Share

उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार

 

सरत्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यावरून मागे वळून पाहताना ठळकपणे समोर येणाऱ्या अनेक घटना, व्यक्ती दिसतात. नीरज चोप्रा, पी. व्ही. सिंधू, नताशा दलाल, शहनाज गिल अशी या वर्षात देदीप्यमान ठरलेली काही नावं तर आर्यन खान, राज कुंद्रा, काही राजकारणी ही वादग्रस्त नावं. वर्षाच्या मध्यावर पसरलेली कोविडची जीवघेणी दुसरी साथ आणि स्वत:च्या बर्थ सर्टिफिकेटपेक्षा महत्त्वाचं असणारं व्हॅक्सिन सर्टिफिकेटही भाव खाऊन गेलं. जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरणाची जगातली सर्वात मोठी मोहीम आणि भारतात विक्रमी वेळेत तयार झालेली कोरोनावरची लसही चर्चेचा एक महत्त्वाचा बिंदू. एक ना अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. या झाल्या भारतातल्या महत्त्वाच्या नोंदी. जागतिक पटलावरच्या काही ठळक नोंदीही लक्षात घ्यायला हव्यात.

ट्रम्प महाशयांनी तालिबानबरोबर डील करून १ मेपर्यंत अमेरिकन फौजा अफगाणिस्तानातून परततील, अशी योजना आखली होती. बायडन यांच्या अमेरिकन फौजा दोन आठवडे आधीच परतल्या आणि पत्त्याचा बंगला कोसळावा, असा प्रथम अफगाण फौजा आणि नंतर करझाईचा अफगाण कोसळला. वीस वर्षांमध्ये दरवर्षी ३०० मिलियन डॉलर खर्च करून एक देश उभा केल्याचं समाधानही अमेरिकेच्या पदरी पडलं नाही. उलट, चार हजार अमेरिकन सैनिक आणि दोन लाख अफगाण नागरिक मृत्युमुखी पावले. हे पातक वेगळचं.

जगभरात पर्यावरणाच्या बदलांनी हाहाकार माजवला. बेल्जियम आणि पश्चिम जर्मनीमध्ये प्रथमच महापूर आले. ग्रीसच्या जंगलांना प्रचंड मोठी आग लागली. भारत आणि नेपाळमध्ये महापुराने हाहाकार माजवला. त्यानंतर झालेल्या सीओपी २६ पर्यावरण परिषदेतून मिथेन उत्सर्जन कमी करण्याच्या निर्धाराव्यतिरिक्त फारसं काही पदरी पडलं नाही. कोरोनाच्या कठीण काळातही जपानने टोक्यो ऑलिम्पिक शिस्तबद्ध पद्धतीने भरवलं. त्यातल्या अॅथलेटिक्समधल्या आणि महिला हॉकीमधली भारताची कामगिरी सुखावणारी होती.

जर्मनीमध्ये एंजला मर्केल यांचं युग अखेर संपुष्टात येतंय. युरोपच्या नव्हे, तर संपूर्ण जगाच्या राजकारणावर छाप पाडणारी मार्गारेट थॅचर यांच्यानंतरची ही महिला राष्ट्रप्रमुख. चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीला १०० वर्षं पूर्ण झाली आणि एक सशक्त अर्थव्यवस्था म्हणून या दशकात चीन नुसताच स्थिरावला नाही, तर अधिक आक्रमक बनला. चीनमधलं जीवनमान आणि पायाभूत
सोयी-सुविधांमध्ये गेल्या दशकात विलक्षण गतीनं वाढ झाली. जागतिक स्तरावरील आपलं स्थान आणि अनेक देशांपुढे उभं केलेलं आव्हान चीनने सिद्ध केलं. ‘ऑकस’ची निर्मिती आणि गरज हा त्याचाच परिपाक.

हे वर्ष सरत असताना युरोपमधले काही देश आणि अमेरिकेत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा गंभीर स्वरूप धारण केलं आहे. आधी ब्लॅक फंगस, मग डेल्टा आणि आता ओमायक्रॉन. याचा विपरीत परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होतच आहे. पण अमेरिकेत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर दिलेली ‘आता पार्टी केलीत, तर नंतर अश्रू ढाळाल’ ही सक्त ताकीद आणि सुरक्षेचे उपाय योजून जरूर पार्टी करा, अशी बायडन यांना करावी लागणारी सारवासारव, हे चित्र प्रातिनिधिक आहे. कोरोना आणि त्यावरील लसीकरणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या लस मैत्रीच्या उपक्रमाची नोंद सुवर्णाक्षरात होईल.
या दशकाच्या सुरुवातीला ‘बॉटम ऑफ द पिरॅमिड’मध्ये जगणारी प्रचंड जनसंख्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होती आणि म्हणूनच छोटा रिचार्ज, छोटा पॅक अशा गोष्टी मार्केटमध्ये आल्या; परंतु आज दहा-बारा वर्षांनंतर ते चित्र बदललंय. २०३०पर्यंत ७० ते ७५ टक्के भारतीय मध्यमवर्ग या कॅटेगरीत जातील, अशी पावलं टाकली जाताहेत. त्याचा परिणाम म्हणूनच भारतातली अंतर्गत बाजारपेठ दिवसेंदिवस मजबूत होत असून तोच आमच्या विकासाचा कणा बनतोय.

यापुढील उद्योग व्यवसाय हे स्टेइंग कनेक्टेड, लुकिंग हेल्दी या नव्या प्रॉडक्ट कॅटेगरीमध्ये जोमाने वाढणार यात शंकाच नाही. सरत्या वर्षात ठळकपणे जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे देशांतर्गत दळणवळण व्यवस्था वेगाने सुधारतेय. खेडोपाडी इंटरनेटचा प्रसार झालाय. त्यामुळे ग्रामीण भागातली जीवनशैली आणि शहरातली जीवनशैली यात पुढील काही वर्षांत फारसा फरक उरणार नाही. ४० टक्के खरेदी आणि विक्री ही डिजिटल माध्यमातून होणार, असा कल मागील वर्षात स्पष्ट झाला. महत्त्वाकांक्षी भारताच्या पायाभरणीचं काम निश्चितच जोमानं सुरू आहे. जीवनपद्धतीमधलं नवीन नॉर्मल आणि हायब्रीड वर्किंग मॉडेल (वर्क फ्रॉम होम संस्कृती) भारतीय उद्योगांनी स्वीकारली आहे.
कोविडच्या उतरणीच्या काळात जगभरातल्या देशांनी आपापल्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केलेले दिसतात. त्याचा परिणामदेखील आता जाणवतोय. बहुतांश ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सुधारतेय. भारतातलं चित्र पुढील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत निश्चित सुधारेल, असंच अर्थव्यवस्थेचे अंदाज सांगताहेत. मुख्य डोकेदुखी ही वाढत्या वित्तीय तुटीची आहे. ही येत्या काही काळात सात टक्क्यांवर पोहोचेल.

म्हणजेच ती एकूण १५ लाख कोटी इतकी मोठी तूट असेल. अर्थात, हेच चित्र विकसित होत जाणाऱ्या जगातल्या अनेक देशांमध्ये दिसत आहे. भारतातली आणखी एक आशादायक बाब म्हणजे इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स याच्या वसुलीत झालेली प्रचंड वाढ (८३ टक्के). अप्रत्यक्ष कर म्हणजे जीएसटी, कस्टम, एक्साइज याचं कलेक्शन ४८ टक्क्यांनी वाढलं. हे खूपच आशादायक आहे. मागील वर्षी आक्रसलेला जीडीपी या वर्षी साडेतेरा ते चौदा टक्क्यांच्या आसपास जाईल.

हे झालं या वर्षीचं; परंतु कोरोना काळात सर्वात ठळकपणे काय समोर आलं असेल, तर ते म्हणजे तंत्रज्ञानस्नेही असण्याची गरज. यापुढील काळात तंत्रज्ञानाचे अनेक नवे आविष्कार आमच्या जीवनाचा भाग बनणार आहेत. इंटरनेटचं महाजाल प्रत्येक क्षेत्रात अविभाज्य असेल. वायरविना वीज घरी पोहोचवण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं असेल. क्रिप्टोकरन्सीही अर्थव्यवस्थांचा महत्त्वाचा भाग बनली असेल. चालकाविना गाड्या अस्तित्वात आलेल्या असतील. पण त्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद, त्याचे परवाने या गोष्टी कालबाह्य होतील. थ्रीडी प्रिंटिंग सहज उपलब्ध होईल. आजच असे प्रिंटर्स ७००-८०० डॉलरला मिळताहेत. त्यातून अनेक उपकरणं घराचे भाग, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स सहज प्रिंट होऊन वापरात येत आहेत.

या पुढच्या काळात टप्पा असेल तो मनुष्य अवयवनिर्मितीचा. व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या आविष्कारामुळे आभासी आणि सत्य जगादरम्यानच्या सीमारेषा पुसट होतील. डेटा अॅनेलिटिक्स तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट नुसती ट्रॅक करणार नाहीत, तर तुमच्या आवडी-निवडीच्या गरजा बदलून टाकेल. या शतकाच्या सुरुवातीला मानवी गुणसूत्रांचं सिक्वेन्सिंग करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. तेव्हा त्याची किंमत जवळपास तीन बिलियन डॉलर इतकी प्रचंड होती. आज तीच पाच हजार डॉलर इतकी खाली आली आहे. या पुढच्या काळात जेनोमिक्स आणि सुपर ह्युमन यांचा प्रभाव आमच्या जीवनावर पडलेला असेल. ‘मेटाव्हर्स’ हे एक संपूर्ण नवीन जग या पुढील दशकात अस्तित्वाला येणार.

२०२१नं जीवनासाठी महत्त्वाचं काय, या प्रश्नावर आरोग्यपूर्ण धडा दिला. आपल्यासाठी काय योग्य, याचं शिक्षण नकळत झालं. लोकांची आचार-विचारधारा बदलली. उद्याच्या जगाचा तोच मोठा आधार आहे. तेव्हा २०२२ रूपी एका तंत्रज्ञानस्नेही वर्षात सगळ्यांचं स्वागत करायला हरकत नाही.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

2 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

3 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

4 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

4 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

4 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

4 hours ago