Share

हिंदुत्वाशी गद्दारी आणि वैयक्तिक स्वार्थापोटी भाजपला सोडून आघाडीसोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळविणारे उद्धव ठाकरे यांची आज देशात एक स्वार्थी व निष्क्रीय मुख्यमंत्री अशी ख्याती आहे. – श्री. नारायण राणे.

गर्वहरण – श्री. उद्धवजी ठाकरे

महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार गेले आणि विधानसभेत श्री. एकनाथ शिंदे व भाजप पक्ष यांच्या नवीन सरकारच्या १६४ विरोधात श्री. उद्धवजी ठाकरे ९९ वर रनआऊट झाले. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पक्षासोबत असलेले ५० आमदार त्यांना सोडून गेले असतानाही उद्धवजी ठाकरे आठवडाभर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर चिकटून बसले होते. मुख्यमंत्रीपदाचा हव्यास त्यांच्या ऱ्हासाचे कारण ठरले. हिंदुत्वाशी गद्दारी करत वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी भारतीय जनता पक्षाशी मैत्री तोडली आणि आघाडीला जाऊन मिळालेले उद्धवजी ठाकरे यांनी आज महाराष्ट्रात व देशात एक स्वार्थी, भ्रष्टाचारी व निष्क्रीय मुख्यमंत्री म्हणून ख्याती मिळविली. अनेक आमदार उद्धवजींना सोडून गेल्यानंतर त्यांनी केलेली विविध भाषणे व भाजपवर केलेले विविध आरोप धादांत खोटे व अज्ञानीपणाने केलेले होते. उद्धवजी ठाकरे वारंवार म्हणतात की, “मी माननीय बाळासाहेबांचा मुलगा, पहा मला सत्तेवरून खाली खेचताहेत.” पण सत्तेवरून खाली खेचण्याजोगी परिस्थिती कोणी निर्माण केली? याला कोण जबाबदार? स्वत:च ना.

गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेच्या आमदारांना, मंत्र्यांना किती वेळा भेटलात? कितीजणांची कामे केली? शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांचा कारभार आदित्य ठाकरे आणि स्वत:च हाताळत होते. त्या मंत्र्यांच्या मानसिकतेचा कधी विचार केला नाही. फक्त विचार केला आप्त आणि आपण. गेल्या अडीच वर्षांत कोणताही शिवसैनिक, आमदार, खासदार, मंत्री यांच्याकडे पाहिलेही नाही. जे कोण डोईजड आहेत, याची जाणीव झाल्यावर त्यांचा जया जाधव आणि रमेश मोरे करण्याचेही प्रयत्न झाले. हिंदुत्वाचा त्याग करून मुख्यमंत्री झाले, पण जनतेसाठी नाही, तर पैशांसाठी… नाही तर सत्तेवर येताच सगळ्या विकासकामांना स्थगिती देण्याचे कारण काय? व्यवहार पूर्ण झाल्यावर पुन्हा कामे सुरू झाली. कामांना स्थगिती देण्याचे कारण काय? आणि कामे सुरू करण्याचे कारण कोणते? हे सर्व राज्याच्या जनतेला समजले आहे. जनता काय दूधखुळी नाही. वारंवार साहेबांच्या नावाचा उपयोग करणे, बॅनर-होर्डिंगवर साहेबांचा फोटो छापणे आणि आपला बचाव करून घेणे हेच त्यांनी केले.

माननीय बाळासाहेब ठाकरे असते, तर उद्धवजी ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते. कारण त्यांना यांची गुणवत्ता, क्षमता आणि अभ्यास याची पूर्ण माहिती होती. तेव्हा उद्धवजी ठाकरे यांना त्यांनी मुख्यमंत्री केलेच नसते. आता साहेबांवरचे प्रेम ओतू जात आहे, साहेब गेल्यानंतर. पण मला आज सांगावे लागेल, साहेब जिवंत असताना त्यांना सगळ्यात जास्त मानसिक त्रास, छळले कोणी असेल, तर ते पुत्र उद्धवजी ठाकरे यांनी. यांचे साहेबांवर जर प्रेम असते, तर हे दोनदा मुला-बाळांसह घर सोडून गेले नसते. अशा ढोंगी, नाटकी, कटकारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या व्यक्तीला महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसविणे ही चूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कळली असेल. अहो स्वार्थ किती? ३९ आमदार सोडून गेले तरी पदाचा राजीनामा यांनी दिला नव्हता. “मी वर्षा सोडतो नंतर राजीनामा देतो”, असे सांगून सहानुभूती मिळविण्यासाठी वर्षा ते मातोश्री मिरवणूक काढून घेतली. मुंबईतील मिरवणुकीत महिला, पुरुष आणि शिवसैनिकांची संख्या साडेसातशे होती. ‘साहेबांनी जे कमावले ते उद्धवजी यांनी गमावले’, त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे. साहेबांनी ४८ वर्षांत जे कमावले ते उद्धवजी यांनी अडीच वर्षांत गमावले. वारंवार एक तुणतुणं वाजवतात, ‘माझी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून गणना झाली’, असे सांगतात. कोणी केली? कोणती संस्था? अशा संस्थांना पैसे दिले की, ते पाहिजे तो नंबर देतात. देशात व राज्यात अशा अनेक संस्था आहेत. राज्यात शेतकरी, मजूर, कामगार, उद्योग, व्यवसाय आणि बेरोजगारीचे अनेक प्रश्न आहेत. पण ते मात्र सोडविण्याचा प्रयत्न झाला, असे दिसले नाही. कोरोनामुळे राज्यात १ लाख ६० हजार मृत्यू झाले. हे अपयश कोणाचे? तेव्हा बढाया मारू नका, बस झाले. ३९ वर्षे मी शिवसेनेला जवळून बघितले आहे. आता लांबून पाहत आहे. राणेंच्या घराला नोटीस दिली. घर पाडण्यासाठी आयुक्तांकडे हट्ट धरला. हा कसला भीम पराक्रम? स्वत:चे घर बेकायदेशीर असताना अधिकृत घरांना पाडण्याची दुष्ट बुद्धी ही बदल्याची भावना आहे. ती फक्त उद्धवजी ठाकरेंकडेच असू शकते.

अडीच वर्षांत ना मंत्रालयात गेले, ना कॅबिनेटला उपस्थित राहिले, ना विधिमंडळात उपस्थिती दाखवली. भाषणे तर सोडाच वैचारिक आणि राज्याच्या अभ्यासाचा अभाव याचेच प्रदर्शन झाले. एकच उत्तर नेहमी, ‘मला माहीत नाही, मी वाचलेले नाही, मला याचा अभ्यास नाही.’ ही अशीच उत्तरे. हे मुख्यमंत्री होऊन गेले आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुटकेचा निश्वास सोडला. महाराष्ट्रावरचे संकट टळू लागले असेच वाटू लागले. गेल्या अडीच वर्षांत विकास तर सोडाच, पण भ्रष्टाचार एवढा बोकाळला होता की, कोरोनामध्ये खरेदी केलेल्या औषधात पण १५ टक्के घ्यायचे सोडले नाही. हिंदुत्वाशी गद्दारी करून शेवटी मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यात मराठी माणूस, हिंदू आणि जनता यांचे कोणतेही भले करू शकले नाहीत. मला एक सल्ला द्यावासा वाटतो. संपलेली शिवसेना तुमच्याकडून उठणे नाही. तुम्हाला आरामाची नितांत गरज आहे. तेव्हा विरोधकांवरची टीका थांबवा. आराम करा, म्हणजे तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभेल, हीच माझी देवाकडे प्रार्थना.

निष्ठा – श्री. देवेंद्रजी फडणवीस

२०१९ साली विधानसभा निवडणुकीत जनमताचा काैल भाजप आणि शिवसेना युतीला होता. पण अनपेक्षितरीत्या उद्धवजी ठाकरे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या फसवणुकीनंतर सत्तेतून बाहेर राहिलेले देवेंद्रजी फडणवीस त्रागा न करता, शांतपणे आपले विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य पार पाडण्यास सिद्ध झाले. ते जनतेमध्ये जात राहिले. जनतेचे प्रश्न विधिमंडळात आणि रस्त्यावरही मांडत राहिले. प्रत्येक आंदोलनामध्ये कोरोनाची पर्वा न करता अग्रेसर राहिले. जनतेच्या आणि पक्षाच्या हितासमोर त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी केली नाही. सतत जनतेमध्ये जात राहिल्यामुळे त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली. पहिली लागण त्यांच्या जीवावरच आली होती. पण सुदैवाने ते सुखरूप बचावले. यानंतर पुन्हा ते जनतेमध्ये गेले. लोकांचे प्रश्न मांडत राहिले. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे चव्हाट्यावर आणत राहिले.

याच वेळी शिवसेनेतील आमदारांमधील खदखदसुद्धा त्यांनी ओळखली. कार्यकर्त्यांपासून आमदारांपर्यंत सर्वांना ते वेळ देत होते. शिवसेनेतील बंडानंतर देवेंद्रजीच मुख्यमंत्रीपदावर येतील, अशी राज्यातील सर्वसामान्य जनतेची व भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने मात्र वेगळा विचार केला. शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसविण्याचे आदरणीय साहेबांचे स्वप्न साकार करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आणि देवेंद्रजींनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली. आपण या मंत्रिमंडळाच्या कामावर बाहेरून लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्रजी यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची सूचना केली. एका क्षणाचाही विलंब न करता देवेंद्रजींनी पक्षाची आज्ञा शिरसावंद्य मानून पद स्वीकारले. ह्याला म्हणतात पक्षनिष्ठा. देवेंद्रजींचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.

देवेंद्रजी आपण निष्ठा आणि कर्तव्य याचा प्रत्यय आणून दिलात. त्यामुळे या परिस्थितीत मला आठवत असलेले वाक्य सांगून इथेच संपवतो. ‘सोनं जेव्हा जळतं, तेव्हा ते अधिक उजळतं!’

धाडस – मा. एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे एकनिष्ठ शिवसैनिक. पक्षाचे काम पूर्ण वेळ करता यावे यासाठी स्वत: अविवाहित राहण्याचा निर्णय घेणाऱ्या धर्मवीर कै. आनंद दिघे यांचे बाळकडू त्यांना मिळाले. कै. आनंद दिघे माझे मित्र होते आणि एकनाथ शिंदेसुद्धा माझे मित्र आहेत. उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली देऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली आघाडी त्यांना मान्य नव्हती. त्या आघाडीमध्ये एकनाथ शिंदे यांची घुसमट होत होती. उद्धवजी ठाकरे यांच्या एककल्ली कारभारामुळे चिडलेल्या शिवसेनेतील आमदारांच्या वाढत्या रेट्यामुळे त्यांनी धाडस करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेतील बहुसंख्य नाराज आमदारांचे नेतृत्व त्यांनी हाती घेतले. या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणून आज एक खराखुरा हाडाचा शिवसैनिक, रस्त्यावर राबलेला शिवसैनिक राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आला. एकनाथ शिंदे यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द यशस्वी व्हावी, यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.

एकनाथ शिंदे आता कामाला लागा. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राला ‘लोककल्याणकारी राज्य’ बनवा. भूतकाळ विसरून कर्तबगार मुख्यमंत्री बनावे. जनतेच्या मागे नाथ आहे, हे जाणवू द्या.

जय महाराष्ट्र!

Recent Posts

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

54 mins ago

Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…

1 hour ago

Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…

2 hours ago

IT Raid : अबब! पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये दडवलेले तब्बल १०० कोटी!

दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…

2 hours ago

Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…

5 hours ago

HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्‍या…

6 hours ago