विजय, स्नेह, मांगल्याचे प्रतीक म्हणजे गुढी

Share

वर्षा हांडे-यादव

अंगणात शोभते
गुढी नक्षीदार
नववर्ष घेऊन आले
आनंद समृद्धीची बहार

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा सण आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विजयाचे, आनंदाचे, स्नेहाचे, मांगल्याचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशम वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधीत फुलांचा हार आणी साखरेच्या गाठी बांधून त्यावर गडू बसवून साकारली जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याची पद्धत आहे. कडुलिंबाची पाने रक्त शुद्ध करते, प्रतिकारशक्ती वाढवते. तसेच अनेक कुटुंबांमध्ये पुराणपोळी किंवा श्रीखंड पुरी केली जाते. गुढीपाडवा साजरा करण्यामागे काही कथा अशा आहेत की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामचंद्राने वालीचा वध केला. त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते. त्याच्या आसुरी शक्तीचा श्रीरामाने नाश केला. ह्याचा विजयोत्सव म्हणून गुढी सूचक आहे. १४ वर्षे वनवासातून परतून रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्यात परत आले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्णनगरीत गुढी उभारली, तोरणे लावली.

ब्रह्मपुराणानुसार ब्रह्मदेवाने नव्याने सगळ्या विश्वाची निर्मिती व वेळ निर्माण केली असे म्हणतात. विक्रम संवत्सर या कालगणनीची सुरुवात ह्याच दिवसापासून झाली. तसेच मत्स्यरूप धारण करून भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध केला होता. मत्स्यरूपी विष्णूचा जन्म हा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला. गुढीपाढव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे ह्या दिवसाकडे शुभ दिवस म्हणून पाहिले जाते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवउपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी इत्यादी गोष्टी प्राधान्याने केल्या जातात. ऐतिहासिक, संस्कृतिक व नैसर्गिकदृष्ट्या या सणाला विशेष महत्त्व आहे. यावेळी वातावरणात बदल झालेले असतात. कडुलिंबाच्या पानांचा वापर गुढीत बसवण्यासाठी केला जातो व आंघोळीच्या पाण्यातही त्याचा वापर केला जातो.

संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा दिवस म्हणून गुढीपाडव्याकडे बघितले जाते. हा सण आपल्याला भूतकाळ विसरून नवे संकल्प करून उमेदीने आणि आनंदाने जीवनाला सामोरे जाण्याचा उत्साह देतो. गुढीपाडवा का साजरा करतात या विषयी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. आपणच आपल्या मुलाबाळांना, भावी पिढीला आपल्या सणांचे महत्त्व सांगितले पाहिजे. हिंदू धर्मशास्त्र असे मानते की, गुढी हे विजयाचे प्रतीक आहे, समृद्धीचे प्रतीक आहे. ज्या घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो. तसेच राग, क्रोध या दुर्गुणांवर विजय मिळतो. आपण जे काम करतो, कष्ट करतो त्यातून घरामध्ये सुख-समृद्धी यावी यासाठीचे प्रतीक म्हणजे ही गुढी असते.

महाभारत काळात उपरिचर नावाचा राजा होता. त्याला इंद्रदेवाने एक कळकाची काठी दिली होती. म्हणून इंद्र देवाचा आदर करावा, इंद्राच्या आदराप्रीत्यर्थ या उपरिचर राजाने आपल्या महालासमोर जमिनीमध्ये ही काठी रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधिवत पूजा केली. हा दिवस होता तो हिंदूंच्या नववर्षाचा पहिला दिवस. त्या राजाने ती काठी रोवली ते पाहून इतरही राजांनी आपापल्या परीने लोणच्या काठीवर वस्त्र लावली तिला सजवले. फुलांच्या माळा बांधल्या. अशा रीतीने काठीची पूजा होऊ लागली आणि या सणाची सुरुवात तेव्हापासून झाली. अजूनही पौराणिक कथा या आधी वर्णन केल्या आहेत.

सगळेजण अंगणात, सार्वजानिक ठिकानी, पूजेच्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढतात. दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. सर्वजण पारंपरिक वस्त्र परिधान करतात, सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. लेझीम, झांज, ताशा, ढोलपथक घेऊन सर्वजण छानपैकी नृत्य करून, मिरवणूक काढून नववर्षाचे स्वागत करतात. शेवटी एवढेच सांगू इच्छीते की,
वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा
गाई मंजुळ गाणी
नव वर्ष आज शुभ दिनी
सुख-समृद्धी नांदो सगळ्यांच्या जीवनी

Recent Posts

Sandeep Deshpande : …त्यानंतर संजय राऊत सामनामध्ये संपादकच काय कारकून म्हणूनही राहणार नाहीत!

संजय राऊतांच्या टीकेवर मनसेचे संदीप देशपांडे यांचे प्रत्युत्तर मुंबई : मनसेने महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा…

28 mins ago

Nashik scam : नाशिकच्या ८०० कोटींच्या घोटाळ्यात संजय राऊत आणि सुधाकर बडगुजरांचा हात!

संजय राऊतांच्या आरोपांवर शिवसेना व भाजपा नेत्यांचा पलटवार नेमकं प्रकरण काय? मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री…

1 hour ago

बोलघेवड्या अनिल देशमुखांना जयंत पाटलांनी उताणी पाडले!

शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेल्याचा केला होता अनिल देशमुखांनी खळबळजनक दावा…

2 hours ago

Manoj Jarange : दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात केलं दाखल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे…

2 hours ago

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत! २२ वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

मध्यरात्री नेमकं काय घडलं? पुणे : पुण्यात गुन्हेगारीची (Pune Crime) समस्या अत्यंत गंभीर बनत चालली…

2 hours ago

Crime : नात्याला कलंक! मुलाचा मळलेला ड्रेस पाहून जन्मदात्रीने केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

बेदम मारहाण...कपड्यांशिवाय घराबाहेर उभं केलं आणि... नवी दिल्ली : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला कलंक…

2 hours ago