Hindi songs : राह भूले थे कहाँसे हम…

Share

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

नोव्हेंबर १९१२ ते मार्च १९५७ इतके म्हणजे अवघे ४५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अमिय चक्रवर्ती यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकूण १५ चित्रपट दिले. तेही १९४० ते १९५७ या केवळ १७ वर्षांत! त्यातले पतिता, सीमा, दाग, कठपुतली, देख कबीरा रोया, असे अनेक चित्रपट लोकांच्या आजही स्मरणात आहेत. ‘सीमा’ला तर सर्वोत्कृष्ट कथेचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले होते. पतिता आणि सीमा हे नायिकाप्रधान चित्रपट होते.

‘सीमा’(१९५५)मध्ये नायिका किशोरी गौरी (नूतन) ही अनाथ मुलगी आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिचे मामा काशिनाथ (शिवराज) यांच्याकडे राहायला येते. मामी मात्र तिचा छळ करत असते. तिला बाहेर मोलमजुरीला पाठवून तिची मजुरी स्वत:च हडप करते.

एकदा काशिनाथला अचानक पोलीस स्टेशनमधून बोलावणे येते. अल्पवयीन गौरीने मालकाचा हार चोरल्याची तक्रार तिच्याबरोबर काम करणाऱ्या बांकेलालने दिल्यामुळे आणि ती अल्पवयीन असल्याने तिला वर्तन सुधारण्यासाठी वर्षभर मामाकडेच ‘ऑन प्रोबेशन’ ठेवले जाते. नूतन तिथून पळून जाऊन तिच्याविरुद्ध खोटी तक्रार नोंदवणाऱ्या बांकेलालला (सी. एस. दुबे) मारहाण करते.

पुन्हा पोलीस केस होऊन गौरीला आता अशोकबाबू ‘श्री सत्यानंद अनाथाश्रमात’ ठेवले जाते. आश्रमाचे व्यवस्थापक अशोकबाबू (बलराज सहानी) हे अत्यंत सेवाभावी समंजस आणि सज्जन गृहस्थ असतात. ते गौरीला समजावून घेण्याचा, प्रेमाने समजावण्याचा खूप प्रयत्न करतात. मात्र सर्व जगावर चिडलेली गौरी आश्रमाचे कोणतेच नियम पाळत नाही. शेवटी तिला इतर मुलींपासून वेगळे, एकांतात ठेवले जाते. तिथेही ती फर्निचरची तोडफोड करते आणि खिडकीतून पळून जाऊन पुन्हा बांकेलालला बेदम मारते. इतर कुठेच जाणे शक्य नसल्याने ती परत आश्रमात येते. पुन्हा सक्तीचा एकांतवास! त्यानंतर अशोकबाबूंना कळते की, गौरी दोषी नसून बांकेलालनेच तिला खोट्या तक्रारीत अडकवले होते. ही माहिती पोलिसांना दिल्यावर तिची शिक्षा रद्द होऊन सुटका केली जाते. मात्र गौरी आश्रम सोडायला तयार नसते. शेवटी आश्रमाचे नियम पाळण्याच्या अटीवर तिला राहू दिले जाते.

स्वत:वर वारंवार झालेल्या अन्यायामुळे सारासार विवेक गमावलेल्या, जवळजवळ वेडाच्या जवळ जाणारी वागणूक असलेल्या एका संतप्त तरुणीचे पुनर्वसन हा सिनेमाचा विषय होता. तो चक्रवर्तीजींनी अतिशय हळुवारपणे हाताळला. त्या काळी समाजमनावर गांधीजींच्या विचाराचा प्रचंड प्रभाव होता आणि गांधीजींवर येशू ख्रिस्ताच्या क्षमा आणि विनाअट निरपेक्ष प्रेमाच्या विचारांचा प्रभाव होता. त्याचा वापर करून कसे गुन्हेगार व्यक्तीचे हृदयपरिवर्तन शक्य आहे हे ‘सीमा’ने निर्णायकपणे दाखवून दिले.

आजही शंकर जयकिसान यांच्या संगीत दिग्दर्शनात मन्ना डे यांनी गायलेले शैलेन्द्रचे ‘सीमा’मधील एक भजनवजा गाणे अनेकांच्या मनात कोरले गेलेले आहे. खरे तर ती एक प्रार्थना आहे. गौरी रोज आश्रमात गोंधळ घालत असते, एकेक नियम तोडून प्रत्यक्ष तोडफोडही करत असते. त्यावर अशोकबाबू मात्र तिला शिक्षा देण्याऐवजी तिची मन:स्थिती समजावून घेत तिच्यावर उपचार करत असतात. त्यांच्या मते अशा व्यक्तींना शिक्षेने नाही तर प्रेमानेच सुधारता येते. त्या पार्श्वभूमीवर शैलेन्द्रजींचे शब्द थेट हृदयात उतरतात, श्रोत्यालाही अंतर्मुख करून सगळ्याच गोष्टीवर नव्याने विचार करायला भाग पडतात. ईश्वराला उद्देशून केलेल्या त्या प्रामाणिक प्रार्थनेचे शब्द होते –
तू प्यारका सागर हैं…
तेरी इक बूँदके प्यासे हम,
लौटा जो दिया तुने,
चले जायेंगे जहांसे हम.
तू प्यारका सागर हैं…

आम्ही कसेही असू, पण हे देवा, तू तर प्रेमाचा सागर आहेस. आम्हाला तुझ्या प्रेमाचा एक थेंब जरी मिळाला तरी आमचे जीवन सार्थ होईल. पण जर तूच आम्हाला परत पाठवलेस तर आम्ही कुठे जावे? हे म्हणताना शैलेन्द्र यांनी जणू एक श्लेष साधला होता. ‘चले जायेंगे जहाँसे हम’मधील जहां म्हणजे एक स्थळ होऊ शकते तसेच ‘जहाँ’चा अर्थ हे जग असाही घेतला जाऊ शकतो. तो अर्थ म्हणजे – ‘देवा, जर तूच नाकारलेस, तर आम्ही तुझे हे जग सोडून जाऊ’ अशीही त्याची करुणा भाकणे ठरू शकते…

गौरीची बालपणापासूनची दुःखाची, तिच्यावर एका पाठोपाठ झालेल्या अन्यायाची कहाणी बलराज सहानींच्या मनात सतत घोळते आहे. गौरीला सगळे जग नकोसे झाले आहे. बालसुधार केंद्रासारखे तिला आश्रमात कोंडून राहणे असह्य वाटते आहे, हे त्यांना जाणवते आहे. मात्र अफाट जगात ती किती असुरक्षित आहे, ती जीवनाचा रस्ता कुठे चुकलीये हे तिच्या लक्षात येत नाही याचीही त्यांना चिंता आहे. म्हणून त्यांच्या सात्त्विक, सौज्वळ मुखातून पुढचे शब्द येतात-
घायल मनका पागल पंछी,
उड़नेको बेक़रार,
पंख हैंं कोमल आँख हैंं धुँधली,
जाना हैं सागरपार.
अब तूही इसे समझा,
राह भूले थे कहाँसे हम…

प्रत्येकाला आपलीच बाजू बरोबर आहे असे वाटत राहते. आपणही कुठेतरी सत्याची कास सोडली होती, तात्कालिक स्वार्थासाठी तत्त्वांशी फारकत घेतली होती हे माणसाला अनेकदा समजतच नाही. कधीकधी लक्षात येऊनही मन ते मान्य करायला तयार होत नाही. म्हणून शैलेंद्रजी आपल्या प्रार्थनेत देवालाच विनंती करतात. ‘तूच आम्हाला सांग आम्ही सत्याचा रस्ता कधी सोडला? एकीकडे सुशील जीवनाचा सरळ रस्ता आहे, तर दुसरीकडे पापाचा, नैतिक पतनाचा मृत्यूचा मार्ग आहे. या दोघांतली लक्ष्मणरेषा आम्हाला दिसतच नाहीये. आता परमेश्वरा, तूच जरा आमच्या कानात सांग, आम्ही कुठून आलो, आता कोणत्या मार्गाने जावे? –
इधर झूमके गाये ज़िंदगी,
उधर हैं मौत खड़ी.
कोई क्या जाने कहाँ हैं सीमा,
उलझन आन पड़ी…
कानोंमें ज़रा कह दे,
कि आएँ कौन दिशासे हम…
तू प्यार का सागर हैं…

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याच्या मनातील उलघालीच्या वेळी उठणाऱ्या वादळी लाटांचे चित्र गीतकाराने फार उत्कटपणे चितारले होते. त्यामुळेच हे गाणे केवळ एक सिनेगीत राहिले नाही, तर चित्रपटसृष्टीच्या खजिन्यातील एक अनमोल दागिना बनला.

अनेकदा आपणही रस्ता चुकतो, गोंधळतो, कुणीतरी मार्ग दाखवावा, असे तीव्रतेने वाटते. आता त्या ‘वरच्या’ची कृपा हवी, असे वाटू लागते. तेव्हा मनातल्या मनात शैलेंद्रजींचे हेच शब्द आळवले तरी मार्ग सापडतो – “अब तूही इसे समझा, राह भूले थे कहाँसे हम… तू प्यार का सागर हैंं.”

Recent Posts

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

23 mins ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

2 hours ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

3 hours ago

Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…

3 hours ago

Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…

4 hours ago

IT Raid : अबब! पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये दडवलेले तब्बल १०० कोटी!

दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…

4 hours ago