली, वृत्तीतली नकारात्मकता दूर करण्यासाठी व्यक्त होण्याचे नानाविध मार्ग असले तरी एरव्हीही होळी नसताना शिमगा साजरा होतच असतो. यात राजकारण्यांचा हात धरणारं कोणी नाही. याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत आणि सध्याही बघत आहोत.

पाच महत्त्वपूर्ण राज्यांमधले निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर देशभर उठणारा धुराळा आणि खेळली जाणारी धूळवड काही वेगळ्याच प्रकारची असणार हे सांगण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीच्या आधी आणि नंतरही एकमेकांवर दोषारोप करण्याची, चिखलफेक करण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही. समाजातही दैनंदिन कामं करताना आपल्या हेतूआड येणाऱ्यांवर तुफान शेरेबाजी करणं, वाईट साईट बोलून त्यांना नामोहरम करणं अशा बाबी सुरूच असतात. पण या शब्दाला चिकटलेली ही सगळी घाण बाजूला सारत होळी, शिमगा सादरा करण्याच्या सुयोग्य पद्धती, त्यामागील कथा आणि या सणाचं प्रयोजन जाणून घेतलं, तर त्याचं महत्त्व अधिक नेमकेपणानं समजेल असं वाटतं.

दर वर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. तो क्रूर, अन्यायी आणि जुलमी होता. या राजाला प्रल्हाद नावाचा पुत्र होता. हा बीज पोटात अंकुरत असताना प्रल्हादची आई नारदमुनींच्या आश्रमात राहात होती. प्रल्हादचं अंत:करण सुरुवातीपासूनच भगवद्भक्तीने ओथंबलं होतं. तो सतत देवाचा जप करत असे. मुलाचं हे वर्तन राजाला अजिबात रुचलं नाही. पोटच्या मुलाला ठार करण्याचे सगळे प्रयत्न हिरण्यकश्यपूनं करून बघितले. पण प्रत्येक वेळी देवाच्या कृपेनं प्रल्हाद वाचत होता. शेवटी हिरण्यकश्यपूच्या बहिणीनं-होलिकेनं प्रयत्न करायचे ठरवले. तिला अग्नी जाळणार नाही, असं वरदान होतं. त्यामुळे प्रल्हादच्या नाशासाठी ती त्याला मांडीवर घेऊन बसली आणि होळी पेटवली गेली. पण घडलं काय? ईश्वरभक्त प्रल्हाद त्यातून सुखरूप बाहेर पडला आणि होलिका मात्र जळून खाक झाली. या अग्नीनं प्रल्हादला योग्य न्याय दिला म्हणून घरोघरी अग्नी पेटवून पूजा करण्यात आली. आता ही पूजा सामुदायिकरीत्या केली जाते. होळीला संध्याकाळी नैवेद्य दाखवला जातो, तिला प्रदक्षिणा घातल्या जातात. होलिका जळून खाक झाल्यामुळे आनंदित झालेल्या प्रजेनं गुलाल आणि रंग उधळून रंगोत्सव साजरा केला. एकत्र नाचून, गाणी म्हणून मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि रंगपंचमी किंवा धूळवडीची प्रथा सुरू झाली. ती आजही मनोभावे पाळली जाते.

आपला प्रत्येक सण प्रतिकात्मक आहे. साहजिकच स्थूल रूपानं कृती करायची आणि त्यातून मिळणारा संदेश अंगी बाणवायचा असतो. होळीची पूजा म्हणजे दुष्प्रवृत्तींचं दहन आणि सद्प्रवृत्तींचं पूजन असतं. आपल्या मनात असलेले दुष्ट विचार, द्वेष, मत्सर, अज्ञान, अंधविश्वास, एकमेकांबद्दलची कटुता या सार्यांचं दहन होळीमध्ये करायचं असतं आणि मनाची शुद्धी करायची असते. नंतर या शुद्ध मनानं गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा असते. रंगोत्सवाच्या दिवशी संस्कृतीने आपल्याला मुक्तपणे वागण्याची मुभा दिली आहे. या दिवशी माणसा-माणसातल्या दुराव्याच्या भिंती अलगद गळून पडतात. एरवी फक्त स्मितहास्यापलीकडे न सरकणारा संवाद रंग लावल्यावर शब्दांपलीकडचा होऊन जातो. गुलालाच्या फक्त एका बोटानं समज-गैरसमज, मान-अपमान क्षणात पुसले जातात आणि त्या रंगासारखा आनंद क्षणभर रेंगाळत राहतो. या दिवशी सारे उमाळे, उसासे बाजूला ठेवून एकमेकांना रंग लावला जातो. त्यात थट्टा असते, प्रेम असतं, हक्क असतो आणि लटकं भांडणही असतं. ही सैलावलेली नाती अनुभवताना खूप मोकळं मोकळं वाटतं. मोकळेपणी हसणं, दुसऱ्याला चिडवणं, मुक्तपणे व्यक्त होणं हे किती गरजेचं आहे हे या दिवशी लक्षात येतं. मग हा आनंद दुसऱ्या होळीपर्यंत हृदयात जपला जातो.

होळी, धूळवड, रंगपंचमी हे सण आनंदात येतात. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करायचा झाला तर होळीच्या दिवशी पुरोहित बोलावून होलिका पूजन केलं जातं. ही होळी म्हणजे देवी आहे. तिच्या पूजनाने जीवनातले अनिष्ट प्रसंग टळतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या पेटत्या होळीला नारळ अर्पण केला जातो आणि नंतर तो काढल्यावर उपस्थितांना प्रसाद म्हणून वाटला जातो. काही कर्मठ लोक गुळाचे साप, विंचू, झुरळ, ढेकूण बनवून होळीच्या आगीत जाळतात. हे सगळं सुरू असताना जमलेले पुरुष बोंब मारत राहतात. इंग्रजी राजवटीत त्यांच्या अन्याय्य शासनपद्धतीचा निषेध म्हणून एक बोंब ठोकली जायची. ‘होळी म्हण होळी, पुरणाची पोळी… इंग्रज मेला संध्याकाळी…’ अशा काही टवाळखोर घोषणा होळीभोवती दिल्या जात असल्याची आठवण वृद्धांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते.

जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रात होळी या सणाचा उल्लेख ‘होलाका’ म्हणून केला आहे. हा सण भारताच्या पूर्व भागात अतिशय लोकप्रिय होता. तो साजरा करण्याचे विविध प्रकार जैमिनीसूत्र, काठक गृह्यसूत्र, लिंग पुराण, हेमाद्रिचं व्रत खंड, वराहपुराणात सांगितले आहेत. या ग्रंथांमध्ये या सणासंबंधीचे अनेक प्राचीन संदर्भ आणि सण साजरा करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. काठक गृह्यसूत्रामध्ये ‘राकाहोलाके’ नावाचं सूत्र आहे. टीकाकारांनी याचा अर्थ लावताना होलाके हा स्त्रीच्या सौभाग्य वर्धनासाठी करावयाचा एक विधी असल्याचं सांगितलं आहे. त्यात राका म्हणजे पौर्णिमा ही देवता असते. म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या या विधीने स्त्रीचं सौभाग्य वाढतं असं यात सांगितलं आहे.

वात्स्यायनाने कामसूत्रात स्त्री-पुरुषांच्या क्रीडाप्रकारात वीस खेळ सांगितले आहेत. त्यावेळी हे खेळ कमी-अधिक प्रमाणात विविध प्रातांमध्ये खेळत असतं. त्यात ‘होलाका’ हा एक खेळ सांगितला आहे. यात जनावरांच्या शिगांमधून, बांबू वा तत्सम साधनांमधून एकमेकांवर रंग उडवला जात असे. यावेळी पाण्याचाही वापर होत असे. हेमाद्रीने बृहद्यमाच्या ग्रंथात होळी पौर्णिमेला ‘फाल्गिनिका’ म्हटलं आहे. तो दिवस बालीश चेष्टा करून, बालीशपणा करून साजरा केल्यास संसार सुखाचा होतो असं सांगितलं आहे. यामुळे लोकांची भरभराट होते, असंही हा ग्रंथ सांगतो. वराहपुराणात या पौर्णिमेला ‘पटवासविलासिनी’ म्हटलं आहे. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंगीत पुड्या उधळून दिवस साजरा करावा असं या पुराणात सांगितलं आहे. भविष्योत्तर पुराणात कृष्ण-युधिष्ठिर संवादात रघुराजाची एक कथा सांगितली आहे. त्याच्या राज्यात ‘ढुंढा’ नावाची एक राक्षसीण मुलांना रात्रंदिवस पीडत असे. देव वा मनुष्य यांच्यापासून तुला मरण येणार नाही, असा वर तिला ब्रह्मदेवाने दिलेला असतो. तिच्या पिडेच्या निवारणार्थ पुरोहिताच्या सल्ल्याने राजाने फाल्गुनी पौर्णिमेला घराबाहेर लाकडाचा ढीग करून रात्रभर पेटता ठेवावा, अश्लील शब्द उच्चारून मोठा ध्वनी करावा अशी आज्ञा दिली. आणि खरंच त्यायोगे राक्षसी मरण पावली. तेव्हापासून तो दिवस ‘अडाडा’ किंवा ‘होलिका’ या नावाने प्रसिद्ध आहे. वद्य प्रतिपदेला होळीच्या राखाडीला वंदन करून, तिथे पाणी तापवून, अंगाला राख फासून स्नान करावं असं सांगितलं आहे. होळी म्हणजे हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात. या दिवसात वसंताचं साम्राज्य पसरलेलं असतं. म्हणून या दिवशी चंदन आणि आम्रमोहोर यांच्या साह्याने कामदेवाची पूजा करण्याविषयीदेखील सांगितलं आहे. ही पूजा आयुष्यभर सुख प्रदान करते. जैमिनी आणि काठक गृह्यसूत्रातल्या संदर्भावरुन हा सण ख्रिस्तपूर्व काळात काही शतकं अस्तित्वात आणि लोक अनुभूतीत असावा असं दिसून येतं. वसंताच्या आगमनाचं स्वागत कामोद्दिपक नृत्य-गीत गायनानं करावे, असं यात म्हटलं आहे. भविष्योत्तर पुराण आणि कामसूत्रातही हा सूर आळवला गेलेला दिसतो. विविध प्रांतात होलिकोत्सव परंपरेप्रमाणे एक, तीन वा पाच दिवस साजरा केला जातो. शूलपाणीलिखित ‘दोला यात्रा विवेक’ या ग्रंथात या सणाचं विधीविधान सांगितलं आहे.

Recent Posts

रा. जि.प शाळा चोरढे मराठी येथे साकारला नवागतांचा मेळावा….

मुरुड, (प्रतिनिधी संतोष रांजणकर) हर्ष हा साकारला मनी आनंदाच्या या क्षणी नवागतांचे करी स्वागत सर्व…

7 hours ago

Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का…

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच…

8 hours ago

Hardik pandya: हार्दिक पांड्याचा मुलासोबत क्यूट Video, नाही दिसली पत्नी

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे आणि ते सुपर…

8 hours ago

Health: तुम्ही मुलांना टाल्कम पावडर वापरता का? आजच थांबा

मुंबई: मुलांमध्ये उन्हाळा आणि घामापासून बचावासाठी अधिकतर आंघोळीनंतर मुलांना भरपूर टाल्कम पावडर लावतात. असे केल्या…

10 hours ago

Kalyan News : रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचा खड्ड्यात बसून ठिय्या

योगिधाम परिसरात मुख्य रस्त्यात खड्डा खणल्याने नागरिक संतप्त कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरात नुकताच…

11 hours ago

Sikkim Rain : सिक्कीममध्ये पावसाच्या थैमानात महाराष्ट्रातील २८ जण अडकले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; अडकलेल्यांशी संपर्क साधत दिला धीर डेहराडून : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी…

12 hours ago