Tuesday, June 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यशाळेतील पहिला दिवस...

शाळेतील पहिला दिवस…

रवींद्र तांबे

आपल्या राज्यात उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भवगळता १५ जूनपासून शाळा सुरू होत आहे. म्हणजे आज मुलांचा शाळेतील पहिला दिवस आहे. आपण जरी अनोळखी असलो तरी वर्गात बसल्याने ओळखी होत असतात. तेव्हा दुसऱ्या दिवशी आपण एकाच वर्गात असल्याची जाणीव होते. तसेच वर्षभरातील ओळख पहिल्या दिवशी होते. महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यार्थ्यांना शाळेची ओळख होते. शाळेच्या आसपासचा परिसर समजतो. त्यामुळे शाळेतील पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा असतो. तेव्हा मुलांना शाळेची आवड निर्माण करणारा हा पहिला दिवस असतो.

प्राथमिक शाळेतील पहिला दिवस म्हणजे शाळेची साफसफाई करणे होय. मी जेव्हा माझ्या आयनल गावच्या शाळेत होतो तेव्हा देवगड तालुक्यातील इळये गावचे चंद्रकांत कदम गुरुजी आम्हा सर्वांकडून शाळेची साफसफाई करून घ्यायचे. तसे सावंतवाडी तालुक्यामधील डेगवे गावचे जगन्नाथ पडवळ गुरुजी त्यांच्या जोडीला असायचे. त्यावेळी ७ जूनला शाळा सुरू व्हायची. काही वेळा पाऊस पडल्याने झाडांचा पाला ओला होत असे. तेव्हा झाडू मारताना काळजी घ्या असा सावधगिरीचा सल्ला सुद्धा कदम गुरुजी द्यायचे. त्यानंतर वर्गामध्ये सारवण केले जायचे. दररोज नियमितपणे प्रार्थना होण्यापूर्वी शाळेतील वर्गांची साफसफाई केली जात असे. दुसऱ्या दिवशी न विसरता माझ्या बागेतील शोभेच्या झाड्यांच्या छोट्या फांद्या घेऊन येऊन शाळेच्या बाजूने लावत असे. त्यामुळे झाड्यांच्या रंगीबेरंगी पानामुळे शाळेला शोभा यायची. सध्या तर काही शाळांमध्ये मुलेच नाहीत अशी परिस्थिती पाहायला मिळते. मग शाळेची साफसफाई होणार कशी? आपल्या गावात शाळेचे अस्तित्व राहावे म्हणून गावातील प्रतिष्ठित लोक श्रमदानातून शाळेची सफाई करीत असतात. तेव्हा बंद असलेल्या शाळा मुलांची वाट पाहत असताना दिसतात.

प्रत्येकाच्या जीवनात विद्यार्थीदशेत शाळेतील पहिला दिवस एक नवी दिशा देणारा असतो. इयत्ता पहिली असो… पाचवी असो… आठवी असो… किंवा अकरावी असो… नवीन शाळेत प्रवेश घेतल्याने आपण नवीन विद्यार्थी असल्याने जरा नवखे वाटत असतो. एकदा का पहिला दिवस गेला की आपण स्वत:चे राजे होतो हे सर्वांना माहीत आहे. त्यासाठी शाळेतील पहिला दिवस महत्त्वाचा असतो. कारण आपण आपल्या जीवनातील नवीन शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करीत असतो. शाळेतील पहिल्या दिवसाने आपल्याला नवीन ऊर्जा मिळते. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तयार होते. पहिल्या दिवसाने आपण नियमित शाळेत गेलो पाहिजे याची जाणीव होते.

आपली शाळा सुरू होणार म्हणून आपले आई-वडील आपल्या मापाचा शाळेचा गणवेश शिवतात. नवीन शाळेत जाणार म्हणून नवीन स्कूलबॅग घेतात. वह्या, पुस्तके, कंपासपेटी, पेन, पेन्सिल, जेवणासाठी नवीन डबा, पाण्यासाठी बाटली, पायामध्ये नवीन शूज आणि छत्री अशी आठवड्यापूर्वी खरेदी आई-वडील करीत असतात. त्यामुळे कधी एकदा शाळेचा पहिला दिवस येतो असे प्रत्येकाला वाटत असते. पहिल्या दिवशी लहान मुले असतील तर त्यांचे आई-वडील किंवा घरातील मोठा माणूस शाळेच्या गेटपर्यंत पोहोचविण्यासाठी येत असतात. आपले आई-वडील घरी परत गेल्याचे लक्षात येतात आपण घरी पळून जाण्याचा प्रयत्न करतो. याचीही आठवण काहींना झाली असेल.

पहिल्या दिवशी वर्गातील मुलांची एकमेकांशी ओळख होते. आपल्या विभागातील असेल तर येण्या-जाण्यासाठी नवीन सोबती मिळतो. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या दिवशी वर्गात गेल्याने आपली बसण्याची जागा पक्की ठरते. म्हणजे वर्षभर आपण त्याठिकाणी बसायचे. कोणीही आपली जागा बदलत नाही किंवा दुसऱ्यांच्या जागेवर बसत नाही इतकी शिस्त लागली जाते. तेव्हा या केवळ शाळेतील पहिल्या दिवशी आलेल्या अनुभवामुळे अशा चांगल्या गोष्टी घडत असतात. यातून चांगला समाज निर्माण होत असतो. प्रथम शाळेच्या वतीने पहिल्या दिवशी टाळ्यांच्या गजरात उपस्थित मुलांचे स्वागत करण्यात येते. काही ठिकाणी प्रत्येक मुलांच्या हातात गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले जाते. गाण्यांच्या भेंड्या लावणे, गाणी म्हणणे, गोष्टी सांगणे, अभंग म्हणणे त्यानंतर शाळेतील मोठ्या वर्गात एकत्र बसून शाळेचे प्रमुख किंवा मुख्याध्यापक आपल्या शाळेच्या प्रगतीचा इतिहास सांगतात.

आपल्या शाळेने पंचक्रोशीत कसे नावलौकिक मिळविले आहे याचे दाखले देतात. नंतर उपस्थित विद्यार्थ्यांना खायला वडापाव किंवा समोसा दिला जातो. तसेच मुलांना एक प्रश्न तर आवश्यक विचारला जातो, तो म्हणजे तुम्ही मे महिनाच्या सुट्टीत कोणी काय-काय केले. त्याची उत्तरे मुले आनंदाने देत असतात. तर मुलांसाठी दुसरी आनंदाची बाब म्हणजे, पहिल्या दिवशी शाळेच्या वेळेपेक्षा अगोदर सोडले जाते आणि सांगितले जाते की, उद्या आपणा सर्वांना वेळापत्रक व विषय शिक्षकांची ओळख करून दिली जाईल. परवापासून वेळापत्रकानुसार शाळेचे कामकाज चालेल. मुलांना ही आपल्याला शिस्त लावणाऱ्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळाल्याचा आनंद होतो. याचा परिणाम विद्यार्थी पहिल्या दिवसापासून अभ्यासाला लागतात. तसेच विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार याच दिवशी केला जातो. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्याला मदत होते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. एकंदर गमतीदार व आठवणीतील शाळेतील पहिला दिवस असतो. त्यासाठी शाळेतील पहिल्या दिवसाच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी शाळेत तर गेलेच पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -